पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे १९९९ मध्ये पहिल्यांदा पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर २०१४ ते २०१९ हा भाजप आणि तत्कालीन शिवसेनेचा पाच वर्षांचा कालावधी आणि २०१९ ते २०२३ या काळात राज्यातील अस्थिर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सरकारचा काळ वगळता शेवटपर्यंत पुण्याचे पालकमंत्री राहिले. त्यांच्या अकाली निधनानंतर पुणे जिल्ह्याचे नवे पालकमंत्री कोण होणार? याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर १९९९ ते २००३ या कालावधीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि पुण्याचे पालकमंत्रीपदी अजित पवार यांची नियुक्ती झाली. त्यानंतर हे पद त्यांच्याकडे येत राहिले. त्याद्वारे त्यांनी जिल्ह्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. २००४ ते २०१४ या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेवर होते. तेव्हा सलग १० वर्षे या पदावर राहण्याचा मान अजित पवार यांना मिळाला. या पदाचा योग्य विनियोग करून त्यांनी जिल्ह्यावर पकड मिळवली. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तांतर झाले. भाजप आणि तत्कालीन शिवसेनेचे सरकार आले. या काळात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद गिरीश बापट यांच्याकडे आले. बापट हे खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर काही काळ या पदाची जबाबदारी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय घडामोडी होऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे महाविकास आघाडीचे सरकार आले. मात्र, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हेच राहिले. २०१९ ते जून २०२२ पर्यंत ते या पदावर होते. मात्र, तत्कालीन शिवसेनेत फूट पडल्याने महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिवसेना (शिंदे) अणि भाजप यांनी सरकार स्थापन केले. तेव्हा अजित पवार यांच्याकडील हे पद सप्टेंबर २०२२ मध्ये राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आले. त्यानंतर तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट फडली. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर अजित पवार हे सामील झाले. त्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या महायुती सरकारच्या काळात चंद्रकांत पाटील यांच्याकडून हे पद काढून ऑक्टोबर २०२३ ते २०२४ पर्यंत पुन्हा अजित पवार यांच्याकडे साेपविण्यात आले.
२०२४ मध्ये महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडेच राहिली. चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले. त्यामुळे पालकमंत्री आणि अजित पवार हे एक समीकरणच झाले. आता पुण्याचे नवीन पालकमंत्री कोण, याबाबत राजकीय वर्तुळत चर्चा सुरू झाली आहे.
पालकमंत्री पदाचे दावेदार
पालकमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडेच कायम ठेवण्याचे निश्चित झाल्यास आणि विधिमंडळ नेतेपदी अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यास या पदाची सूत्रे सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपविली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अजित पवार यांचे पुणे जिल्ह्यातील विश्वासू साथीदार म्हणून राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची ओळख आहे. त्यांच्याकडे ही या पदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपने या पदावर दावा केल्यास चंद्रकांत पाटील यांची हा पदावर वर्णी लागण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.

