scorecardresearch

विधान परिषदेवरील १२ आमदारांची नियुक्ती कधी ?

नव्या राज्यपालांची नियुक्ती करून आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी या नियुक्त्या केल्या जातील, असे समजते.

विधान परिषदेवरील १२ आमदारांची नियुक्ती कधी ?
विधान परिषदेवरील १२ आमदारांची नियुक्ती कधी ?

संतोष प्रधान

महाविकास आघाडी सरकारच्या काळात विधान परिषदेवर १२ आमदारांच्या नियुक्तीची देण्यात आलेली यादी रद्द करण्याची शिफारस शिंदे सरकारने केल्याने नव्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. पण या नियुक्त्या कधी आणि कोण करणार याचीच चर्चा जास्त आहे. नव्या राज्यपालांची नियुक्ती करून आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी या नियुक्त्या केल्या जातील, असे समजते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सारे लक्ष्य आता विधान परिषद सभापतीपद आणि उपसभापतीपदावर आहे. पण त्यासाठी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती करावी लागेल. यासाठी आधीच्या महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेली यादी रद्द करण्याची शिफारस मंत्रिमंडळाने केली. त्यानुसार राजभवनने ती यादी रद्द केल्याचे समजते.

हेही वाचा… सांगलीत भाजपकडून सव्याज परतफेड

विधान परिषदेत भाजपचे सध्या २४ आमदार आहेत. शिवसेना १२, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी १० असे महाविकास आघाडीचे ३२ आमदार आहेत. १५ जागा सध्या रिक्त आहेत. राज्यपाल नियुक्त १२ जागा भरल्याशिवाय भाजपचा सभापती निवडून येऊ शकत नाही. यासाठीच जुनी यादी रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

हेही वाचा… कुकडी प्रकल्पातील पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे, नगर विरुद्ध पुणे वादाची फोडणी

आगामी हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होणार आहे. त्याला अद्याप तीन महिन्यांचा कालावधी आहे. या काळात राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती केली जाईल. भाजपमधील सूत्रानुसार राज्यपाल कोश्यारी यांनी या नियुक्त्या केल्यास विरोधकांना टीका करण्याची आयती संधीच मिळेल. कारण कोश्यारी यांनी महाविकास आघाडीने शिफारस केलेल्या १२ नावांवर सरकार असेपर्यंत दीड वर्षे काहीच निर्णय घेतला नव्हता. सरकार बदलल्यावर याच कोश्यारी यांनी १२ जणांची नियुक्ती केल्यास राज्यपालांवर टीका होऊ शकते. तसेच भाजप आणि शिंदे हे टीकेचे धनी होऊ शकतात. यातूनच कोश्यारी यांची महाराष्ट्रातून अन्यत्र बदली केली जाणार असल्याची चर्चा आहे. नव्या राज्यपालांची नियुक्ती करून १२ जणांची विधान परिषदेवर नियुक्ती केली जाईल, अशी माहिती भाजपमधील सूत्रांकडून देण्यात आली. साधारणत: दिवाळीनंतर नवीन राज्यपालांची नियुक्ती होऊ शकते, असेही सांगण्यात आले. राज्यपाल कोश्यारी यांनी १२ जणांची नियुक्ती केली तरी त्यात कायदेशीर अडथळा काहीच नाही. फक्त राज्यपालांवर टीका होईल. राज्यपालांवर शक्यतो टीकाटिप्पणी केली जाऊ नये, असे संकेत असतात. अलीकडे राज्यपाल या पदाने साऱ्या लक्ष्मण रेषा ओलांडल्याने घटनात्मक प्रमुख पदावरही आरोप किंवा टीका होऊ लागली आहे. कोश्यारी यांच्या राज्यपालपदाचा राज्यातील तीन वर्षांचा कालावधी नुकताच पूर्ण झाला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: When will 12 mlas of the legislative council be appointed print politics news asj

ताज्या बातम्या