पंजाब-हरियाणामधील पाण्याचा वाद पुन्हा पेटला आहे. पंजाबकडे हरियाणाला देण्यासाठी एक थेंबही अतिरिक्त पाणी नाही, अशी भूमिका पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी घेतली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पंजाबच्या प्रमुख राजकीय पक्षांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत भाजपानेदेखील आपण राज्याच्या हिताचे समर्थन करत असल्याचे स्पष्ट केले. राज्याच्या पाण्याचा एक थेंबही इतरत्र जाणार नाही, अशीच भूमिका पंजाबमधील प्रमुख पक्षांची होती. मात्र, भाजपाची ही भूमिका हरियाणा आणि दिल्लीतील पक्षाच्या भूमिकेशी सुसंगत नव्हती. यावरून पक्षात मतमतांतर असण्याचे कारण काय? दोन्ही राज्यांतील पाणी वाद पुन्हा पेटण्याचे कारण काय? त्याविषयी जाणून घेऊ.

‘आप’ला भाजपाचे समर्थन

सतलज-यमुना लिंक कालव्यावरून पंजाब आणि हरियाणा वर्षानुवर्षे कायदेशीर लढाई लढत आहे. आता भाक्रा कालव्याच्या पाण्यावरून हा वाद पुन्हा तापला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने (आप) भाक्रा कालव्यातून हरियाणाला होणारा पाणीपुरवठा निम्म्याहून कमी केला आहे. गेल्या १५ दिवसांपासून भाकरा कालव्यातून हरियाणाला दररोज साडेनऊ हजार क्युसेक पाण्याऐवजी केवळ चार हजार क्युसेक पाणी दिले जात आहे. हरियाणाने शुक्रवारी म्हटले आहे की, ते या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जातील. पंजाब भाजपाचेही आम आदमी पक्षाच्या भूमिकेशी एकमत असल्याचे दिसून आले आहे. परंतु, दुसरीकडे पंजाब भाजपाने मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर परिस्थिती चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा आरोपदेखील केला आहे.

भाजपाची भूमिका काय?

भगवंत मान यांच्या अध्यक्षतेखाली पंजाबमध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडली. प्रदेश भाजपा अध्यक्ष सुनील जाखड म्हणाले की, ते या निर्णयात राज्याच्या बाजूने आहेत. “भाजपा नेहमीच पंजाबच्या हक्कांच्या पाठीशी उभा आहे,” असे त्यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. जाखड यांनी गेल्या वर्षी प्रदेश भाजपा प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता, परंतु अद्याप पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही आणि त्यांच्या जागी कोणाची निवडही केलेली नाही. जाखड म्हणाले, “भाजपा कायम पंजाबच्या हितासाठी उभा राहिला आहे आणि पंजाबकडे कोणत्याही राज्याला वाटण्यासाठी अतिरिक्त पाणी नाही. मानवतेच्या आधारावर पिण्याचे पाणी देण्याबाबत केले जाणारे राजकारण पंजाबच्या तत्त्वांच्या विरुद्ध आहे.” त्यांनी असेही म्हटले की, अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी ते पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वासमोर हा मुद्दा उपस्थित करतील.

पटियालाच्या माजी खासदार प्रणीत कौर म्हणाल्या की, पंजाबमध्ये भूजल पातळी खालावल्यामुळे आधीच ‘११५ डार्क झोन’ आहेत. अशा परिस्थितीत राज्याकडे इतर कोणासाठीही जास्त पाणी नाही. भाजपा पंजाबच्या लोकांबरोबर खंबीरपणे उभा आहे. परंतु, आम्हाला असे वाटते की, या मुद्द्यावर ‘आप’चा प्रतिसाद नाटकी होता. ते स्वतः चांगल्या पद्धतीने हा मुद्दा हाताळू शकले नाहीत आणि हरियाणाला जास्त पाण्याचा पुरवठा केला, म्हणून पंजाबचे पाणी लुटणारे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत,” असे कौर यांनी शुक्रवारी सांगितले. प्रदेश भाजपाचे सरचिटणीस अनिल सरीन म्हणाले, “जेव्हा जेव्हा पंजाबच्या हिताचा प्रश्न येतो, तेव्हा आम्ही पंजाबच्या लोकांबरोबर ठामपणे उभे असतो.” त्यांनी सांगितले, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीमध्ये आता भाजपाची सरकार आहेत. आपल्याला पंजाबचे हित पाहावे लागेल, आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे.

