पुणे सत्र न्यायालयाने काल २८ वर्षीय संगणक अभियंता मोहसिन शेख हत्या प्रकरणात हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय जयराम देसाई यांच्यासहीत सर्व आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. २ जून २०१४ साली छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे आक्षेपार्ह छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर उसळलेल्या दंगलीत मोहसिन शेखची हत्या झाली होती. मोहसिन त्याचा मित्र रियाज अहमद मुबारक सोबत नमाज पठन करुन येत असताना दंगलीमध्ये त्याचा मृत्यू झाला.

संगणक अभियंता मोहसिन शेख हत्या प्रकरणात त्याचा भाऊ मोबिन शेख याने हडपसर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सातव प्लॉट येथे मोहसिन आणि रियाजला रोखले. मोहसिनने दाढी राखली होती, तसेच त्याच्या डोक्यावर टोपी होती. मोहसिनवर हॉकी स्टिकने हल्ला करण्यात आला. पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाई यांच्यासह २१ जणांवर गुन्हा दाखल करुन सर्वांना अटक केले. यामध्ये एक अल्पवयीन आरोपी होता. कालांतराने सर्व आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती.

devendra fadnavis manoj jarange patil
‘ब्राह्मणी कावा’, ‘विष देण्याचा प्रयत्न’, जरांगेंच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले…
Case against Sudhakar Badgujar
सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा, सलीम कुत्ता पार्टी प्रकरण
sushma andhare
कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांंच्या समोर लढणे आम्हाला मोठे आव्हान वाटतच नाही; उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे मत
ajit pawar budget speech
अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या ‘या’ कवितेच्या ओळी म्हणताच सभागृहात हशा; म्हणाले, “विरोधकांनी प्रतिक्रियांचा पुनर्विचार करावा!”

कोण आहेत धनंजय देसाई

पुणे पोलिसांनी अटक केलेले धनंजय देसाई हे मुळचे मुंबईचे आहेत. मोहसिन शेख हत्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची अटक झाली. पाच वर्ष तुरुंगात घालवल्यानंतर फेब्रुवारी २०१९ साली त्यांना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर येरवडा तुरुंगाबाहेर रॅली काढल्यानिमित्त त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) आणि मोटार वाहन अधिनियम या कायद्याअंतर्गत पुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. जामीन मिळाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील पौड भागात राहत होते. जानेवारी २०२२ साली पुण्यात निघालेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चात त्यांनी सहभाग घेतला होता.

हिंदू जनआक्रोश मोर्चा आणि उजव्या विचारसरणीच्या लोकांनी गेल्या काही काळापासून लव्ह जिहादच्या मुद्द्यावर महाराष्ट्रभर मोर्चे काढलेले आहेत. पुणे सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर देसाई यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “माझी निर्दोष मुक्तता हा ‘राजकीय जिहाद’च्या विरोधातील विजय आहे. माझ्याविरोधात कोणताही पुरावा आढळला नाही. मोहसिनच्या खऱ्या खुन्यांना पकडण्याऐवजी काही लोकांच्या दबावाखाली आम्हाला या गुन्ह्यात गोवण्यात आले.”

देसाई पुढे म्हणाले की, मी यापुढेही सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहणार आहे. मी राजकीय पक्षात जाणार नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ चांगले काम करत आहेत. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे खरे अनुयायी आहेत. देसाई यांनी दोन दशकापूर्वी हिंदू राष्ट्र सेनेची स्थापना केली होती. त्यानंतर राजकीय संघटना म्हणून याची नोंदणीही करण्यात आली. देसाई पहिल्यांदा २००७ साली प्रकाशझोतात आले होते. जेव्हा त्यांनी मुंबईच्या महालक्ष्मी येथील स्टार न्यूज कार्यालयावर हल्ला केला होता. एका अल्पवयीन हिंदू मुलीला २३ वर्षीय मुस्लीम मुलासोबत लग्न करायचे असल्याची बातमी स्टार न्यूजने दाखविली होती, या बातमीच्या निषेधार्थ हा हल्ला करण्यात आला.

त्यानंतर २०१३ साली पुन्हा एकदा देसाई चर्चेत आले. अभिनेता संजय दत्त याच्या घराबाहेर आंदोलन केल्यामुळे देसाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी असूनही संजय दत्त यांना विशेष वागणूक दिली जात असल्याचा आरोप देसाई यांनी केला. त्यावेळी संजय दत्त हे पुण्यातील येरवडा तुरुंगात होते.

आता हिंदुत्त्वासाठी लढत राहू

पोलिसांच्या माहितीनुसार, मोहसिन शेख हत्येच्या प्रकरणाआधीच देसाई यांच्यावर जवळपास २३ गुन्हे दाखल होते. जसे की, अवैध हत्यार बाळगणे, खंडणी आणि दंगली सारखे गंभीर गुन्हे दाखल होते. या खटल्यांबाबत विचारले असता देसाई म्हणाले की, “या सर्व प्रकरणात माझी निर्दोष मुक्तता झालेली आहे. माझ्यावरील गुन्हे हे प्रामुख्याने हिंदुत्त्वाच्या आंदोलनाबाबतचे होते. आम्ही आता हिंदुत्त्वासाठी लव्ह जिहाद आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धर्मांतराच्या विराधोत काम करत राहू.”