चंद्रशेखर बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत महापालिका निवडणूक आहे म्हणून तेथील दोन नेत्यांना विधान परिषदेची उमेदवारी देतांना प्रदेश काँग्रेसने पक्षाला सर्वाधिक १५ आमदार निवडून देणाऱ्या विदर्भावर अन्याय केला आहे.महापालिका निवडणुका विदर्भातील नागपूर व अमरावती या दोन प्रमुख शहरांत असून त्या पक्षासाठी मुंबई इतक्याच किंवा अधिक महत्त्वाच्या आहेत.कारण विदर्भ हा काँग्रेसचा एकेकाळी गड राहिलेला आहे. त्याला भाजपने धक्के दिले तरी अजूनही काँग्रेसची पकड पूर्णपणे सुटली नाही. कुठलीही संघटनात्मक बांधणी नसताना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विदर्भातून काँग्रेसला १५ जागा मिळाल्या. राज्यात ४४ जागा मिळाल्या, त्यात विदर्भाचे योगदान सर्वाधिक आहे. नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीतही पक्षाची कामगिरी सरस ठरली.या बाबीमुळे पक्षाची पाळेमुळे विदर्भात खोलवर रुजली आहेत हे स्पष्ट होते.

‌ही पार्श्वभूमी लक्षात घेता काँग्रेसने विदर्भावर अधिक लक्ष केंद्रित करणे अपेक्षित होते.विशेषत: विधान परिषदेसाठी उमेदवार निश्चित करताना जो विचार मुंबईसाठी करण्यात आला तोच विचार विदर्भातील महापालिकांबाबत करून या भागातील नेत्यांना संधी देता आली असती. कारण भाजप प्रयत्नपूर्वक विदर्भातील नेत्यांना संधी देण्याचा प्रयत्न करीत आहे. पक्षाने अनिल बोंडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली.त्यापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेत संधी दिली होती. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला संधी होती.कारण विदर्भात नागपूर ही महत्त्वाची महापालिका आहे.१५ वर्षांपासून येथे भाजपची सत्ता आहे. भाजप नेते गडकरी,फडणवीस यांचे शहर आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी येथील युवा नेत्याला संधी दिली असती तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असता

त्याचा फायदा निवडणुकीत झाला असता. ही संधी काँग्रेसने गमावली आहे. प्रदेशाध्यक्ष विदर्भातील असताना ही वेळ यावी याचे आश्चर्य कार्यकर्त्यांना वाटत आहे. मुंबईत शिवसेनेनंतर भाजपचा क्रम लागतो, त्यानंतर काँग्रेसचा क्रमांक लागतो. नागपुरात शिवसेनेला स्थान नाही. नागपूर महापालिकेत १५ वर्ष सत्ता असल्याने भाजप विरुद्ध नाराजी आहे.त्याचे राजकीय भांडवल काँग्रेस हितासाठी करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेसाठी उमेदवार ठरवताना विदर्भाचा विचार होणे क्रमप्राप्त होते,अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: While giving candidature for vindhanparishad election congress gave less attenuation to vidharbh print politics news pkd
First published on: 12-06-2022 at 09:55 IST