Pratik Jain IPAC ED raid पश्चिम बंगालमध्ये ‘इंडियन पॉलिटिकल ॲक्शन कमिटी’च्या (आयपॅक) कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापेमारी केली. ईडीने केलेल्या या कारवाईनंतर पश्चिम बंगालमधील राजकारण चांगलेच तापले आहे. गुरुवारी (८ जानेवारी) कोलकाता येथे राजकीय सल्लागार कंपनी ‘आयपॅक’ व तिचे प्रमुख प्रतीक जैन यांच्या ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘आयपॅक’च्या कार्यालयाकडे धाव घेत, ईडीने तृणमूल काँग्रेसची अंतर्गत कागदपत्रे जप्त केल्याचा आरोप केला आहे. त्यावरून हे अधोरेखित झाले की, प्रतीक जैन सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेससाठी (टीएमसी) किती महत्त्वाचे आहेत. बॅनर्जी यांनी पत्रकारांना सांगितले, “मी प्रतीक यांना फोन केला. कारण- ते माझ्या पक्षाच्या कामाचे प्रभारी आहेत.” ईडीने ही कारवाई का केली? कोण आहेत प्रतीक जैन? ममता बॅनर्जी यांच्या संतापाचे कारण काय? जाणून घेऊयात…

ईडीने आपल्या निवेदनात काय म्हटले?

ईडीने ८ जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हे छापे अनुप मांझी ऊर्फ लाला याच्याशी संबंधित आहेत. हे छापे कोळसा तस्करी प्रकरणातील मनी लाँडरिंग तपासाशी संबंधित असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. अनुप मांझीवर पश्चिम बंगालच्या पश्चिम बर्धमान जिल्ह्यातील ‘ईस्टर्न कोलफिल्ड’च्या भाडेतत्त्वावरील क्षेत्रांमधून बेकायदा पद्धतीने कोळसा उत्खनन केल्याचा आरोप आहे.

ईडीने पुढे असे म्हटले आहे की, कोळसा तस्करी प्रकरणाशी संबंधित एका ऑपरेटरने २०२१-२२ दरम्यान गोवा येथील आयपॅकच्या कामासाठी निधी वळवला होता. आयपॅकने २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या गोवा मोहिमेवर काम केले होते. जैन यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, ईडीच्या छाप्यात कागदपत्रे काढून नेल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण आता कोलकाता उच्च न्यायालयात प्रलंबित आह

कोण आहेत प्रतीक जैन?

प्रतीक जैन हे मूळ रांचीचे आहेत. ते आयआयटी बॉम्बेचे विद्यार्थी होते. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये भारतातील अत्यंत दबावाच्या शिक्षण पद्धतीत टिकून राहण्याचा अनुभव काय असतो, यावर जाहीरपणे विचार व्यक्त केले आहेत. जैन यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात ‘डेलॉइट’मध्ये विश्लेषक म्हणून केली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या मोहिमेचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘सिटिझन्स फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स’ या व्यावसायिक संस्थेचे ते सदस्य होते. या मोहिमेने भारतीय निवडणूक पद्धतीत मोठे बदल घडवून आणले होते. जेव्हा प्रशांत किशोर यांनी ‘आयपॅक’ची स्थापना केली, तेव्हा जैन सह-संस्थापक झाले; परंतु ते प्रसिद्धीझोतापासून दूर होते.

२०२१ मध्ये बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांनी आयपॅकमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा या संस्थेची सूत्रे पूर्णपणे प्रतीक जैन, ऋषी राज सिंग व विनेश चंदेल या तीन संचालकांच्या हाती आली. आयपॅकचे बंगालबाहेरील निवडणूक प्रयोग म्हणजेच त्रिपुरा, मेघालय व गोवा येथील प्रयोग अयशस्वी ठरल्यानंतर संस्थेमध्ये कपात करण्यात आली. वरिष्ठ कर्मचारी कोलकात्याला हलवण्यात आले आणि पश्चिम बंगाल हेच या संस्थेचे एकमेव कार्यक्षेत्र राहिले. याच काळात जैन हे या संघटनेचे मुख्य आधारस्तंभ ठरले.

