Nayab Singh Saini on Cockroach Janata Party : भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून समाजमाध्यमांवर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ उदयास आली. अत्यंत कमी कालावधीत प्रचंड लोकप्रिय झालेल्या या राजकीय व्यंगात्मक चळवळीने फॉलोअर्सच्या बाबतीत भाजपासह काँग्रेसलाही मागे टाकले. अभिजीत दिपके या मराठमोळ्या तरुणाने सुरू केलेल्या या मोहिमेवर भाजपाचे नेते तथा हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी जोरदार टीका केली. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला शह देण्यासाठी विरोधकांनी संविधान बचावचा नारा दिला होता. या मोहिमेशी तुलना करताना कॉक्रोच जनता पार्टीची चळवळ फार काळ टिकणार नसल्याचा दावा नायब सिंह सैनी यांनी केला. इतकेच नव्हे तर झुरळांचे आयुष्य तरी किती असते? असा टोलाही त्यांनी लगावला.
देशातील तरुण नाराज नाहीत, सैनी काय म्हणाले?
कॉक्रोच जनता पार्टीच्या व्यंगात्मक मोहिमेद्वारे विरोधकांकडून अपप्रचार केला जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी केला. दिल्लीतील एका कार्यक्रमात संवाद साधताना मोदी सरकारविरोधात देशातील तरुणांमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचा दावाही त्यांनी केला. “आज सकाळीही मी अनेक तरुणांशी संवाद साधला आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मात्र, तरुणांमध्ये कोणतीही निराशा मला दिसली नाही. एकाही तरुणाने आपण नाराज किंवा वैफल्यग्रस्त असल्याचे सांगितले नाही,” असे सैनी म्हणाले. यादरम्यान लोकसभा निवडणुकांपूर्वी विरोधकांनी राबवलेल्या प्रचारमोहिमेवरही त्यांनी टीका केली.
मुख्यमंत्री सैनी यांचा नेमका आरोप काय?
“२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ४०० पेक्षा जास्त जागा मिळाल्यास संविधान धोक्यात येईल, असा प्रचार विरोधकांनी केला होता. त्यावेळी हातात संविधानाची प्रत घेऊन संविधान बचावचा नारा देणारे काँग्रेस नेते हे विसरले होते की, त्यांच्याच पक्षाच्या सरकारने भूतकाळात संविधानात अनेक बदल केले होते. त्यांच्यासाठी ही स्क्रिप्ट कोण लिहितंय, हे मला माहिती नाही,” अशी टीकाही त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या साडेअकरा वर्षांत संविधानाच्या संरक्षणासाठी अनेक पावले उचलल्याचा दावा सैनी केला. “कलम ३७० हटवण्यात आले, तेव्हा ‘एक देश, एक संविधान’ ही संकल्पना मजबूत करण्यासाठी संविधानाचेच संरक्षण करण्यात आले,” असेही ते म्हणाले. २०२४ लोकसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने भाजपाच्या ‘४०० पार’च्या घोषणेवर टीका करताना त्यामागे संविधानात बदल करण्याचा हेतू असल्याचा आरोप केला होता.
आगामी निवडणुकीत भाजपाचा चेहरा कोण?
पंजाबचा वारंवार दौरा करणारे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी माध्यमांशी संवाद साधताना एक मोठा दावा केला. पुढील वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पक्षाचा मुख्य चेहरा असतील. पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रमाणे भाजपाला ‘प्रचंड विजय’ मिळाला आणि त्यांनी पहिल्यांदाच सरकार स्थापन केले, त्याच धर्तीवर पंजाबमध्येही निवडणूक लढवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पंजाबमध्ये दीर्घकाळ शिरोमणी अकाली दलासोबत धाकटा भाऊ म्हणून भूमिका बजावणाऱ्या भाजपाने २०२४ ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवली होती. २०२१ मध्ये केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांवरून (जे आता मागे घेण्यात आले आहेत) अकाली दलाने युती तोडली होती. मात्र, या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पंजाबमध्ये एकही जागा जिंकता आली नव्हती. आता पंजाबमध्ये भाजपासाठी सैनी हे एक महत्त्वाचे नेते म्हणून पाहिले जात आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की, हरियाणा आणि पंजाब हे एकच आहेत. पंजाबमधील जनता हरियाणाच्या विकास आणि प्रशासकीय मॉडेलचे बारीक निरीक्षण करत आहे, असा दावाही त्यांनी केला.
नायब सिंह सैनी यांचे पंजाबशी असलेले नाते
हरियाणात दिलेली आश्वासने कशी पूर्ण केली जातात, हे पंजाबचे लोक पाहत आहेत. दुसरीकडे, पंजाबमधील भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचे सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे,” अशी टीका सैनी यांनी केली. सध्या ११७ सदस्यांचे संख्याबळ असलेल्या पंजाब विधानसभेत भाजपाकडे केवळ दोन जागा आहेत. सैनी हे हरियाणातील प्रभावशाली इतर मागासवर्गीय समुदायातून येतात, तसेच त्यांची आई जाट शीख समाजातील असून, पंजाबमध्ये या समाजाची लोकसंख्या सुमारे २० ते ३० टक्के असल्याचे मानले जाते. पंजाबमधील पूरपरिस्थिती दरम्यान हरियाणाने केलेल्या मदतीचा उल्लेख करत सैनी म्हणाले की, हरियाणातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना पंजाबमधील ठराविक भाग दत्तक घेण्याचे आणि शक्य तिथे मदत करण्याचे आदेश आमच्या सरकारने दिले होते. पंजाबमध्ये भाजपाकडे भक्कम स्थानिक नेतृत्वाचा अभाव असल्याच्या मुद्द्यावर बोलताना सैनी यांनी पुन्हा एकदा पश्चिम बंगालचे उदाहरण दिले. आम्ही पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यासह निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. पश्चिम बंगालमध्येही आम्ही तेच केले आणि आज तिथे सुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
