Who is Malegaon Deputy Mayor Shan-e-Hind : टायगर ऑफ म्हैसूर, अशी ख्याती असलेल्या टिपू सुलतानच्या नावावरून राजकीय वादंग निर्माण झाला. मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांनी त्यांच्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावल्याने हा वाद उफाळून आला. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने या वादाला आणखीनच फोडणी मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून, सपकाळ यांच्याविरोधात पुण्यातील पर्वतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावणाऱ्या उपमहापौर शान-ए-हिंद आहे तरी कोण? त्याविषयीचा हा आढावा…

कोण आहेत शान-ए-हिंद?

सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या शान-ए-हिंद या मालेगावच्या विद्यमान उपमहापौर आहेत. जनता दलाचे दिवंगत नेते व मालेगावचे पाच वेळचे आमदार निहाल अहमद यांच्या त्या कन्या आहेत. निहाल अहमद यांनी अनेक दशके मालेगावच्या राजकारणावर आपली पकड ठेवली होती. त्यांच्या राजकीय चातुर्याचे अनेक किस्से शहरात प्रसिद्ध आहेत. अनेक दशकांपर्यंत मालेगावचे राजकारण दोन प्रभावशाली कुटुंबांभोवती फिरत राहिले आहे. निहाल अहमद यांनी जनता दल पक्षाचे आमदार म्हणून तब्बल पाच वेळा मालेगावचे प्रतिनिधित्व केले. तसेच काँग्रेसचे दिवंगत नेते शेख रशीद यांच्या कुटुंबीयांनी दोनदा या मतदारसंघातून विजय मिळवला होता. २००२ मध्ये मालेगाव महानगरपालिका झाल्यानंतर निहाल अहमद हे पहिले महापौर होते. त्याआधी शान-ए-हिंद यांच्या मातोश्री सजेदा निहाल अहमद यांनी नगर परिषदेचे अध्यक्षपद भूषवले होते.

विधानसभा निवडणुकीत झाला होता पराभव

कायद्याची पदवी घेतलेल्या शान-ए-हिंद यांना त्यांचे बंधू बुलंद इक्बाल यांच्याबरोबर कुटुंबाचा राजकीय वारसा चालवण्यासाठी तयार करण्यात आले. मात्र, वडील आणि भावाच्या अकाली निधनानंतर त्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्या. त्यांनी बुलंद इक्बाल यांच्याबरोबर निकाह करून मालेगावच्या राजकारणाची सूत्रे आपल्या हाती घेतली. २०२३ मध्ये एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाने भाजपाशी युती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शान-ए-हिंद यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला. २०२४ मध्ये त्यांनी समाजवादी पार्टीच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली; मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

आणखी वाचा : भाजपा-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट; अमित शाहांचा राहुल गांधींवर संताप, शिंदेंचे नाईकांना खुले आव्हान; वाचा ५ घडामोडी…

महापालिका निवडणुकीआधी इस्लाम पक्षाशी युती

महापालिका निवडणुकीपूर्वी शान-ए-हिंद निहाल यांच्या पतीने अनेक वर्षांचे वैर बाजूला सारून माजी आमदार शेख आसिफ यांच्या ‘इस्लाम’ पक्षाशी हातमिळवणी केली. मालेगाव मध्य मतदारसंघाचे आमदार मुफ्ती इस्माईल यांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी त्यांनी इस्लाम पक्षाबरोबर आघाडी केली. महापालिका निवडणुकीत समाजवादी पार्टी व इस्लाम पक्षाच्या आघाडीने एकूण ४० जागांवर विजय मिळवला आणि इतर पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन केली. ११ फेब्रुवारी रोजी नसरीन शेख यांनी महापौरपद व शान-ए-हिंद यांनी उपमहापौरपदाचा पदभार स्वीकारला. मात्र, पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या पाचव्या दिवशीच टिपू सुलतान यांच्या फोटोवरून नव्या वादाला तोंड फुटले आणि संपूर्ण प्रकरणाने राज्यभरात लक्ष वेधून घेतले.

टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद कसा निर्माण झाला?

उपमहापौर शान-ए-हिंद यांनी आपल्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावल्याने हिंदुत्ववादी संघटनांसह शिवसेना शिंदे गट आक्रमक झाल्या. त्यावरून मालेगाव शहरातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर टिपू सुलतान यांचा हा फोटो कार्यालयातून काढून टाकण्यात आला. यादरम्यान टिपू सुलतान यांचा फोटो कार्यालयात लावणे चुकीचे नसल्याचा दावा मालेगावचे उपमहापौर शान-ए-हिंद यांनी केला. टिपू सुलतान हे देशप्रेमी असल्याने त्यांचे चित्र दालनात लावून मी काहीही चुकीचे केले नाही. त्यांनी मातृभूमीसाठी ब्रिटिशांबरोबर लढा देऊन आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यामुळेच टिपू सुलतान चित्र दालनात लावण्यात मला काहीही गैर वाटत नाही, असे शान-ए-हिंद निहाल यांनी स्पष्ट केले.

टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार : शान-ए-हिंद

मालेगाव उपमहापौर दालनात टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावण्यात येणार असल्याची माहिती शान-ए-हिंद यांनी एका कार्यक्रमात दिली. सध्या उपमहापौर दालनात दुरुस्तीचे काम सुरू असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावण्यात येईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. यादरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उडी घेतल्याने हा वाद पुन्हा उफाळून आला. सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सपकाळ यांच्या विधानाचा निषेध म्हणून मालेगावात भाजपाने रविवारी दुपारी आक्रमक पवित्रा घेत, सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारले आणि त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहनदेखील केले. त्याच वेळी पुण्यात काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. यावेळी झालेल्या दगडफेकीत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांसह काही पत्रकारही जखमी झाले. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले असून, टिपू सुलतान प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे.

हेही वाचा : Sunetra Pawar : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा अन् बडा नेताही अडचणीत? पक्षातील खडतर आव्हानातून सुनेत्रा पवार कसा मार्ग काढणार?

मालेगावात मुस्लिमांची संख्या नेमकी किती?

महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत मुस्लीम समाजाचे प्रमाण ११.५६ टक्के असले तरी मालेगावमध्ये त्यांची संख्या ७८ टक्के आहे. त्यामुळेच शहराच्या राजकारणात या समुदायाची भूमिका अत्यंत निर्णायक ठरताना दिसून येत आहे. मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील अशा मोजक्या मतदारसंघांपैकी एक आहे, जिथून स्वातंत्र्यानंतर सातत्याने मुस्लीम आमदार निवडून येत आहेत. मालेगावचे राजकारण नेहमीच व्यावहारिक युतीसाठी ओळखले जाते, जिथे अनेकदा विचारधारेच्या पलीकडे जाऊन तडजोडी केल्या जातात. २०१७ मध्ये येथील महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसने चक्क एकसंध शिवसेनेबरोबर हातमिळवणी केली होती. याच राजकीय पार्श्वभूमीचा विचार करत, शेख आसिफ यांनी यंदाच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाशी युती केली आणि सर्वाधिक जागा जिंकून महापालिकेत सत्ता स्थापन केली आहे.