Mohan Bhagwat statement on Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी कोण होणार, याची चर्चा सातत्याने होताना दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांनी वयाची पंचाहत्तरी ओलांडल्यानंतर या चर्चांना उधाण आले आहे. भाजपाने या प्रश्नावर आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. २०१९ ची लोकसभा निवडणूक भाजपा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच लढेल हे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनादेखील या संदर्भात थेट प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी यावर दिलेल्या उत्तराची सध्या चर्चा होत आहे. काय म्हणाले मोहन भागवत? त्यांनी यापूर्वी मोदींच्या निवृत्तीविषयी काय वक्तव्य केले होते? त्यांची भूमिका काय? जाणून घेऊयात…
मोहन भागवत काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तराधिकाऱ्याबद्दल सरसंघचालक मोहन भागवत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यांना पुढील पंतप्रधान कोण असतील, असा थेट प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मोहन भागवत यांनी अतिशय सावध भूमिका घेतली. त्यांनी सांगितले की, या मुद्द्यावर विचारमंथन करून निर्णय घेणे पंतप्रधान आणि भाजपावर अवलंबून आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)चा शताब्दी सोहळा तमिळनाडूची राजधानी चेन्नई येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत उपस्थित होते.
त्या कार्यक्रमात भागवत म्हणाले, “काही प्रश्न माझ्या कक्षेबाहेर आहेत. त्यामुळे त्यावर माझे काहीही म्हणणे नाही. मी फक्त शुभेच्छा देऊ शकतो, दुसरं काही नाही. मोदीजींनंतर कोण? हा निर्णय भाजपा आणि मोदीजींनी घ्यायचा आहे.” मोहन भागवत यांचे हे विधान महत्त्वाचे आहे. कारण- गेल्या चार महिन्यांत ही दुसरी वेळ आहे जेव्हा त्यांनी भाजपामधील अघोषित नियम म्हणजे ७५ वर्षांनंतर निवृत्त होणे आणि मोदींनंतर कोण यासंबंधीच्या प्रश्नांवर कोणतेही वक्तव्य करण्यास नकार दिला आहे.
ऑगस्टमध्ये भागवत म्हणाले होते की, त्यांनी कधीही ‘मी किंवा कोणीही ७५ व्या वर्षी निवृत्त व्हावे’ याचे समर्थन केलेले नाही. पंतप्रधान मोदी यांनी सप्टेंबरमध्ये पंचाहत्तरी ओलांडल्यानंतर निवृत्तीबद्दलच्या चर्चेला महत्त्व आले होते. भाजपाने स्पष्ट केले आहे की, पक्षामध्ये कोणत्याही विशिष्ट वयात निवृत्ती घ्या, असे सांगणारा नियम नाही.
मंदिर व्यवस्थापनाबाबत महत्त्वाचे विधान
याच संवादादरम्यान सरसंघचालकांनी सांगितले की, सध्या मंदिरांचे व्यवस्थापन सरकारद्वारे केले जाते. ही पद्धत बदलून मंदिर व्यवस्थापन भक्तांनीच सांभाळावे. “काही मंदिरांचे व्यवस्थापन खासगी व्यक्तींकडून चांगले चालते; तर काहींचे नाही. त्याचप्रमाणे काही मंदिरांचे व्यवस्थापन सरकारद्वारे चांगले चालते; तर काहींचे नाही. सध्या गरज आहे एका यंत्रणेची. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एक अखिल भारतीय समिती, प्रांतीय समिती, जिल्हा समिती व स्थानिक समिती असावी,” असे भागवत म्हणाले.
एकदा ही यंत्रणा तयार झाली की, मंदिरांचे व्यवस्थापन सरकारऐवजी भक्तांनी करावे याबद्दलचे सर्व प्रश्न निकाली लागतील, असे ते म्हणाले. तमीळ तरुणांमध्ये राष्ट्रवादाची भावना रुजवण्यासाठी काय केले पाहिजे यासंबंधीच्या प्रश्नावर भागवत म्हणाले की, राज्यात राष्ट्रवाद आणि आरएसएसबद्दल तरुणांमध्ये गैरसमज आहेत. “एकदा त्यांना आमच्या कार्याचा परिचय झाला की, सर्व गैरसमज दूर होतील. त्यांना आमच्या कामाबद्दल कळल्यावर दोन दिवसांत ते सर्व विसरतील. त्यांना आतून काम समजून घेण्याची संधी द्यायला हवी. कृत्रिम अडथळे दूर करून तमिळनाडूतील तरुणांमध्ये राष्ट्रवादी भावना निर्माण करण्यासाठी योग्य वातावरण तयार करणे एवढेच आपल्याला करायचे आहे,” असे त्यांनी सांगितले.
७५ व्या वर्षी निवृत्ती घेण्याविषयी मोहन भागवत यापूर्वी काय म्हणाले होते?
सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोरोपंत पिंगळेंची आठवण सांगत पंचाहत्तरीबाबत एक विधान केले होते. “पंचाहत्तरीची शाल अंगावर आली की, निवृत्त व्हायचं असतं” असे मोहन भागवत यांनी पुस्तक प्रकाशनाच्या एका कार्यक्रमात म्हटले होते. मोरोपंत पिंगळे यांना निवृत्त होण्यास सांगण्यात आले तेव्हा ते निवृत्त झाले, असेही मोहन भागवत म्हणाले होते. मोहन भागवत यांच्या या विधानाची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले होते.
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले होते, “७५ वर्षे हे भाजपातलं निवृत्तीचं वय आहे. लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग यांच्यावर स्वतःच्या स्वार्थासाठी निवृत्ती लादली. आता सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे होत आहेत. त्यांची दाढी पिकली आहे, त्यांच्या डोक्यावरचे केसही उडाले आहेत. जगभ्रमण करून झालं आहे. सगळी सुखं भोगून झाली आहेत आणि तुम्हीच तर ७५ वर्षे वयाचा नियम केला आहे. मला वाटतं की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना सूचित करत आहे की तुम्हाला निवृत्त व्हावं लागेल.” संजय राऊत यांच्यासह इतरही विरोधी पक्षनेत्यांनी याबाबत पंतप्रधान मोदींवर टीका केली होती.
