Who is Samrat Choudhary and his political journey from RJD to BJP: बिहारमध्ये मोठी राजकीय घडामोड घडत आहे. दोन दशकांपासून बिहारच्या राज्यकारणात मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या नितीश कुमार यांनी आता राज्याच्या राजकारणाकडून राष्ट्रीय राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी आधी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यानंतर आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यानंतर भाजपाचे सम्राट चौधरी मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले जात आहे. नुकतीच त्यांची भाजपाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. बिहारमध्ये भाजपाचा पहिलाच मुख्यमंत्री होत असला तरी मूळचे भाजपाचे नेते मुख्यमंत्रीपदावर येत नसून लालू प्रसाद यादव यांच्या पक्षात एकेकाळी महत्त्वाच्या पदावर असलेल्या सम्राट चौधरींची या पदासाठी निवड झाली आहे.

मावळते मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ५० हून अधिक वर्ष बिहारच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला. १९७४ मध्ये त्यांनी जनता पार्टीतून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जनता दल (युनायटेड) च्या माध्यमातून त्यांनी वीस वर्ष बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषविले. या काळात त्यांची सुशासन बाबू अशी ओळख निर्माण झाली. लालू प्रसाद यादव यांच्या कार्यकाळातील कारभाराला त्यांनी जंगल राज संबोधून सत्ता मिळवली होती.

२०२५ मध्ये एनडीए बरोबर सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र आता त्यांनी राजीनामा देऊन राज्यसभेत काम करणार असल्याचा निर्णय जाहीर केला. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करणारे सम्राट चौधरी आता मुख्यमंत्री होत आहेत.

कोण आहेत सम्राट चौधरी?

२०२५ मध्ये एनडीएची सत्ता आल्यानंतर सम्राट चौधरी यांच्याकडे गृह खाते देण्यात आले होते. २० वर्षांत पहिल्यांदाच नितीश कुमार वगळता हे खाते इतर कुणालातरी देण्यात आले होते. त्यावरूनच आघाडीच्या सरकारमध्ये भाजपा आणि सम्राट चौधरी यांचे महत्त्वाचे स्थान असल्याचे समोर आले होते.

Samrat Choudhary Bihar New CM Profile | Nitish Kumar Resignation BJP News | सम्राट चौधरी बिहारचे नवे मुख्यमंत्री | बिहार राजकीय घडामोडी भाजपा नितीश कुमार
बिहारचे नवे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचा राजकीय प्रवास

आरजेडी ते भाजपा प्रवास

१६ नोव्हेंबर १९६८ साली जन्मलेल्या सम्राट चौधरी यांनी १९९० साली सक्रिय राजकारणात भाग घेतला. बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील तारापूर येथील लखनपूर गावातून येणाऱ्या चौधरी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) पक्षातून राजकारणाची सुरुवात केली.

bjp leader Samrat Choudhary
चौधरी मूळचे भाजपचे नाहीत, ते लालूंच्या पक्षातून आलेले आहेत. त्यामुळं हिमंत बिस्वा शर्मा यांच्याप्रमाणं त्यांच्याही निष्ठेची परीक्षा घेतली जात आहे.

सम्राट चौधरी यांचे वडील शकुनी चौधरी यांनी तारापूर विधानसभा मतदारसंघाचे अनेकदा प्रतिनिधित्व केले होते. सुरुवातीला त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. नंतर काँग्रेस, समता पार्टी आणि अखेर आरजेडी पक्षातून उमेदवारी मिळवली होती.

१९९९ साली राबडी देवी यांचे सरकार असताना सम्राट चौधरी विधानसभा आणि विधानपरिषदेचे सदस्य नसतानाही त्यांची वर्णी कृषी मंत्री म्हणून केली गेली. मात्र त्यांच्या वयाचा वाद उद्भवल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

२०१४ साली पक्ष फोडला, २०१७ मध्ये भाजपात प्रवेश

१९९९ साली मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर सम्राट चौधरी यांनी २००० साली परबत्ता विधानसभेतून आरजेडीच्या तिकीटावर विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी पक्षात एक एक पायरी चढत वरिष्ठ नेतेपदापर्यंत मजल गाठली. २०१० साली त्यांची विधानसभेच्या पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली.

२०१४ साली चौधरी यांचे लालू प्रसाद यादव यांच्याशी मतभेद झाले. त्यांनी आरजेडीचे १३ आमदार फोडून नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) पक्षाला पाठिंबा देत राज्य सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी नगर विकास आणि गृहनिर्माण मंत्री म्हणून काम पाहिले.

पुढे २०१७ साली त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांना प्रदेश उपाध्यक्ष पद देऊन संघटन बांधणीची जबाबदारी देण्यात आली.

ओबीसींना चुचकारण्यासाठी सम्राट चौधरींचा वापर

बिहारमधील ओबीसी मतपेटीला जवळ करण्यासाठी भाजपाने सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाचा खुबीने वापर केला. चौधरी हेही नितीश कुमार यांच्या कोईरी समाजातून येतात. बिहारमध्ये या समाजाची मोठी मतपेटी आहे. २०२० साली भाजपाने चौधरी यांना विधानपरिषदेवर पाठवले. तर २०२२ साली त्यांच्याकडे विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सोपवली. २०२३ साली लोकसभा निवडणुकीला एक वर्ष बाकी असताना त्यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केले गेले.

नितीश कुमार यांना हटविण्याची घेतली होती शपथ

सप्टेंबर २०२२ साली सम्राट चौधरी यांच्या आईचे निधन झाले होते. त्यापश्चात त्यांनी डोक्यावर पगडी बांधली होती. त्याच्या काही वर्ष अगोदर बाहेरच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडत तेजस्वी यादव यांच्याशी हातमिळवणी करत राज्यात आरजेडी-जेडीयू पक्षाचे सरकार स्थापन केले होते.

२०२२ साली विरोधी पक्षनेता असलेल्या सम्राट चौधरी यांना तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानपरिषदेत पगडी बाबत छेडले. तुम्ही ही पगडी का घालायला लागलात? असे नितीश कुमार यांनी विचारले. त्यावर हजरजबाबी असलेल्या चौधरींनी म्हटले, “तुम्हाला मुख्यमंत्रीपदावरून पायउतार केल्यानंतरच मी डोक्यावरची पगडी काढणार आहे.”

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांची साथ सोडून पुन्हा भाजपाशी युती केली. त्यावेळी त्यांच्या सरकारमध्ये सम्राट चौधरी हे उपमुख्यमंत्री होते. नितीश कुमार यांच्याशी पुन्हा युती झाल्यामुळे सम्राट चौधरी यांनी डोक्यावरील पगडी काढली होती. या प्रसंगाची चर्चा त्यावेळी बिहारच्या राजकारणात चांगलीच रंगली.