What is the outcome of Raj Thackerays visit to West Vidarbha | Loksatta

पश्चिम विदर्भात राज ठाकरे यांच्या दौऱ्याचे फलीत काय ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नुकतचं पाच दिवसीय विदर्भ दौऱ्यावर जाऊन आले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीसाठी ठाकरे यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानण्यात येत आहे.

पश्चिम विदर्भात राज ठाकरे यांच्या दौऱ्याचे फलीत काय ?
पश्चिम विदर्भात राज ठाकरे यांच्या दौऱ्याचे फलीत काय

विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये सातत्याने प्रयत्न करूनही अपेक्षित यश मिळत नसल्याने पक्षसंघटनात्मक बांधणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पश्चिम विदर्भात हालचाली सुरू केल्या असल्या तरी, कार्यकर्त्यांशी थेट संवादाविना अमरावतीत पार पडलेल्या बैठकीचे फलीत काय, असा प्रश्न चर्चेत आला आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या दोन दिवसांच्या अमरावती मुक्कामी विभागातील अकोला यवतमाळ ,वाशीम, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी किमान तासभर संवाद साधण्याचे नियोजन होते. प्रत्यक्षात त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकत्रित संबोधित केले. आपला पक्ष वाढावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तीचे उदाहरण दिले. अवघ्या दहा मिनिटात राज ठाकरे यांचे मार्गदर्शन आटोपले. दुसऱ्या दिवशी निवडक पदाधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. महाविद्यालयीन मित्र असलेल्या विजय राऊत यांच्या ॲनिमेशन कॉलेजला भेट दिली आणि नंतर मुंबईला रवाना झाले. त्यांच्या भोवती पूर्णवेळ मुंबईहून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा गराडा होता. पश्चिम विदर्भातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते भेटीच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे होते, पण त्यांना चर्चेची संधीच मिळू शकली नाही.

हेही वाचा- ठरलं! अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, राजस्थानचं नेतृत्व कोणाकडे?

मनसेने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विभागातील अकोट, रिसोड, कारंजा, वणी, पुसद आणि उमरखेड या सहा मतदार संघांमध्ये उमेदवार दिले होते. पण, वणीचा अपवाद वगळता एकाही मतदार संघात मनसेला पहिल्या पाच मध्ये स्थान मिळू शकले नाही. मतांची टक्केवारी १ टक्क्यांहूनही कमी होती. केवळ वणीत चौथ्या क्रमांकाची ७.७१ टक्के मिळाली होती. अमरावती, अकोला महापालिका तसेच जिल्हा परिषदांमध्येही मनसेचे इंजिन धावू शकले नाही. पक्षाची स्थापना होऊन सोळा वर्षे झाली, तरी मनसेला पश्चिम विदर्भात जनाधार का मिळू शकत नाही, हा मनसेच्या पदाधिकाऱ्यांसाठी आत्मपरीक्षणाचा विषय बनला आहे.

उत्स्फूर्त आणि लढाऊ कृती हे मनसेचे वैशिष्ट्य राहिले. आपल्या कार्यकर्त्यांना मनसे थेटपणे कृती करून कायदा हाती घेण्यासाठी प्रोत्साहन देते, अशीही टीका होते. आजवर विरोधी पक्ष म्हणून वावरण्याची संधी मनसेला प्राप्त झाली.सुरूवातीच्या काळात दिसलेली मनसेच्या आंदोलनांमधील धार कमी झाल्याचे चित्र दिसले. त्या तुलनेत पश्चिम विदर्भात बच्चू कडू, रवी राणा यांच्यासारख्या नेत्यांनी‍ अधिक आक्रमकपणे आपल्या छोट्या पक्षांच्या विस्तारासाठी प्रयत्न केल्याचे दिसून आले. राज्यपातळीवर शिवसेनेसोबत तर वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि सत्तास्पर्धा यांच्या पलीकडचे मुद्दे असताना पश्चिम विदर्भात मनसे आणि शिवसेनेमध्ये फारसा संघर्षाचा इतिहास नाही. काही ठिकाणी भाजपसोबत मनसे कार्यकर्त्यांचे खटके उडाले होते.
आपल्या प्रभावक्षेत्राचा विस्तार करण्यासाठी मनसेने आता सुरूवात केली आहे. पण, आता ठिकठिकाणी ‘नवहिंदुत्ववादी’ संघटना पसरू लागल्या आहेत. अशा स्थितीत मनसेला कितपत ‘स्पेस’ मिळू शकेल याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा- बाळासाहेब ठाकरे ४६ वर्षे तर करुणानिधी ५० वर्षापेक्षा अधिक पक्षाचे प्रमुख

संघटनात्मक बांधणीसाठी आता पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या वर्षभरासाठी प्रायोगिक तत्वावर केल्या जातील. जो पक्ष बांधणी करेल, त्यालाच मनसेची उमेदवारी मिळेल, असे राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. कार्यकर्त्यांशी कुठलीही चर्चा न होता आटोपलेल्या राज ठाकरे यांच्या दौऱ्यातून काय साध्य झाले, याविषयी मनसेचे कार्यकर्तेच संभ्रमात असल्याचे चित्र दिसून आले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
ठरलं! अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, राजस्थानचं नेतृत्व कोणाकडे?

संबंधित बातम्या

दादा भुसेंच्या पुत्राच्या वाढदिवस फलकांनी भाजप अस्वस्थ
कोल्हापूर दौऱ्यात राजकीय परीघ रुंदावण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न
“पंतप्रधान पदासाठी नितीश कुमारांनी धोका दिला”, अमित शाह यांचा हल्लाबोल, म्हणाले, “लालूजी तुम्हाला फसवून…”
काश्मीरमधील परिस्थितीला तीन घराणे जबाबदार, अमित शाह यांचा गंभीर आरोप
पालकमंत्री उदय सामंतांच्या सामोपचाराच्या भूमिकेमुळे ‘नियोजन’ची बैठक खेळीमेळीत

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई: शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत भाजप आमदाराचे अज्ञान; विरोधी पक्ष आक्रमक झाल्याने दिलगिरी
मुंबई: राज्य औषध व्यवसाय परिषदेला राजकीय कुरघोडीची बाधा
दुर्धर व्याधीग्रस्त रुग्णांसाठी जिल्हास्तरावर विशेष उपचार केंद्र; रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न
मुंबई: गोवरची विशेष लसमात्रा आवश्यकच ;बालरोगतज्ज्ञांचे स्पष्टीकरण
मुंबई अग्निशमन दलात लवकरच भरती