दिल्लीतील भाजपा नेत्यांची ‘आप’वर टीका

दिल्लीतील भाजपा नेत्यांनी या वादासाठी पंजाबमधील आप नेतृत्वाला जबाबदार धरले, टीका केली आणि या मुद्द्यावर त्यांच्या स्वतःच्या राज्य युनिटची भूमिका बाजूला ठेवली. दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले, “जेव्हा अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान पिण्याच्या पाण्यावरून घाणेरडे राजकारण करत आहेत, तेव्हा हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांची भूमिका वाखणण्याजोगी आहे. त्यांनी म्हटले आहे की, पंजाब आमचा मोठा भाऊ आहे आणि गरज पडल्यास आम्ही आमच्या वाट्याचे पाणीदेखील वाटून घेऊ, प्रत्येक पंजाबी असा विचार करतो. आम्ही आमच्या शत्रूंनाही तहानलेले राहू देत नाही. परंतु, केजरीवाल यांनी भगवंत मानसारख्या खऱ्या पंजाबीलाही भ्रष्ट केले आहे, त्यामुळे त्यांची विचारसरणी संकुचित झाली आहे आणि ते केवळ आपला राजकीय स्वार्थ पाहात आहेत,” असे ते म्हणाले.

दिल्लीतील त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी परवेश साहिब सिंग यांनीही मान सरकारवर हरियाणा आणि दिल्लीसाठी पाणी अडवून घाणेरडे राजकारण करत असल्याचा आरोप केला. “आम्ही दिल्लीतील प्रत्येक घराला स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी दिवसरात्र काम करत आहोत आणि आता पंजाब सरकार दिल्लीतील लोकांचा अशा प्रकारे बदला घेऊ इच्छित आहे,” असा आरोप त्यांनी केला. आपने भाजपा नेत्यांच्या कार्यालयांच्या बाहेर निदर्शने केल्यानंतर भाजपाकडूनदेखील निदर्शने करण्यात आली. आपने आपल्या निदर्शनांमध्ये हरियाणा आणि दिल्लीतील भाजपाने पंजाबच्या पाण्याच्या हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.

आपचे प्रदेशाध्यक्ष अमन अरोरा आणि वरिष्ठ प्रवक्ते मालविंदर सिंग कांग यांनी जाखड आणि केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांना पत्र लिहून ते पंजाबच्या बाजूने आहेत की हरियाणा व दिल्लीतील त्यांच्या पक्षाबरोबर उभे आहेत हे स्पष्ट करण्यास सांगितले. रेल्वे आणि अन्न प्रक्रिया राज्यमंत्री बिट्टू यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटले, बीबीएमबीबरोबरच्या बैठकीत आप आपली भूमिका स्पष्ट करू शकले नाही. भाजपा ठाम आहे, पंजाबच्या पाण्याचा एक थेंबही इतरत्र जाणार नाही,” असे ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी माहिती दिली की, गेल्या तीन वर्षांत हरियाणाने आपला वाटा संपवल्यानंतरही पंजाबने जास्तीचे पाणी सोडले आहे आणि तेच पाणी दिल्लीकडे वाहून गेले आहे. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले, “त्या काळातही दिल्लीत आपचे सरकार होते, मात्र आपने या मुद्द्याचे राजकारण केले नाही. परंतु, आता दिल्लीत भाजपाचे राज्य आहे, त्यामुळे त्यांची भूमिकाही बदलली आहे.