पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. ममता बॅनर्जी व अभिषेक बॅनर्जी यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या सायोनी घोष यांनीही बंडखोरी केली. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या गोटातील अनेक नेत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सायोनी घोष यांची प्रतिमा ममता बॅनर्जी यांच्या कट्टर समर्थक असल्यासारखी तयार झाली होती.

“ममता बॅनर्जी व अभिषेक बॅनर्जींसाठी एक धडा”

“सायोनी घोष बंडखोरांच्या गटात सामील होतील असे आम्हाला कधी वाटले नव्हते. कारण अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांना राजकारणात आणले. ममता बॅनर्जींनी त्यांना सतत प्राधान्य दिले. कोणतीही विश्वासार्हता सिद्ध झालेली नसताना ममता बॅनर्जी यांनी सायोनी यांना नेता केले. हा ममता बॅनर्जी व अभिषेक बॅनर्जी यांच्यासाठी एक धडा आहे. कारण त्यांनी पक्षासाठी पूर्ण वेळ काम करणारे कार्यकर्ते व नेत्यांपेक्षा नेहमीच सिनेकलाकारांवर अधिक विश्वास दाखवला”, अशी प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसमधील ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय असलेल्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.

“कदाचित भीती किंवा इतर गोष्टीमुळे…” – महुआ मोईत्रा

सायोनी घोष यांच्या बंडखोरीमुळे धक्का बसल्याचे तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा म्हणाल्या होत्या. “सायोनी ही मला मुलीसारखी, बहिणीसारखी आहे. जर दुसरं कोणी सोडून गेलं असतं तर मला दु:ख झालं नसतं. पण, मी तिच्याकडे माझ्या मुलीसारखे पाहत होते. तिच्यावर त्याप्रमाणे मी प्रेम करत होते. तिचं भविष्य उज्ज्ल असेल असा मला विश्वास होता. काहीच नसताना ती पुढे आली आहे. ती मेहनती आहे. हुशार आहे… कदाचित भीती किंवा इतर गोष्टीमुळे तिने हा निर्णय घेतला असावा. ती संधीसाधू नाहीए. तिला पैशांमध्ये रस नाही. ती एक साधं आयुष्य जगते व पूर्ण वेळ काम करत राहते. जेव्हा अशी माणसे अशा गोष्टी करतात (पक्ष बदलतात) तेव्हा खूप खूप निराशा येते. प्रत्येकाला स्वत:ची स्वतंत्र ध्येय आहेत. पण, मी तिला सल्ला देईल की भीतीवर मात कर. पुढे आणखी आयुष्य आहे”, असे महुआ मोईत्रा यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.

दरम्यान, सायोनी घोष मागील आठवड्यात दिल्लीत दाखल झाल्या आहेत. त्यांच्या राजकीय भविष्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्या म्हणाल्या, “योग्यवेळ आल्यावर मी बोलेन.” रविवारी सायोनी घोष यांनी बंडखोर खासदारांबरोबर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची भेट घेतली. एका छोट्या पक्षात बंडखोरांचा गट विलीन झाला आहे. संसदेत स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात यावी अशी मागणी त्यांनी ओम बिरला यांच्याकडे केली आहे.

२०२१ मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

सायोनी घोष यांनी बंडखोरी केल्याचे समजताच ममता बॅनर्जी यांनी पक्षात मोठे फेरबदल केले. तृणमूल युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून त्यांनी सायोनी घोष यांची हकालपट्टी केली. त्यांच्या जागी अर्णव बॅनर्जी यांची नियुक्ती केली. २०२१ मध्ये सायोनी घोष यांनी तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राजकारणात त्या सक्रिय झाल्या. सायोनी घोष यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा तृणमूल काँग्रेसमधून अनेक महत्त्वाचे नेते बाहेर पडत होते. ते भाजपामध्ये सामील होत होते. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सायोनी घोष भाजपावर खुलेआम टीका करत होत्या. तसेच त्या डाव्या पक्षांच्या जवळच्या आहेत, अशी त्यांची प्रतिमा तयार झाली होती. २०२१ मध्ये सायोनी घोष यांनी आसनसोल दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या अग्निमित्रा पॉल यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी सायोनी घोष यांचा ४ हजार ५०० मतांनी पराभव झाला होता. परंतु त्यांच्या आक्रमक प्रचाराने पक्षनेतृत्वाचे लक्ष वेधले होते.

२०२१ मध्ये पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसची सत्ता आली. त्यावेळी सायोनी घोष यांना अभिषेक बॅनर्जी यांच्या जागी तृणमूल युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर नियुक्त करण्यात आले. त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली होती. सायोनी घोष यांनी राष्ट्रीय मुद्द्यांवर मत मांडण्यास सुरूवात केली होती. त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती.

प्रचारादरम्यान त्रिपुरात अटक आणि गुन्हे दाखल

नोव्हेंबर २०२१ मध्ये त्रिपुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रचार करत असताना सायोनी घोष यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर दोन गटांमध्ये शत्रूत्व निर्माण करणे, खुनाचा प्रयत्न करणे, गुन्ह्याचा कट रचणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्रिपुराचे तत्कालीन मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव यांच्या रॅलीत तणाव निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

जून २०२३ मध्ये सायोनी घोष यांची शालेय नोकरी घोटाळा प्रकरणी ईडीने चौकशी केली होती. शालेय नोकरी घोटाळ्यात ज्यांना अटक केली त्यांच्या तोंडून चौकशीदरम्यान सायोनी घोष यांचे नाव अनेकदा आले, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले होते. याच प्रकरणात पश्चिम बंगालचे माजी शिक्षण मंत्री पार्था चॅटर्जी यांना अटक करण्यात आली होती.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सायोनी घोष यांना कोलकात्यातील अत्यंत महत्वाच्या जादवपूर लोकसभा मतदारसंघातून तिकिट देण्यात आले. याच मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांनी १९८४ मध्ये राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला होता. सायोनी घोष यांनी भाजपा उमेदवाराचा २.६ लाख मताधिक्क्याने पराभव केला होता.

नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतही सायोनी घोष यांनी जोरदार प्रचार केला होता. हनुमान चालिसा व शीख धर्माशी संबंधित प्रार्थना म्हटल्यानंतर, “मेरे दिल मे है काबा, और मेरे आँखो मे मदिना”, अशी कडवी त्यांनी गायली होती. तृणमूल काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचे प्रचारादरम्यान त्यांनी सांगितले होते.

अभिनय क्षेत्रातील कामगिरी

सायोनी घोष यांचा जन्म कोलकात्यात १९९३ साली झाला. २०१० मध्ये त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरूवात केली होती. ‘इच्चे देना’ या टेलिव्हिजन फिल्ममध्ये त्यांनी काम केले होते. तर ‘नोटोबोलर नॉटआउट’ या चित्रपटातून त्यांनी सिनेक्षेत्रात प्रवेश केला होता. त्यांचे राजकाहीनी (२०१५), ब्योमकेश ओ चिरीयाखाना (२०१६) आणि ऑस्टे लेडिज (२०१९) हे चित्रपट गाजले होते. २०२४ च्या निवडणुकीआधी त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती ९१.९ लाख रूपये असून त्यांच्यावर ५९.९ लाख रूपयांचे कर्ज आहे.