Who is BMC Deputy Mayor Sanjay Ghadi : मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या उमेदवार म्हणून भाजपाने रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केली; तर शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक संजय घाडी यांच्या गळ्यात सव्वा वर्षांसाठी उपमहापौरपदाची माळ पडली. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी दहिसर प्रभाग क्रमांक पाचमधून विजय मिळवला. एकसंध शिवसेनेतील फुटीनंतर संजय घाडी आणि त्यांच्या समर्थकांनी एकनाथ शिंदे यांच्याविरोधात रस्त्यावरून तीव्र आंदोलन केले होते. महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांची कास सोडून त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि उपमहापौरपदाची माळ गळ्यात पाडून घेतली. यापार्श्वभूमीवर संजय घाडी यांच्या राजकीय कारकीर्दीचा हा सविस्तर आढावा…

कोण आहेत संजय घाडी?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या पडेल गावचे सुपुत्र असलेल्या संजय घाडी यांनी आपले प्राथामिक शिक्षण मुंबई महापालिकेच्या शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालयात त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच ते अखिल भारतीय विद्यार्थी सेनेत सक्रिय होते. राज ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून त्यांनी ओळख मिळवली होती. २००६ मध्ये राज यांनी एकसंध शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना केली. त्यावेळी संजय घाडी यांनी मनसेत प्रवेश करून राज यांना पाठिंबा दिला. पक्षात काही दिवस सक्रियपणे काम केल्यानंतर त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेची कास धरली. २०१७ मध्ये ते एकसंध शिवसेनेतू नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यादरम्यान त्यांनी पक्षाच्या उपनेतेपदाची जबाबदाराही सांभाळली.

शिंदेंच्या बंडखोरीला केला होता विरोध

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एकसंध शिवसेनेत फूट पडल्यानंतर संजय घाडी यांनी बंडखोर आमदारांविरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला होता. शिंदे समर्थक असलेल्या मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर झालेल्या आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले होते. या आंदोलनादरम्यान संजय घाडी आणि त्यांच्या पत्नी संजना यांनी शिंदे आणि सुर्वे यांच्या फोटो असलेल्या बॅनरला चप्पल मारून तीव्र निषेध व्यक्त केला होता. त्यावेळी झालेल्या या आंदोलनाची मुंबईसह संपूर्ण राज्यभरात जोरदार चर्चा रंगली होती. शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर संजना घाडी यांनी उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्तेपदाची धुरा सांभाळली होती. त्यांनी विविध माध्यमांसह जाहीर सभांमधून शिंदे गटावर टीकेची झोड उठवली होती.

आणखी वाचा : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या AI व्हिडिओने वाद, काँग्रेसच्या टीकेनंतर भाजपाने व्हिडीओ का डिलिट केला?

एप्रिल २०२५ मध्ये शिंदेसेनेत प्रवेश

गेल्या वर्षी एप्रिल २०२५ मध्ये अचानक एक नाट्यमय घडामोडी घडली. संजय आणि संजना घाडी या दोघांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या राजकीय निर्णयामुळे त्यांच्यावर ठाकरेंच्या समर्थकांनी जोरदार टीका केली. शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर घाडी यांनी आपल्या स्थानिक विकासकामांचा हवाला देत मुंबईतील दहिसर प्रभाग क्रमांक पाचमधून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्यांनी सातत्याने चर्चा केली. भाजपाप्रणीत महायुतीच्या जागावाटपात दहिसरमधील प्रभाग क्रमांक पाच हा वादग्रस्त ठरला होता. शिंदेसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी या प्रभागातून त्यांच्या मुलासाठी उमेदवारी मागितली होती; तर घाडी यांना प्रभाग क्रमांक चारमधून निवडणूक लढवण्यास सांगण्यात आले होते.

उमेदवारीवरून झाला होता वाद

आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलेली विनंती घाडी यांनी फेटाळून लावली आणि प्रभाग क्रमांक पाचमधूनच आपण निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. सरतेशेवटी हा वाद थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत गेला. त्यानंतर शिंदे यांनी आमदार प्रकाश सुर्वे यांची मनधरणी करून संजय घाडी यांची प्रभाग क्रमांक पाचमधून उमेदवारी निश्चित केली. यादरम्यान ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनीही घाडी यांना पराभूत करण्यासाठी जोरदार प्रचार केला. तरीदेखील घाडी यांनी महापालिका निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून सव्वा वर्षासाठी का होईना मुंबईच्या उपमहापौरपदाची माळ गळ्यात पाडून घेतली. त्यामुळेच त्यांचा हा राजकीय यू-टर्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा : Mohan Bhagwat: एससी, एसटी प्रवर्गातील स्वयंसेवक सरसंघचालक होऊ शकेल का? भावी सरसंघचालकांविषयी मोहन भागवत काय म्हणाले?

संजय घाडी यांची संपत्ती किती?

मुंबई महापालिका निवडणुकीत तब्बल ८९ जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ६५ जागांवर विजय मिळवला. त्याशिवाय शिंदे गटाने २९ जागा, काँग्रेसने २४ जागा, एमआयएमने आठ आणि राज ठाकरे यांच्या मनसेने सहा जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या. त्यामुळे भाजपा व शिंदे गटाच्या युतीने बहुमताचा आकडा गाठला असून महापौरपद भाजपाकडे तर उपमहापौरपद शिंदे गटाकडे राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदेसेनेकडून उपमहापौरपद मिळविणारे नगरसेवक संजय घाडी यांची एकूण मालमत्ता १२.८४ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न ४३.३६ लाख इतके असल्याचे निवडणूक प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत संजय घाडी यांनी जाहीर केलेली मालमत्ता ३.१० कोटी रुपये होती. त्यांच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नाही. विद्यार्थी राजकारणापासून मनसेपर्यंतचा प्रवास, २०२२ मध्ये शिवसेना फुटीला विरोध आणि आता शिंदेसेनेत प्रवेश करून उपमहापौर पद मिळवण्यापर्यंतचा संजय घाडी यांचा प्रवास मुंबईच्या बदलत्या राजकीय समीकरणांचे प्रतिबिंब आहे.