Sports Minister resigns over Messi event तृणमूल काँग्रेसचे संस्थापक सदस्य व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे खंदे समर्थक अरूप विश्वास यांनी मंगळवारी पश्चिम बंगालच्या क्रीडामंत्रिपदाचा राजीनामा दिला. १३ डिसेंबर रोजी अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्या कोलकाता दौऱ्यादरम्यान गोंधळ उडाला होता. त्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, क्रीडा मंत्रालयाचा कार्यभार आता त्या स्वतः सांभाळतील. मात्र, अरूप विश्वास यांच्याकडे ऊर्जा व गृहनिर्माण ही खाती कायम राहतील. या प्रकरणावरून बंगाल सरकारने युवा व्यवहार सचिवांना निलंबित केल्यानंतर लगेचच विश्वास यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. कोण आहेत अरूप विश्वास? त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटले? मेस्सीच्या कार्यक्रमादरम्यान नक्की काय घडले होते? जाणून घेऊयात…
अरूप विश्वास यांनी पत्रात काय म्हटले?
विश्वास यांनी काल (१६ डिसे)मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून क्रीडा व युवा व्यवहार, ऊर्जा आणि गृहनिर्माण मंत्रिपदावरून मुक्त करण्याची विनंती केली होती. पत्रात विश्वास यांनी लिहिले, “दीदी, माझा नमस्कार स्वीकारावा. १३ डिसेंबर २०२५ रोजी फुटबॉलपटू मेस्सी विवेकानंद युवा भारती क्रीडांगण (सॉल्ट लेक स्टेडियम) येथे आला होता, त्यावेळी तिथे काहीशी अप्रिय परिस्थिती निर्माण झाली. आपण आधीच या प्रकरणासाठी चौकशी समिती स्थापन केली आहे. ही चौकशी पूर्णपणे निष्पक्षपणे व्हावी, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळेच मी क्रीडा मंत्रिपदावरून पायउतार होऊ इच्छितो. कृपया माझा हा विनंती अर्ज स्वीकारावा.”
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा राजीनामा अद्याप तांत्रिकदृष्ट्या स्वीकारण्यात आलेला नाही, परंतु जोपर्यंत चौकशी सुरू आहे, तोपर्यंत ते क्रीडामंत्री म्हणून काम पाहणार नाहीत. तात्पुरत्या स्वरूपात ममता बॅनर्जी यांनी या विभागाची सूत्रे हाती घेतली आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री अरूप विश्वास यांच्या भावना आणि हेतूचा आदर केला जाईल. “त्यांची भूमिका योग्य आहे. जोपर्यंत निष्पक्षपणे चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत क्रीडा विभागाची जबाबदारी मी स्वतः पाहीन,” असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
अरूप विश्वास यांचा राजकीय प्रवास
अरूप विश्वास आपल्या सलग विजयांच्या विक्रमासाठी ओळखले जातात. त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात न्यू अलीपूर कॉलेजमध्ये काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून केली. त्यांचे वडील सीपीआय(एम)चे सक्रिय कार्यकर्ते होते, तरीही अरूप यांनी ममता बॅनर्जी यांची साथ निवडली. १९९८ मध्ये जेव्हा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस सोडून ‘तृणमूल काँग्रेस’ची स्थापना केली, तेव्हा विश्वास त्यांच्याबरोबर बाहेर पडले.
२००६ मध्ये त्यांनी पहिल्यांदा टॉलीगंज विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आणि तेव्हापासून ही जागा त्यांच्याकडेच आहे. दक्षिण कोलकात्यातील ‘टॉलीगंज’ हे बंगाली चित्रपटसृष्टीचे (टॉलीवूड) केंद्र आहे. अरूप यांचे भाऊ स्वरूप विश्वास हे ‘फेडरेशन ऑफ सिने टेक्निशियन्स अँड वर्कर्स ऑफ इस्टर्न इंडिया’चे अध्यक्ष आहेत. त्यामुळे या विश्वास बंधूंची बंगाली मनोरंजन सृष्टीवर मोठी पकड आहे आणि ते पक्षाचा या क्षेत्राशी असलेला मुख्य दुवा मानले जातात.
