काँग्रेसच्या अप्रतिष्ठेस जबाबदार कोण ? | Who is responsible for the disrepute of Congress party? | Loksatta

काँग्रेसच्या अप्रतिष्ठेस जबाबदार कोण ?

काँग्रेसला जनाधार असला तरी नेतृत्वाचा अभाव ही पक्षासाठी फार मोठी प्रतिकूल ठरणारी बाब आहे.

Congress party, Vidhan Parishad Election, Maharashatra
काँग्रेसच्या अप्रतिष्ठेस जबाबदार कोण ? ( Image – लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

संतोष प्रधान

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षकच्या पाच मतदारसंघांतील निवडणूक सोमवारी पार पडली आणि गुरुवारी निकाल लागेल. निकाल काय लागेल याबाबत अंदाज काही वर्तविता येणार नाही पण नाशिक पदवीधर ही हक्काची जागा काँग्रेसने गमाविली. गमाविली म्हणजे या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवारच रिंगणात नव्हता. गेली १४ वर्षे प्रतिनिधीत्व करणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेसच्या कोणी अर्जच दाखल केला नाही. याला जबाबदार कोण ? आता परस्परांवर खापर फोडण्यात येत असले तरी यातून काँग्रेसची पार बेईज्जत झाली.

सत्यजित तांबे यांना उमेदवारी हवी होती. ती त्यांना का देण्यात आली नाही याचे उत्तर कोणीच आतापर्यंत दिले नाही. त्यांचे वडिल व विद्ममान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली पण त्यांनी आधीच मुलाला उमेदवारी द्यावी, असे पक्षाला कळविले होते. या साऱ्या गोंधळास काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात की प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे जबाबदार आहेत याची चर्चा सुरू झाली. जबाबदार कोण यावर पक्षाचे नेते खल करतील पण काँग्रेसचे मोठे नुकसान झाले.

हेही वाचा… कोकण शिक्षकमध्ये वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला ?

काँग्रेस पक्ष राज्यात एकेकाळी घट्ट पाळेमुळे रोवून राज्यात उभा होता. राज्य विधानसभेतील २८८ पैकी २००च्या आसपास जागा काँग्रेस पक्षाला मिळत असत. एवढी जबरदस्त ताकद पक्षाची होती. १९९० नंतर राज्यात काँग्रेस पक्षाची पिछेहाट होत गेली. १९९५ नंतर तर काँग्रेस पक्षाचे १०० आमदार कधीच निवडून आलेले नाहीत. २०१४ आणि २०१९ मध्ये जेमतेम ४०च्या आसापस आमदार पक्षाचे निवडून आले. काँग्रेसला विदर्भात चांगले यश मिळते. पक्षाची चांगली ताकद असलेले नांदेड आणि नगर हे दोन जिल्हे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळे या दोन जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळते. अशोक चव्हाण यांच्याबद्दल भाजपने आधीच संशयाचे वातावरण तयार केले आहे. अशोकरावांना नेहमी खुलासा करावा लागतो. सत्यजित तांबे यांच्या बंडाला पाठिंबा देत भाजपने आता नगर या काँग्रेसला प्रभाव क्षेत्रावर घाला धातला आहे.

हेही वाचा… स्थगितीच्या श्रेयासाठी काँग्रेसमध्येच संघर्ष! गोंडवाना विद्यापीठ सभागृह नामकरण प्रकरण

स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्ते ही पक्षाची खरी ताकद. काँग्रेसच्या पातळीवर हे दोन्ही संपुष्टात येऊ लागले आहे. जनाधार नसल्याने स्थानिक नेते व कार्यकर्ते पक्ष सोडून जाऊ लागले आहेत. अशा वेळी कोणतीही निवडणूक सावधगिरीने घेण्याची आवश्यकता होती. पण नाशिक पदवीधरची निवडणूक काँग्रेस नेतृत्वाने गांभीर्याने घेतली नाही. त्याचे परिणाम आता भोगावे लागले आहेत. विधान परिषदेत काँग्रेसचे आता जेमतेम सात आमदार शिल्लक राहिले आहेत. नगरमधील या राजकीय धडामोडींचा आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद निश्चितच परिणाम होऊ शकतो. काँग्रेसची ताकद असलेला आणखी एक जिल्हा यातून खिळखिळा होण्याची भीती आहे.

हेही वाचा… शरद पवार, नितीन गडकरी यांच्या कोल्हापूर दौऱ्यात राजकीय, निवडणुकीची बांधणी

राष्ट्रवादीचा फायदा

काँग्रेस कमकुवत होत असल्याचा फायदा राज्यात राष्ट्रवादी उठवित आहे हे आधीपासूनच बघायला मिळते. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला पार मागे टाकले. काँग्रेसची कमकुवत होत असताना ती जागा व्यापण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. काँग्रेसची राज्यात अजूनही हक्काची मतपेढी आहे. अल्पसंख्याक, दलित मतदारांना राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसचे अधिक आकर्षण आहे. काँग्रेसला जनाधार असला तरी नेतृत्वाचा अभाव ही पक्षासाठी फार मोठी प्रतिकूल ठरणारी बाब आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढायची की महाविकास आघाडीतून लढायची याची काँग्रेसने अद्याप काहीच रणनीती अद्याप निश्चित केलेली नाही. काँग्रेसमधील या गोंधळाने पक्षाची ताकद कमीच होत जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 11:48 IST
Next Story
कोकण शिक्षकमध्ये वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला ?