तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी अर्थसंकल्पाच्या आधी रुपयाचं चिन्ह (₹) याऐवजी रुबई या शब्दातील रु वापरण्याचा निर्णय अर्थसंकल्पासाठी वापरण्यासाठी घेतला आहे. १४ मार्चला तामिळनाडूच्या विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्याआधी अर्थसंकल्पासाठी (₹) हे चिन्ह न घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. आपण जाणून घेऊ या चिन्हाबाबत.
₹ हे चिन्ह भारतीय चलनासाठी कधीपासून वापरलं जातं आहे?
₹ हे चिन्ह भारतीय चलनातील रुपयांसाठी १५ जुलै २०१० पासून वापरलं जातं आहे. याच दिवशी केंद्र सरकारने हे चिन्ह जाहीर केलं होतं. या चिन्हापूर्वी Rs किंवा Re या चिन्हांचा वापर होत होता. हे चिन्ह राष्ट्रीय चलनाचं चिन्ह म्हणून भारतातल्या राज्याने नाकारण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भाजपाची या निर्णयावर टीका

भाजपाचे तामिळनाडूचे भाजपाचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी रुपयाचे चिन्ह बदलण्याच्या निर्णयावरून मुख्यमंत्री स्टॅलिन आणि तमिळनाडू सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, “डीएमके सरकारचा राज्याचा अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये तमिळ व्यक्तीने बनवलेले रुपयाचे चिन्ह बदलण्यात आले, जे की संपूर्ण भारताने स्वीकारले आणि आपल्या चलनात समाविष्ट केले.” तसेच या चिन्हाची रचना करणारे उदय कुमार हे डीएमकेच्या माजी आमदाराचे पुत्र असल्याची बाबा नमूद करत अन्नामलाई यांनी विचारले, “एमके स्टॅलिन तुम्ही आणखी किती मूर्ख होणार?” अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

२०१० मध्येच ₹ हे चिन्ह केंद्र सरकारने चलनासाठी स्वीकारलं

अमेरिका, रशिया, इंग्लंड याचप्रमाणे युरोपमधल्या देशांतील चलन हे त्यांच्या चिन्हाप्रमाणे ओळखलं जातं. तसंच चलन चिन्ह भारतासाठी असावं असा प्रस्ताव २००९ मध्ये मांडण्यात आला. त्यानंतर २०१० मध्ये भारतीय चलनासाठी ₹ हे चिन्ह स्वीकारण्यात आलं. रुपयाला ₹ हे चिन्ह मिळवण्यासाठी सरकारने त्यावेळी ३ हजार चिन्हांपैकी उदय कुमार धर्मलिंगम यांनी दिलेलं ₹ हे डिझाईन स्वीकारलं. रुपयाचे ₹ हे चिन्ह स्वीकारण्यामागे र आणि रोमन लिपीतील R यांचं मिश्रण असल्याचं प्रमुख कारण आहे. तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरील चलन म्हणजेच पौंड, युरो, येन, डॉलर यांच्या चिन्हाशी आपल्या देशातील रुपयाचं ₹ हे चिन्ह साधर्म्य सांगणारं आहे त्यामुळे या चिन्हाची निवड झाली.

₹ हे चिन्ह आपल्याला कुठे पाहण्यास मिळतं?

₹ हे चिन्ह आपल्याला नाणी, चलनी नोटा यांवर म्हणजेच भारतातील प्रत्येक चलनावर पाहण्यास मिळतं.

भारतीय डाक विभागाने त्यांच्या पोस्ट तिकिटांवरही ₹ हे चिन्ह छापण्यास सुरुवात केली आहे.

₹ हे चिन्हाचं डिझाईन बदलण्याचा अधिकार कुणाकडे आहे?

२०१० मध्ये जेव्हा ₹ हे चिन्ह भारतीय चलनासाठी प्रसिद्ध करण्यात आलं त्यानंतर या चिन्हात बदल करण्याचे अधिकार हे फक्त केंद्र सरकारकडे आहेत. कुठल्याही राज्य सरकारांनी चिन्हात बदल करणे अपेक्षित नाही. यासंदर्भातली तरतूद ही संविधानात आहे.

निर्मला सीतारमण यांची स्टॅलिन सरकावर टीका

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, “भारतीय चलनाचं ₹ हे चिन्ह अर्थसकंल्पासाठी बदलणं हे स्टॅलिन सरकारने जी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली त्या शपथेच्या विरोधात आहे. स्टॅलिन सरकारची मानसिकता अत्यंत भयंकर आहे. त्यांचा हा निर्णय भारतीय एकतेला आणि अखंडतेला धक्का देणारा आणि कमकुवत करणारा हा निर्णय आहे.” असं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे. टीकेची झोड उठल्यानंतर आम्ही चलन बदलेलं नाही तर अर्थसंकल्पातील चलन चिन्ह बदललं आहे असं सांगून स्टॅलिन त्यांच्या बचाव करु शकतात. दरम्यान आता या निर्णयाच्या विरोधात केंद्र सरकार काय पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader