Who Will Be Kerala CM If Congress Comes to Power : केरळ विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी (४ मे) जाहीर होणार असला तरी, त्यापूर्वीच आलेल्या मतदानोत्तर चाचण्यांनी सत्ताधारी डाव्यांच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीला (यूडीएफ) स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळमधील जनता दर पाच वर्षांनी सत्ता परिवर्तनाची आपली जुनी परंपरा यंदाही कायम ठेवणार असल्याचे मतदानोत्तर चाचण्यांमधून दिसून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात जर काँग्रेसप्रणीत यूडीएफ आघाडी सत्तेत आल्यास मुख्यमंत्रिपदासाठी प्रमुख दावेदार कोण असणार, याबाबतची उत्सुकता अनेकांना लागून आहे, त्याविषयीचा हा सविस्तर आढावा…

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीला नवे वळण

केरळमधील यूडीएफ आघाडीतील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीला गुरुवारी नवे वळण मिळाले. काँग्रेसचा राज्यातील प्रमुख मित्रपक्ष असलेल्या इंडियन युनियन मुस्लीम लीगने (IUML) मुख्यमंत्रिपदासाठी थेट विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांच्या नावाला आपला पाठिंबा जाहीर केला. काही सर्वेक्षणांमध्ये सतीशन हे काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंतीचे उमेदवार असल्याचे समोर आले आहे. यादरम्यान मल्लमपुरमध्ये माध्यमांशी बोलताना मुस्लीम लीगचे प्रदेशाध्यक्ष सादिक अली शिहाब थांगल यांनी सतीशन यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा दाखला दिला. “सर्वेक्षणात मुख्यमंत्रिपदासाठी सतीशन यांना मिळालेली पसंती ही जनतेच्या भावनांचे प्रतिबिंब आहे. लोकांनी आपली मते अशा प्रकारे व्यक्त केली असावीत, असे मला वाटते. मुख्यमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना (हायकमांड) घ्यायचा आहे. जनतेच्या भावना विचारात घेऊनच दिल्लीतील नेते योग्य निर्णय घेतील. तसेच, नव्याने स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळात मुस्लीम लीगला योग्य स्थान मिळेल”, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसमधील चुरस वाढली

यापूर्वी मुख्यमंत्रीपदासाठी सतीशन, रमेश चेन्निथला आणि के. सी. वेणुगोपाल यांची नावे शर्यतीत येताच मुस्लीम लीगने योग्य वेळी आपली भूमिका मांडणार असल्याचे स्पष्ट केले होते. काँग्रेसमधील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, गेल्या पाच वर्षांत पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात सक्षमपणे लढा दिल्याने सतीशन यांच्या बाजूने जनमत सकारात्मक आहे, त्यामुळे ते मुख्यमंत्रिपदासाठी स्वाभाविक पसंती ठरू शकतात. मात्र, काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी राज्यातील उमेदवारांची निवड केल्यामुळे बहुतांश उमेदवार वेणुगोपाल यांचे निष्ठावंत मानले जातात. वेणुगोपाल यांच्या एन्ट्रीमुळे मुख्यमंत्रिपदासाठी स्पर्धा अधिकच क्लिष्ट होऊ शकते. तसेच काँग्रेसचे सर्वात ज्येष्ठ नेते असलेले रमेश चेन्निथला हेदेखील मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. राजीव गांधी पंतप्रधान असताना ते खासदार होते, त्यामुळे सोनिया गांधींशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. यादरम्यान काँग्रेसचे उच्च नेतृत्व निवडून आलेल्या आमदारांच्या मतांचा विचार करून मुख्यमंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय घेत असले, तरी १४० सदस्यीय विधानसभेत युडीएफला अल्प बहुमत मिळाल्यास राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असलेल्या मुस्लीम लीगची भूमिका अत्यंत निर्णायक ठरू शकते.

काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसमोरील जुने पर्याय संपुष्टात

केरळमधील काँग्रेसच्या निर्णयांवर मुस्लीम लीगचे नियंत्रण असते, अशी टीका विरोधी पक्षांकडून वारंवार केली जाते. या भूमिकेमुळे काँग्रेसचे नेते इतर समुदायांपासून दूर गेल्याचा आरोपही केला जातो. यावेळी मात्र काँग्रेसने विरोधकांच्या टीकेला आपल्या प्रचारातून चोख प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसच्या उच्च नेतृत्वातील महत्त्वाचे सदस्य असलेल्या वेणुगोपाल यांच्या प्रवेशामुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अधिक गुंतागुंत निर्माण झाली आहे. यापूर्वी केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना अशा परिस्थितीत वरिष्ठ नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा सांभाळण्यासाठी त्यांना केंद्रात मंत्रिपदे दिली जात होती. १९९५ मध्ये ज्येष्ठ नेते करुणाकरन यांनी ए. के. अँटनी यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतली होती, त्यावेळी केंद्रात त्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले होते. त्यानंतर २००४ मध्ये अँटनी यांनी राजीनामा देऊन ओमन चंडी यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा केला, तेव्हा त्यांना यूपीए सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आता केंद्रामध्ये काँग्रेस सत्ताधारी नसल्याने केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठीची ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची बनली आहे.

नटेशन यांचा मुस्लीम लीगवर हल्लाबोल

मुस्लीम लीगने मुख्यमंत्रिपदासाठी सतीशन यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर हिंदू समुदायाचे ज्येष्ठ नेते वेल्लापल्ली नटेशन यांनी गुरुवारी कडक शब्दांत टीका केली. जर काँग्रेसप्रणीत युडीएफ आघाडीचे सरकार आल्यास केरळमध्ये फक्त मुस्लीम लीगचेच राज्य असेल. निकाल लागताच ते उपमुख्यमंत्रीपदाची मागणी करतील. युडीएफमध्ये मुस्लीम लीगच मंत्रिपदे ठरवत आहे. काँग्रेसचा मुख्यमंत्री कोण असावा, हे सांगण्याचा अधिकार त्यांना नाही. या सरकारच्या काळात काय होणार आहे हे आम्हाला ठाऊक आहे. मुस्लीम लीग राज्यात अराजकता आणि समस्या निर्माण करेल, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. गेल्या वर्षभरात नटेशन यांनी केलेल्या अल्पसंख्याक विरोधी विधानांवर सतीशन यांनी कठोर भूमिका घेतली होती, तेव्हापासून नटेशन त्यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. केरळमध्ये सत्ताधारी डाव्यांची आघाडी आपली सत्ता राखण्यास यशस्वी ठरेल, असे भाकीतही नटेशन यांनी केले आहे. दरम्यान, राज्यात निवडून येणारे नवीन आमदार कोणाच्या पारड्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.