सध्या ते निवडणूक मोहिमेची रणनीती, डेटा प्रणाली, डिजिटल ऑपरेशन्स आणि आयपॅकच्या यंत्रणेचे तृणमूल काँग्रेसच्या संघटनेशी असलेले समन्वय (जिल्हास्तरीय क्षेत्रीय संघांपासून ते नेतृत्वापर्यंतच्या फीडबॅक लूपपर्यंत) पाहतात. व्यावहारिकदृष्ट्या, पश्चिम बंगालमध्ये आयपॅकचे कार्य केवळ निवडणुकांच्या काळातच नाही, तर वर्षभर सुरू असते. छाप्यांनंतर एक दिवसानंतर नाव न सांगण्याच्या अटीवर आयपॅकच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले, “आयपॅकमध्ये सर्व काही शांत आहे आणि प्रतीक आजही ऑफिसला आले होते.”

ईडीच्या छापेमारीनंतर प्रतीक जैन यांचे नाव राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले आहे. ईडीच्या कारवाईमुळे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचे अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. ममता बॅनर्जी या केंद्र सरकारवर सातत्याने टीका करीत आहेत. त्यामुळे कायम पडद्यामागे असणारे प्रतीक जैन हे नाव राजकीय चर्चांच्या केंद्रस्थानी आले आहे.

काय आहे आयपॅक?

आयपॅकच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, आयपॅकचा प्रवास २०१३ मध्ये ‘सिटिझन्स फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स’ म्हणून सुरू झाला. विद्यार्थी आणि तरुण व्यावसायिकांना औपचारिकपणे राजकीय पक्षात सामील न होऊ देता, राजकारण आणि प्रशासनात सहभागी होण्याची संधी देणे हा यामागचा उद्देश होता. त्यानंतर ‘सिटिझन्स फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स’चे रूपांतर आयपॅकमध्ये झाले. त्यात विविध शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमीच्या लोकांना सामावून घेऊन, त्यांना थेट निवडणूक मोहिमा आणि प्रशासन सल्लागार भूमिकेत नियुक्त केले गेले.

ही संस्था स्वतःला अशा नेत्यांबरोबर काम करणारी संस्था म्हणून वर्णन करते, ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड सिद्ध झाला आहे. नेत्यांना जनतेच्या हिताचे अजेंडे तयार करण्यास आणि ते जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यास आयपॅक मदत करते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या मॉडेलने भारतातील निवडणूक प्रचार प्रक्रियेचे व्यावसायिकीकरण केले. प्रशांत किशोर आयपॅकमधून बाहेर पडल्यापासून, प्रतीक जैन यांना तृणमूल काँग्रेसचे मुख्य रणनीतीकार म्हणून ओळखले जाते. ते समन्वय साधणे, ममता आणि त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्याशी जवळून काम करणे, मोहिमेची रचना करणे आणि क्षेत्रातील माहिती व नेतृत्व स्तरावरील निर्णय प्रक्रिया यांमधील शेवटचा दुवा म्हणून काम करतात.

बंगालमधील नागरी आणि ग्रामीण निवडणुकांमधील विजयाबरोबरच २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत तृणमूलच्या यशामागे जैन हेच मुख्य सूत्रधार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यांची ही भूमिका एका मोठ्या संघटनात्मक संरचनेचा केवळ एक भाग आहे. जैन हे आयपॅक या संस्थेचे संचालन करणाऱ्या भागीदारांपैकी एक आहेत. ऋषी राज सिंग आणि अंकित लाल हेदेखील आयपॅकचे सह-संस्थापक आहेत. त्यांच्यातील जबाबदाऱ्यांचे विभाजन त्यांच्या कार्यानुसार केले जाते. जैन यांचे मुख्य लक्ष बंगालवर असले तरी इतर भागीदार आणि वरिष्ठ संघ आंध्र प्रदेश, पंजाब, दिल्ली आणि इतर ठिकाणची कामे हाताळतात. हे निवडणुकीच्या चक्रानुसार ठरते.