पश्चिम विदर्भात भाजप आमदारांनाच मंत्रीपदाची हुलकावणी

धक्‍कातंत्रासाठी सरावलेल्‍या भाजपच्‍या वऱ्हाडातील नेत्‍यांना ही बाब पचनी पडलेली नाही.

पश्चिम विदर्भात भाजप आमदारांनाच मंत्रीपदाची हुलकावणी

मोहन अटाळकर
अमरावती : पश्चिम विदर्भात भाजपच्‍या पन्‍नास टक्‍के आमदारांचा वाटा असूनही शिंदे-फडणवीस सरकारच्‍या पहिल्‍या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्‍या त्यातील एकाही आमदाराला संधी न मिळाल्‍याने भाजप वर्तुळातच आश्‍चर्य व्‍यक्‍त होत आहे.

धक्‍कातंत्रासाठी सरावलेल्‍या भाजपच्‍या वऱ्हाडातील नेत्‍यांना ही बाब पचनी पडलेली नाही. पश्चिम विदर्भात विधानसभेच्‍या एकूण ३० जागांपैकी १५ जागांवर भाजपचे आमदार निवडून आले. फडणवीस सरकारच्‍या काळात मंत्रीपद भुषवणारे तिघे आमदार यावेळी प्राधान्‍यक्रमावर होते. त्‍यातच जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे हे तर उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निष्‍ठावंत. सुरत ते गोवा दरम्‍यान शिंदे गटाची जबाबदारी ही डॉ. कुटे यांच्‍यावरच होती. सुरतमध्‍ये सर्वप्रथमच तेच पोहचले. एवढी मोठी जबाबदारी सांभाळल्‍यानंतर त्‍यांना यावेळी कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्‍यांना होती, पण त्‍यांची निराशा झाली. यवतमाळ जिल्‍ह्यातून याआधी मंत्रीपद भूषवलेले मदन येरावार हेही एक ज्‍येष्‍ठ आमदार मंत्रीपदाची आस बाळगून होते. पण, बंजारा समाजाचे नेतृत्‍व करणाऱ्या शिंदे गटाच्‍या संजय राठोड यांना संधी मिळाली आणि येरावार प्रतीक्षा यादीत फे‍कले गेले. राळेगावच्‍या अशोक उईकेंचे नाव यावेळी तर चर्चेतही आले नाही.

फडणवीस सरकारच्‍या काळात अनेक ज्‍येष्‍ठ आमदारांना डावलून विधान परिषद सदस्‍य डॉ. रणजीत पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लागली, तेव्‍हाच भाजपच्‍या कार्यकर्त्‍यांना धक्‍का बसला होता. अकोल्‍याचे गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, अकोटचे प्रकाश भारसाकळे, मूर्तिजापूरचे हरीश पिंपळे, कारंजाचे राजेंद्र पाटणी असे ज्‍येष्‍ठ आमदार हे कित्‍येक वर्षांपासून मंत्रीपदाकडे डोळे लावून बसले आहेत, पण त्‍यांना यावेळी स्‍थान मिळेल का, हा यक्षप्रश्‍न आहे.

दुसरीकडे, अनेक नव्‍या दमाचे आमदार मंत्रीपदाची अपेक्षा ठेवून आहेत. चिखलीच्‍या श्‍वेता महाले, खामगावचे आकाश फुंडकर, धामणगाव रेल्‍वेचे प्रताप अडसड यांच्‍या समर्थकांनाही घाई झाली आहे. पहिल्‍या विस्‍तारात अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम हे चार जिल्‍हे उपेक्षित ठरले आहेत. या जिल्‍ह्यांना आता कशा पद्धतीने प्रतिनिधित्‍व मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे-फडणवीस सरकारला काही मित्रपक्ष, अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्‍यांनाही मंत्रीपद हवे आहे. शिंदे गटाचे बुलढाणा जिल्‍ह्यातील आमदार डॉ. संजय रायमूलकर, संजय गायकवाड यांच्‍याही अपेक्षा वाढल्‍या आहेत. मंत्रीपदाच्‍या दुसऱ्या विस्‍तारात यांना झुकते माप मिळाल्‍यास भाजपच्‍या आमदारांच्‍या पदरी पुन्‍हा निराशा येऊ शकते. त्‍यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्‍ताराकडे वऱ्हाडातील राजकीय वर्तुळचे लक्ष लागले आहे.

अकोला जिल्‍ह्यात पाच विधानसभा मतदार संघांपैकी चार आमदार भाजपचे आहेत. तर दोन आमदार विधान परिषदेवर आहेत. त्‍यामुळे भाजपमध्‍ये सर्वाधिक स्‍पर्धा ही या जिल्‍ह्यात आहे. यवतमाळ जिल्‍ह्यात सातपैकी पाच आमदार हे भाजपचे आहेत. येथूनही मंत्रीपदाची मागणी आहे. अमरावती जिल्‍ह्यातून एक विधानसभा, दोन विधान परिषद सदस्‍य आहेत. वाशिम जिल्‍ह्यातूनही दोन आमदार संधीच्‍या प्रतीक्षेत आहेत. मंत्रीपदासाठी इच्‍छुकांची भाजपमध्‍ये भाऊगर्दी झालेली असताना जिल्‍हानिहाय प्रतिनिधित्व, जातीय समतोल राखण्‍यासाठी भाजपच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पश्चिम बंगाल: पक्षातील सर्वच नेते चोर नाहीत; टीएमसी नेत्यांचा बचावात्मक पवित्रा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी