Vinesh Phogat vs Kavita Dalal: विनेश फोगटच्या विरोधात उतरली सलवार सूटमधील कुस्तीपटू; निवडणुकीच्या आखाड्यात कुणाचा विजय?

Vinesh Phogat vs Kavita Dalal: काँग्रेसची उमेदवार विनेश फोगटच्या विरोधात आम आदमी पक्षाकडून WWE कुस्तीपटू कविता दलाल हिला निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. त्यामुळे जुलाना विधानसभा मतदारसंघ आता कुस्तीचा आखाडा झाल्याची चर्चा आहे.

Who is WWE Wrestler Kavita Dalal Julana Assembly seat election
विनेश फोगटच्या विरोधात 'आप'कडून कुस्तीपटू कविता दलाल उतरली निवडणुकीच्या आखाड्यात. (Photo – PTI / Video Screenshot WWE)

Vinesh Phogat vs Kavita Dalal: हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची (आप) आघाडीची चर्चा फिसकटल्यानंतर आता दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत यंदा माजी कुस्तीपटू काँग्रेसकडून जुलाना विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवीत असल्यामुळे याकडे सर्व राज्याचे लक्ष आहे. ‘आप’ने या ठिकाणी आता WWE (World Wrestling Entertainment) कुस्तीपटू कविता दलाल हिला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. दोन्ही कुस्तीपटू निवडणुकीच्या मैदानात आपले नशीब आजमावणार आहेत. तर, भाजपाकडून माजी वैमानिक कॅप्टन योगेश बैरागी यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे जुलानाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

कोण आहेत कविता दलाल?

कविता दलाल या विनेश फोगटप्रमाणेच जाट समुदायाचे प्रतिनिधित्व करतात. तसेच २०१७ साली त्यांनी WWE कुस्तीच्या आखाड्यात पाऊल टाकले होते. WWE मध्ये पदार्पण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत; तर विनेश फोगटने ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीच्या अंतिम सामन्यात जाण्याचा विक्रम या वर्षी प्रस्थापित केला आहे. दोघीही जाट मते आपल्या बाजूला वळविण्याचा प्रयत्न करताना दिसतील.

हे वाचा >> Vinesh Phogat Wealth: काँग्रेसची उमेदवार, कुस्तीपटू विनेश फोगटची संपत्ती किती? निवडणूक अर्ज भरताना केले जाहीर

३७ वर्षीय कविता दलाल यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, विनेश फोगटने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली. त्याबद्दल मी तिचा आदर करते. आता ती राजकारणात उतरली असून, माझी राजकीय विरोधक आहे. माझी लढाई विनेशच्या विरोधात नसून, जुलाना विधानसभा मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठीची आहे.

जुलाना विधानसभेतील मालवी या गावातून कविता दलाल येतात. चार भावंडांपैकी त्या सर्वांत लहान आहेत. आपले काका बलवंत दलाल यांच्याकडून प्रेरणा घेत, त्यांनी लहान वयातच वेटलिफ्टिंगचा सराव सुरू केला. २००८ साली त्यांनी ७५ किलो वजनी गटात पदकही जिंकले होते; मात्र तरीही त्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकल्या नाहीत.

२००९ साली कविता दलाल यांचे लग्न झाले आणि पुढच्याच वर्षी त्या आई बनल्या. आई झाल्यानंतर क्रीडाविश्वातून माघार घेण्याची मानसिक तयारी करतानाच त्यांचे पती गौरव तोमर यांनी त्यांना पुन्हा खेळाकडे वळविले. गौरव तोमर हेदेखील खेळाडू आहेत. तोमर हे उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील व्हॉलीबॉल खेळाडू असून, सध्या सशस्त्र सीमा बलात नोकरी करीत आहेत. २०१२ साली कविता यांनी माजी WWE स्टार खेळाडू दलीप सिंह राणा ऊर्फ द ग्रेट खली यांच्या जालंधर अकॅडमीमधून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा >> विनेश फोगटला Wrestling Protest मध्ये दिला होता पाठिंबा, पण आता तिच्याविरुद्ध लढणार आहे; जाणून घ्या कोण आहे देशासाठी सुवर्णपदक जिंकणारी ही पैलवान?

२०१६ साली कविता दलाल यांनी आशियाई खेळात वेटलिफ्टिंग स्पर्धेत ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. पुढच्याच वर्षी दुबई येथे होणाऱ्या WWE च्या पात्रता निवडीसाठी त्यांनी उपस्थिती दर्शविली. त्यानंतर WWE मध्ये निवड होताच त्यांनी या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले. २०२२ साली कविता दलाल यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. सध्या त्या पक्षाच्या क्रीडा विभागाच्या राज्यप्रमुख आहेत.

कुस्तीपटू कविता दलाल या WWE या खेळात सलवार-कमीज वर खेळत असल्यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती. (Photo – WWE Video Screenshot)

जुलानामध्ये ‘आप’ची ताकद किती?

जुलाना विधानसभा मतदारसंघात ‘आप’ची फारशी ताकद नसल्याचे सांगितले जाते. मात्र, क्रीडापटू म्हणून त्या विनेश फोगटला आव्हान देऊ शकतात. जुलानामधील काँग्रेस नेते भूप लाठर म्हणाले की, विनेश फोगटच्या तुलनेत कविता दलाल यांचा काहीच प्रभाव जाणवणार नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Who is wwe wrestle kavita dalal aap candidate taking on congress vinesh phogat from julana assembly seat kvg

First published on: 12-09-2024 at 13:21 IST
Show comments