लोकसभेच्या जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीत अद्यापही सहमती होऊ शकलेली नाही. महायुतीत भाजप मोठा भाऊ असणार हे निश्चित असले तरी महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट की काँग्रेसला मोठ्या भावाची भूमिका पार पाडावी लागेल, याबाबत अद्यापही स्पष्टता आलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाविकास आघाडीत ३९ जागांवर सहमती झाल्याचे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले होते. उर्वरित ९ जागांवर येत्या आठवड्यात सहमती होण्याची चिन्हे आहेत. जागावाटपावर मंगळवारी तोडगा निघेल, असे काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले होते. यानुसार या आठवड्यात महाविकास आघाडीतील जागावाटपावर तोडगा निघतो का की नेहमीप्रमाणे चर्चेचे गुऱहाळ सुरू राहते हे समजलेच. महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ठाकरे गटाला अधिकच्या जागा हव्या आहेत. गेल्या वेळी २३ लढवून १८ जागा जिंकल्या होत्या. यामुळे २३ नसल्या तरी २० किंवा २१ जागा मिळाव्यात, अशी ठाकरे गटाची भूमिका आहे. दुसरीकडे, काँग्रेस नेते ठाकरे गटाचा दावा मान्य करण्यास तयार नाहीत. गेल्या वेळी भाजपबरोबरील युतीत जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेतील फुटीनंतर चित्र बदलले आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेना ठाकरे गट पूर्वीप्रमाणे प्रभावी राहिलेला नाही. हे लक्षात घेऊनच जागावाटप करावे, अशी काँग्रेसची भूमिका आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मात्र ठाकरे गटच राज्यात मोठा पक्ष असल्याचा दावा केला आहे.

हेही वाचा : दिल्लीत तळ ठोकून बसलेले झारखंड काँग्रेसचे आठ आमदार परतले, राजकीय समीकरण बदलणार?

जागावाटपात शरद पवार गटाला ८ ते १० जागा सोडल्या जातील. उर्वरित ३८ जागांमध्ये शिवसेना आणि काँग्रेसला जागावाटप करावे लागणार आहे. दोन्ही पक्षांनी प्रत्येकी १९ जागा लढवाव्यात, असा काँग्रेसचा प्रस्ताव आहे. मात्र शिवसेनेच्या ठाकरे गटाला हा प्रस्ताव मान्य नाही. वंचितला शिवसेनेने त्यांच्या कोट्यातील दोन जागा सोडाव्यात, अशी चर्चा झाली होती. यातूनच शिवसेनेचे २१ किंवा २२ जागांची मागणी आहे. महायुतीत भाजप सर्वाधिक जागा लढणार आहे. यामुळेच महाविकास आघाडीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाव्यात, असा काँग्रेसचा दावा आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाला महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा आल्यास ठाकरे गटाचे वर्चस्व मान्य केल्यासारखे होईल. यालाच काँग्रेस नेत्यांचा विरोध आहे. राज्यात भाजपपाठोपाठ काँग्रेसची ताकद असताना शिवसेनेला का महत्त्व द्यायचे, अशी काँग्रेसमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा : उत्तर प्रदेशात राहुल गांधींना पाठिंबा देण्यासाठी प्रियांका मैदानात, अखिलेशही भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार

महायुतीत जागावाटपाची एक फेरी पूर्ण झाल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महायुतीत भाजप २६ ते २८ जागा लढविण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाला १३ किंवा १४ जागा तर उर्वरित सहा जागा अजित पवार गटाला देण्याची योजना आहे. कमी जागा स्वीकारण्यास शिंदे गटाचा तीव्र विरोध आहे. २०१९ मधील संख्याबळाच्या आधारे जागावाटप झाले पाहिजे, अशी भूमिका शिंदे गटाचे नेते गजानन किर्तीकर यांनी मांडली होती. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला पश्चिम महाराष्ट्रात अधिकच्या जागा हव्या आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is big brother in mahavikas aghadi shivsena or congress print politics news css
First published on: 25-02-2024 at 12:14 IST