Mahant Ramgiri Maharaj Statement: वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय जीवनात काही दिवसांपासून खळबळ उडाली आहे. उत्तर महाराष्ट्रात मागच्या १५ वर्षांपासून किर्तन आणि प्रवचनातून धार्मिक कार्य करणाऱ्या महंत रामगिरी महाराजांच्या काही विधानांमुळे वाद पेटला. तर रामगिरी महाराजांचे समर्थन करत असताना भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी महंत रामगिरी महाराजांना धमकाविणाऱ्या मुस्लीम समाजाला मशिदीत घुसून मारू, असे विधान केले. या विधानानंतर आमदार नितेश राणे यांच्यावरही दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. यानिमित्ताने महंत रामगिरी महाराज कोण? त्यांनी कोणते वादग्रस्त विधान केले होते? याबाबत माहिती घेऊ. रामगिरी महाराजांविरोधात ५१ एफआयआर मुस्लीम धर्मीयांचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल ऑगस्ट महिन्यात महंत रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर मुस्लीम समाजाच्या नेत्यांनी त्यावर आक्षेप घेऊनही त्यांनी माफी मागण्यास नकार दिला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर मंचावरून महंत रामगिरी महाराज आणि राज्यातील कोणत्याही साधू-संताच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असे सांगितले. अहमदनगर आणि औरंगाबाद या दोन्ही जिल्ह्याला खेटून गोदावरी नदी किनाऱ्यावरील सराला बेट या ठिकाणी संत गंगागिरी महाराजांचा मठ आहे. गंगागिरी महाराज यांचे निधन झाल्यानंतर किर्तनाची ही परंपरा त्यांच्या शिष्यांनी पुढे सुरू ठेवली. साधारण पंधरा वर्षांपासून रामगिरी महाराज मठाधिपती म्हणून कामकाज पाहत आहेत. लोकजागृतीच्या उद्देशाने साधारण दीडशे, पावणे दोनशे वर्षांपासून दरवर्षी अखंड सप्ताहाचे आयोजन केले जाते. या सप्ताहादरम्यान लाखो लोक उपस्थित असतात. महाराष्ट्रभर या मठाच्या अनुयायांचे मोठे जाळे आहे. १६ ऑगस्ट रोजी नाशिक येथे भरलेल्या साप्ताहिक मेळाव्यात बोलताना रामगिरी महाराजांनी प्रेषितांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या विधानाचा व्हिडीओ व्हायरल होताच. महाराष्ट्रात ठिकठिकाणी मुस्लीम समुदायाने आंदोलन सुरू करत रामगिरी महाराजांना अटक करण्याची मागणी केली. हे वाचा >> Mahant Ramgiri Maharaj: “महंत रामगिरी महाराज यांनी मुद्दामहून…”, जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक आरोप धार्मिक भावना दुखावने, दोन समाजात तेढ निर्माण करणे, जाणीवपूर्वक अपमानास्पद विधान करून शांतता भंग करणे आणि गुन्हेगारी स्वरुपाची धमकी देणे अशाप्रकारचे कलमे एफआयआरमधून रामगिरी महाराजांवर नोंदविण्यात आले. मुस्लीम समाजाने केलेल्या आंदोलनाविरोधात रामगिरी महाराजांच्या अनुयायांनी अहमदनगर, नाशिक आणि संभाजीनगर येथे रस्त्यावर उतरून आंदोलन केले. तसेच रामगिरी महाराज यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जावेत, यासाठी सोशल मीडियावरही प्रचार केला. नितेश राणे काय म्हणाले? लव्ह जिहादचा विरोध करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी सकल हिंदू समाजाकडून मोर्चे काढण्यात आले. या मोर्चात भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी रामगिरी महाराजांच्या विधानाचे समर्थन केले. जर रामगिरी महाराजांच्या विरोधात कुणी बोलले तर आम्ही तुमच्या मशिदीत घुसून एकाएकाला मारू, असे नितेश राणे म्हणाले होते. दरम्यान रामगिरी महाराज यांनी आपल्या विधानावर