Cockroach Janata Party founder Abhijeet Dipke : कॉक्रोच जनता पार्टी या नावाने राजकीय व्यंग चळवळ सुरू केल्यानंतर जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे अभिजीत दीपके यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. या चळवळीमुळे माझ्या कुटुंबाला काहीही होऊ नये, कारण हा मार्ग निवडण्याचा निर्णय मी घेतला आहे. त्यांनी नाही, असे अभिजीत दीपके म्हणाले. ३० वर्षीय अभिजीत दीपके सध्या अमेरिकेतील बोस्टनमध्ये असून ते पब्लिक रिलेशन्सचे शिक्षण घेत आहेत. त्यांचे कुटुंब छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. “मला आणि भारतातील माझ्या कुटुंबाला सतत धमक्या दिल्या जात आहेत. मला नुकताच एक व्हिडिओ मिळाला. त्यात एक व्यक्ती माझ्या घराबाहेर उभी राहून मला धमकी देतेय. संध्याकाळपर्यंत काय घडतं ते तू बघ, अशी धमकी मला देण्यात आली”, असे दीपके म्हणाले.
सरन्यायाधीशांचं एक वक्तव्य आणि कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी “व्यवस्थेवर हल्ला करणाऱ्यां”बाबत वक्तव्य केल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टी ही व्यंगात्मक चळवळ सुरू झाली. १५ मे रोजी सरन्यायाधीशांनी एका वकिलाला चांगलेच सुनावले होते. तो वकील वरिष्ठ अधिवक्ता या पदासाठी इच्छुक होता. या पदासाठी असा पिच्छा पुरवणे योग्य दिसते का? असा प्रश्न सरन्यायाधीशांनी त्या वकीलाला विचारला. ते म्हणाले, “समाजात आधीच असे अनेक परजीवी (parasites) आहेत जे व्यवस्थेवर सतत हल्ले करत असतात. तुम्हाला त्यांच्याशी हातमिळवणी करायची आहे का? झुरळांसारखे काही तरुण आहेत. ज्यांना कोणताही रोजगार मिळत नाही किंवा या व्यवसायात (वकिलीत) स्थान मिळत नाही. त्यातील काही जण मीडियात जातात, काही जण सोशल मीडियात जातात, तर काही माहिती अधिकार (RTI) कार्यकर्ते आणि इतर प्रकारचे कार्यकर्ते बनतात आणि प्रत्येकावर हल्ले करू लागतात.”
सरन्यायाधीशांच्या या विधानानंतर मोठा गदारोळ झाला. स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “ज्या लोकांनी बनावट आणि बोगस पदव्यांचा वापर करून वकीली व्यवसायात प्रवेश केला, त्यांच्यावर मी टीका केली होती. असेच काही लोक सोशल मिडिया आणि इतर व्यवसायात गेले आहेत. त्यामुळे ते परजीवींसारखे आहेत. मी आपल्या देशातील तरूणांवर टीका केली हे पूर्णपणे तथ्यहीन आहे. देशातील प्रत्येक तरूण माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे.”, असे सरन्यायाधीश म्हणाले होते.
दीपके यांनी सरन्यायाधीशांच्या वक्तव्यावर टीका करत “कॉक्रोचेस”साठी एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार केला. कॉक्रोच जनता पार्टीचे एक्स अकाउंट बंद करण्यात आले. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने ही कारवाई केली होती. गुप्तचर यंत्रणांकडून “राष्ट्रीय सुरक्षेबाबत” अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. “फक्त मत व्यक्त केल्यामुळे कोणाच्याही कुटुंबाला अशा प्रकारचा त्रास होऊ नये”, असे दीपके म्हणाले.
जेन झी तरूणाई अभिजीत दीपकेंना काय सांगतेय?
व्हिसा तसेच अमेरिकेत कधीपर्यंत राहण्याची मुदत आहे, असे अभिजीत दीपके यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, “माझ्याकडे फूल व्हिसा आहे. व्हिसानुसार जुलैपर्यंत अमेरिकेत राहण्याचा पर्याय माझ्याकडे आहे. काही कालावधीनंतर मला भारतात परतावे लागणार आहे. ‘हा स्वत: अमेरिकेत बसलेला आहे, आणि आपल्याला काय सल्ला देतोय?’ असा प्रश्न काही जण विचारत आहेत”, असे दीपके म्हणाले. “भविष्यात काय करायचे आहे याचे कोणतेही नियोजन केलेले नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा नव्हती. मी काही महत्वाच्या लोकांना भेटणार आहे, जेणेकरून पुढे काय करायचे ते ठरवता येईल. ‘आता तू काहीतरी सुरू केलं आहे, माघार घेऊ नकोस’ असं जेन झी मला सांगत आहेत”, असेही दीपके म्हणाले.
कॉक्रोच जनता पार्टी राजकारणात येणार?
“पार्टी”ची नोंदणी करणार आहे का याबाबत विचारले असता दीपके म्हणाले, “मी अद्याप याबाबत विचार केला नाही. ही सगळं एक व्यंग म्हणून सुरू झालं. पण, लोकांचं म्हणणं काय आहे ते बघुयात. आम्ही लोकांकडून सल्ला घेत आहोत. यातून कसा मार्ग निघतो ते आम्ही पाहत आहोत. पण, याबाबत आत्ता काही बोलणं खूप घाईचे ठरेल. एखाद्या दबाव टाकणाऱ्या राजकीय आघाडीप्रमाणे आम्ही सध्या काम करू. सध्या तरी मी एवढाच विचार केला आहे.”, असे दीपके यांनी सांगितले.
अभिजीत दीपके आणि आम आदमी पक्ष
अमेरिकेत जाण्यापूर्वी दिपके यांनी आम आदमी पार्टी (AAP) सोबत काम केले होते. ते दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कार्यालयाशी संलग्न होते आणि करोनादरम्यान त्यांनी आप (AAP) नेत्यांचे कम्युनिकेशन हँडल्स सांभाळले होते. ‘आप’मधील एका अंतर्गत सूत्राने दिपके यांचे वर्णन “एक आंबेडकरवादी” कार्यकर्ता असे केले आहे. “आमच्यापैकी फार कमी लोक त्यांना वैयक्तिकरित्या भेटले होते, कारण ‘आप’सोबतच्या त्यांच्या बहुतांश कार्यकाळात त्यांनी पुण्यातूनच काम पाहिले होते; परंतु पक्षाच्या वर्तुळात ते एक ‘स्टार प्रचारक’ म्हणून ओळखले जात. पक्ष आणि नेत्यांचे, विशेषतः मनीष सिसोदिया यांचे त्यांनी सोशल मीडिया कम्युनिकेशन सांभाळले होते” असे ‘आप’च्या एका सूत्राने सांगितले.
