नव्या संसद भवनाच्या उदघाटनाप्रसंगी रविवारी (दि. २८ मे) विनायक दामोदर सावरकर यांचीही जयंती होती. सावरकरांच्या जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उदघाटन केल्यामुळे अनेक विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे निर्भय वृत्तीचे आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्त्व होते. गुलामगिरी कदापिही मान्य नसलेली त्यांची मानसिकता होती,’’ असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. तर काँग्रेसचे नेते, खासदार जयराम रमेश यांनी ट्वीट करीत म्हटले, "२८ मे, आजच्याच दिवशी : भारताच्या संसदीय लोकशाहीचे पालनपोषण करणाऱ्या नेहरूंवर १९६४ साली अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तर ज्यांच्या वैचारिक पेरणीमुळे महात्मा गांधींची हत्या झाली, त्या सावरकरांचा जन्म आजच्या दिवशी १८८३ साली झाला होता." (नेहरूंचे निधन २७ मे रोजी झाले होते, दुसऱ्या दिवशी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.) योगायोगाने आज माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा स्मृतिदिन आहे. चौधरी चरण सिंह हेदेखील एकदा सावरकर यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या वादात सापडले होते. चरण सिंह यांनी १९६७ साली उत्तर प्रदेशमध्ये पहिले बिगरकाँग्रेसी सरकार स्थापन केले होते. त्यानंतर १८ फेब्रुवारी १९७० रोजी त्यांनी इंदिरा काँग्रेससोबत युती करीत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवले होते. त्याच वर्षी २७ मे रोजी बदायूँ येथील भारतीय जन संघाचे नेते क्रिशन स्वरूप यांनी विधानसभेत सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, उद्या (२८ मे) होत असलेल्या सावरकर जयंतीचा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी समिती स्थापन केली आहे किंवा करण्याचा विचार आहे का? त्या वेळी माहिती विभागाचे मंत्री गेंदा सिह यांनी असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे म्हटले. हे वाचा >> ‘वीर सावरकर : सिक्रेट फाइल्स’ वेब सीरिजची घोषणा; मराठमोळा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर शेअर करीत म्हणाला… मंत्र्यांच्या उत्तरानंतर स्वरूप यांनी आपली मागणी रेटून धरली. त्या वेळी मुख्यमंत्री असलेल्या चरण सिंह यांनी सांगितले की, जनसंघाच्या नेत्यांनी याआधीदेखील अशी मागणी केली होती, त्यावर मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. स्वरूप यांना याबाबत लिहिलेल्या पत्रात चरण सिंह यांनी म्हटले की, तुमची सूचना योग्य आहे, मात्र इतक्या कमी वेळात असा कार्यक्रम आयोजित करणे शक्य नाही. त्यानंतर स्वरूप यांनी पुन्हा विचारले की, पुढील वर्षी (१९७१) सरकार जयंतीचा कार्यक्रम आयोजित करणार का? या प्रश्नावर बोलत असताना मुख्यमंत्री म्हणाले, "सावरकर यांनी केलेला त्याग हा शंका घेण्याच्या पलीकडचा आहे. मात्र प्रश्न असा आहे की, आपण अशा किती लोकांची जयंती सरकारी पातळीवर साजरी करणार आहोत? प्रत्येकानेच सर्वोच्च त्याग केलेला आहे. जर कोणती बिगरसरकारी संस्था अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करणार असेल तर त्याला सरकार मदत करायला तयार आहे. पण सरकारने या गोष्टी करण्याबाबत कोणताही विचार केलेला नाही." जनसंघाचे आमदार नित्यानंद स्वामी हे उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री बनले होते. त्या वेळी त्यांना चरण सिंह यांनी सावरकरांच्या जयंतीनिमित्त व्यक्त केलेल्या मताबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा नित्यानंद स्वामी यांनी सांगितले की, देशात अनेक महान लोक होऊन गेले, त्यामध्ये सावरकरांचे स्थान नक्कीच सर्वात वरचे आहे. मात्र सरकारच्याही काही अडचणी असतात. मला सावरकरांची जयंती साजरी करण्यास कोणतीही अडचण नाही. पण प्रश्न फक्त आपल्या राज्याचा नसून संपूर्ण देशाचा आहे. उद्या राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांच्याही जयंती साजरी करण्याबाबत मागण्या पुढे येऊ शकतात. हे वाचा >> VIDEO : वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सेतू’ नाव देण्याचा निर्णय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातही सावरकरांवरून वाद निर्माण झाला होता. २००३ साली संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सावरकरांचे तैलचित्र बसविण्याच्या निर्णयावरून देशभरात आंदोलने झाली होती. या कार्यक्रमावरही अनेक पक्षांनी बहिष्कार घातला होता. जानेवारी २०२१ मध्ये, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधान परिषदेत छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन केले होते. त्या वेळी एक सावरकर यांचे एक तैलचित्र त्या ठिकाणी होते. आदित्यनाथ यांचे गुरू महंत दिग्विजय नाथ हे हिंदू महासभेचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष असताना सावरकर या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.