ठाम राहत आपण चुकीचे बोलले नसल्याचे सांगितले आहे. मी चुकीचे बोललो असेल तर पुराव्यानिशी सिद्ध करा. नाहीतर मी माझ्या विधानावर ठाम आहे, असे रामगिरी महाराज म्हणाले. किर्तनकार आणि महंत रामगिरी महाराज यांचे अनुयायी विवेक महाराज म्हणाले की, महंत रामगिरी महाराज यांनी आपल्या प्रवचनादरम्यान बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूवरील अत्याचाराला वाचा फोडली. मात्र यावेळी त्यांनी जे उदाहरण दिले, त्यावरून वाद निर्माण झाला. पण जर रामगिरी महाराजांविरोधात कुणी भूमिका घेत असेल तर ते त्यांचे अनुयायी सहन करणार नाहीत. हे ही वाचा >> Husain Dalwai: “उद्या कुणी प्रभू रामाबद्दल बोलले तर…”, महंत रामगिरी महाराजांच्या विधानावर काँग्रेस नेते हुसेन दलवाईंची टीका संताच्या केसांनाही धक्का लागणार नाही – मुख्यमंत्री राज्यभरातून महंत रामगिरी महाराज यांच्यावर कारवाईची मागणी होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र त्यांची बाजू सावरली. “महाराष्ट्राला मोठी संत परंपरा असून त्यांच्याच आशीर्वादाने राज्यकारभार सुरू आहे. त्यामुळे राज्यात संतांच्या केसांनाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही”, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक येथील सप्ताह कार्यक्रमात बोलताना केले. सदगुरु गंगागिरी महाराज संस्थानतर्फेसिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे आयोजित हरिनाम सप्ताहात त्यांनी संवाद साधताना हे विधान केले. हरिनाम सप्ताहात मुख्यमंत्री शिंदे यांनी रामगिरी महाराजांच्या कार्याचे कौतुक केले. महंत रामगिरी महाराज यांचे संघाशी संबंध रामगिरी महाराजांचे विधान होण्यापूर्वी जून महिन्यात ते नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासमवेत दिसले होते. रामगिरी महाराजांचा इतिहास काय? रामगिरी महाराज यांचे खरे नाव सुरेश रामकृष्ण राणे असे असून त्यांचा जन्म जळगाव जिल्ह्यात झाला. इयत्ता नववीत असताना त्यांचा संबंध स्वाध्याय केंद्राशी आला. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर रामगिरी महाराज आयटीआयचे शिक्षण घेण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात आले. मात्र शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी आध्यात्मिक गुरू आणि गंगागिरी महाराज यांचे शिष्य नारायणगिरी महाराज यांच्याकडून दिक्षा घेतली. दिक्षा घेतल्यानंतर त्यांनी काही वर्ष हिमालयात घालवली, असेही त्यांचे जवळचे सहकारी सांगतात. २००९ साली रामगिरी महाराज यांची सद्गुरू श्री गंगागिरी महाराज संस्थानच्या मठाधिपती म्हणून निवड झाली. रामगिरी महाराज यांच्यापेक्षा अनेक ज्येष्ठ संत असतानाही रामगिरी महाराज यांची निवड करण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला होता. हा वाद न्यायालयातही पोहोचला, पण अखेर रामगिरी महाराज तिथेही विजयी झाले. मठाला राजकीय शिक्का बसणे योग्य नाही रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त विधानानंतर संस्थानाच्या काही अनुयायांनी चिंता व्यक्त केली. मठाधिपती यांच्याकडून पहिल्यांदाच असा काही वाद निर्माण झाला आहे. हा वाद टाळता येऊ शकला असता. गतकाळात आम्हाला सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत आला होता. मात्र आता या वादानंतर गोष्टी कशा बदलणार? हे आम्ही सांगू शकत नाही. आमच्या मठाला कोणत्याही राजकीय पक्षाच्या विचारधारेचा शिक्का लागणे योग्य नाही.