संतोष प्रधान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक पदवीधर मतदारसंघातील राजकीय घडामोडींमुळे आपली अहवेलना झाल्याचा ठपका ठेवत बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा सादर केला आहे. त्यांचा सारा रोख हा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आहे. पण राज्य काँग्रेसमध्ये हा वाद निर्माण होण्यास स्वत: थोरात की नाना पटोले हे जबाबदार याची पक्षांतर्गत दखल घेण्यात आली आहे. दुसरीकडे, थोरात यांनी पदावरून दूर करण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी काँग्रेस नेते त्यांचा राजीनामा स्वीकारण्याची शक्यता कमीच आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघातील सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या नेतृत्वाला पत्र पाठविले. त्यात त्यांनी या साऱ्या घोळास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जबाबदार धरले. सत्यजित तांबे यांनी आपल्याला पक्षाचे अधिकृत पत्र (ए व बी फाॅर्म) मिळाले नाही म्हणून अपक्ष अर्ज दाखल करावा लागल्याचे सांगितले. यावर दोन कोरे फाॅर्म पाठविले होते, असा नाना पटोले यांचा दावा आहे. तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यावर काँग्रेसने त्यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु त्यांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करावी, अशी दिल्लीतील नेत्यांची अपेक्षा होती. त्यानुसार तांबे यांनी चार वेगवेगळे मसुदे पाठविले होते. पण दिल्लीतील नेत्यांनी दिलगिरी कशी असावी यात घोळ घातला. दिलगिरी पत्राबाबत पक्षाचे संघटन सरचिटणीस वेणूगोपाळ यांनी तात्काळ निर्णयच घेतला नाही. अन्यथा हा गोंधळ संपुष्टात आला असता, असे काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात येते.

हेही वाचा… शिंदे गटाच्या मंत्र्याच्या विरोधात भाजप आक्रमक

सत्यजित तांबे यांच्याबाबत झालेल्या घोळाला बाळासाहेब थोरात यांनाच जबाबदार धरले जात आहे. त्यांनी आधीच सत्यजित तांबे यांच्या नावाची शिफारस केली असती तर हा गोंधळ झाला नसता. थोरात यांनी सत्यजित यांचे वडिल व विद्यमान आमदार सुधीर तांबे यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानुसार पक्षाने त्यांना उमेदवारी जाहीर केली याकडे प्रदेश काँग्रेसचे नेते लक्ष वेधत आहेत. आता नाना पटोले यांना दोष देण्यात काय अर्थ आहे, असाही सवाल प्रदेश नेते करीत आहेत.

हेही वाचा… कायद्यानुसार सत्यजित तांबे यांना अपक्षच राहावे लागणार

नाशिकमधून झालेल्या गोंधळात बाळासाहेब थोरात यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून दूर करावे, असा एका गटाचा प्रयत्न आहे. संघटन सरचिटणीस वेणूगोपाळ हे थोरात यांच्याबाबत फारसे अनुकूल नाहीत. पक्षांतर्गत वातावरण विरोधात जाऊ लागल्यानेच थोरात यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भूमिका आता महत्त्वाची असेल. खरगे आणि थोरात यांच्यातही फार काही सख्य नाही. तरीही दिल्लीतील नेते थोरात यांना लगेचच नाराज करणार नाहीत. पण आधीच कमकुवत असलेल्या प्रदेश काँग्रेसमधील संघर्ष चव्हाट्यावर आल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is responsible for the conflict among congress in the state print politics news asj
First published on: 07-02-2023 at 13:50 IST