२०११ मध्ये डाव्यांची ३४ वर्षांची सत्ता संपवून तृणमूल काँग्रेस सत्तेत आली, तेव्हा अरूप विश्वास यांचा मंत्रिमंडळात राज्यमंत्री (युवा आणि गृहनिर्माण) म्हणून समावेश करण्यात आला. २०१३ मध्ये मुकुल रॉय व मदन मित्रा यांसारखे दिग्गज नेते चिट फंड घोटाळ्यात अडकल्यानंतर पक्षात अरूप विश्वास यांचे वजन वाढले. अरूप विश्वास हे ममता बॅनर्जींचे अत्यंत विश्वासू मानले जातात.
विवादाचे कारण काय?
साल्ट लेक स्टेडियममधील गोंधळानंतर सोशल मीडियावर अरूप विश्वास यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. मेस्सीबरोबरचे त्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर, सामान्य नागरिकांचे व्यवस्थापन करण्याऐवजी व्हीआयपी व्यक्तींना आणि फोटो काढण्याला जास्त महत्त्व दिले गेल्याचा आरोप त्यांच्यासह सरकारवर करण्यात आला. मेस्सीला पाहण्यासाठी बंगालच्या कानाकोपऱ्यातून चाहत्यांनी हजारो रुपये खर्चून तिकिटे विकत घेतली होती.
मात्र, मैदानावरील मेस्सीच्या ३० मिनिटांच्या उपस्थितीत मंत्री आणि क्रीडा पदाधिकाऱ्यांनी त्याला वेढून ठेवले होते. अर्जेंटिनाचा विश्वविजेता फुटबॉल कर्णधार लिओनेल मेसी खास भारत भेटीसाठी आला खरा; पण त्याची झलकही सर्वसामान्य प्रेक्षक बघू शकला नाही. त्यामुळे संतापलेल्या चाहत्यांनी मेस्सी निघून जाताच स्टेडियममध्ये तोडफोड केली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने तीन आयपीएस अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. तसेच साल्ट लेक स्टेडियमचे सीईओ देव कुमार नंदन यांना पदावरून हटविण्यात आले आहे.
भाजपाने काय आरोप केले?
भाजपाने म्हटले आहे की, बंगाल सरकारची कारवाई खूप उशिरा झाली आहे. अरूप विश्वास यांचा राजीनामा घेऊन, आता क्रीडा मंत्रालयाचा कार्यभार सांभाळणाऱ्या ममता बॅनर्जींबद्दल असेच म्हणता येईल. संपूर्ण जगाने पाहिले, संपूर्ण देशाने पाहिले की, तृणमूल काँग्रेसमुळे जागतिक पातळीवर किती लाजिरवाणी परिस्थिती निर्माण झाली,” असे भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले. ते म्हणाले, “भ्रष्टाचार झाला आणि तो संस्थात्मक भ्रष्टाचार होता. चाहत्यांची फसवणूक झाली. आतापर्यंत चाहत्यांना पैसे परत मिळालेले नाहीत. अरूप विश्वास स्वतःचे सेल्फी काढण्याचा प्रयत्न करीत होते. तिथे सुजित बोस यांच्यासारखे इतर मंत्रीही होते. तृणमूल काँग्रेसकडून त्यांना कसे संरक्षण मिळत आहे हे आम्ही पाहिले आहे. त्यांनी त्यांना अटक करावी.” तसेच ते, “त्यांनी केलेल्या सर्व भ्रष्टाचाराविरुद्ध कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करावी. “हा एक गुन्हा आहे, जो अटकेपेक्षा कमी नाही आणि ममता बॅनर्जी यांनी स्वतःच त्यांच्यामुळे झालेल्या जागतिक लाजिरवाण्या आरोपासाठी राजीनामा दिला पाहिजे,” असेही म्हणाले.
