West Bengal Next CM Race: Strategic Analysis of BJP : पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष पहिल्यांदाच सत्ता स्थापन करण्याच्या उंबरठ्यावर असताना राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार, याकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. राज्यात भाजपाला सत्ता मिळाल्यास पुढचा मुख्यमंत्री बंगालीच असेल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर प्रसारसभेतून दिले होते. भाजपा हा राज्याबाहेरचा पक्ष असल्याच्या तृणमूल काँग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी ही भूमिका मांडली होती. यादरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजपाकडून मुख्यमंत्रिपदासाठी चार नेत्यांची नावे शर्यतीत असल्याचे समोर आले आहे, त्याविषयीचा हा आढावा…
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर कोण?
पश्चिम बंगालमध्ये भाजपा सत्तेच्या उंबरठ्यावर असतानाच मुख्यमंत्रिपदासाठी संभाव्य चेहऱ्यांमध्ये सुवेंदू अधिकारी यांचे नाव सर्वात आघाडीवर असल्याचे मानले जाते. एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे विश्वासू सहकारी असलेले अधिकारी यांनी डिसेंबर २०२० मध्ये पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला होता. त्यांचा हा निर्णय तृणमूल काँग्रेससाठी मोठा धक्का मानला गेला. २०११ मध्ये ज्या नंदीग्राम आंदोलनाने ममता बॅनर्जी यांना सत्तेवर बसवले, त्याच नंदीग्राममध्ये २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत सुवेंदू यांनी ममता यांचा पराभव करून राजकीय खळबळ उडवून दिली होती. या निवडणुकीत भाजपाला सत्ता मिळाली नसली तरी ७७ जागांसह त्यांनी प्रबळ विरोधी पक्ष म्हणून राज्यात स्थान मिळवले होते.
सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री?
सुवेंदू अधिकारी यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवताना गेल्या पाच वर्षांत सभागृहात ममता सरकारला सळो की पळो करून सोडले. काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या अधिकारी यांनी डाव्यांच्या सुवर्णकाळात त्यांच्याशी दोन हात केले. २०११ साली बंगालमधील जमीन अधिग्रहणाविरोधातील आंदोलनादरम्यान ते ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय नेते मानले जात होते.? भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, २०२१ मध्ये झालेल्या पराभवानंतर भारतीय जनता पार्टी राज्यातून संपणार असे अनेकांना वाटत होते. मात्र, अशा कठीण काळातही सुवेंदू अधिकारी यांनी अत्यंत मेहनतीने काम करीत भाजपाला बंगालमध्ये विजय मिळवून दिला. मतदानावेळी राज्यात ठिकठिकाणी झालेल्या हिंसाचारातही ते भाजपा कार्यकर्त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले, त्यामुळेच आज ते संपूर्ण पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून समोर आले आहेत.
स्वपन दासगुप्ता यांचेही नाव शर्यतीत
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत असलेल्या नावांमध्ये स्वपन दासगुप्ता यांचाही समावेश होत आहे. माजी पत्रकार असलेल्या दासगुप्ता यांनी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाच्या प्रचार मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला होता. पक्षाच्या धोरणात्मक निर्णयांपासून ते संघटनात्मक कामकाजापर्यंत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मानले जाते. दासगुप्ता हे बंगाल भाजपामधील अभ्यासू आणि सुसंस्कृत चेहरा म्हणून ओळखले जातात. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या विशेषतः दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या ते अत्यंत जवळचे मानले जातात. भारतीय जनता पार्टीची निवडणूक रणनीती ठरवण्यात त्यांचा मोठा वाटा असतो. शमिक भट्टाचार्य यांच्याप्रमाणेच दासगुप्ता हेदेखील बंगालच्या ‘भद्रलोक’ (सुशिक्षित मध्यमवर्ग) समाजाचे प्रतिनिधित्व करतात, जे ममता बॅनर्जी यांच्या ‘बाहेरील लोक’ या प्रचाराला उत्तर देण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. दासगुप्ता यांची वैचारिक स्पष्टता आणि दिल्लीतील वजन ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे. मात्र, त्यांच्या निवडीमध्ये एक तांत्रिक अडचण किंवा कमतरता प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे प्रशासकीय अनुभवाचा अभाव. लोकप्रतिनिधी म्हणून किंवा सरकार चालवण्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांच्याकडे कमी असल्याने मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाल्यास प्रशासनावर पकड मिळवणे हे त्यांच्यापुढचे मोठे आव्हान असू शकते.
दिलीप घोष होणार पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री?
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत दिलीप घोष हे एक महत्त्वाचे नाव आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला शून्यातून विश्व निर्माण करून देण्यात घोष यांचा मोलाचा वाटा मानला जातो. २०१६ मध्ये जेव्हा भाजपाकडे केवळ तीनच आमदार होते, तेव्हापासून दिलीप घोष यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा सांभाळली. त्यांच्याच कार्यकाळात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४२ पैकी १८ जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. ही कामगिरी भाजपाची बंगालमधील आतापर्यंतची सर्वात मोठी झेप मानली जाते. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर दिलीप घोष काही काळ पक्षाच्या मुख्य प्रवाहातून दूर गेले होते. मात्र, याच वर्षी जानेवारी महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर पुन्हा सन्मानाने त्यांना मुख्य प्रवाहात आणले गेले. पक्षाला कठीण काळात सावरणारा आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरणारा नेता म्हणून दिलीप घोष यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत कायम आहे.
सुकांत मजूमदार यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे?
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सुकांत मजूमदार यांचेही नाव आघाडीवर असल्याचे समजते. मजूमदार यांनी यापूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली असून, सध्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री म्हणून कार्यरत आहेत. उत्तर बंगाल हा भाजपाचा सर्वात मजबूत गड मानला जातो. जर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने या भागातून राज्याला नेतृत्व देण्याचे ठरवले, तर सुकांत मजूमदार हे त्यांच्यासाठी पहिला पर्याय ठरू शकतात. उत्तर बंगालमधील मतदारांवर त्यांची चांगली पकड असून, या भागात पक्षाला मिळालेल्या यशात त्यांचा मोठा वाटा आहे. केंद्रीय मंत्री म्हणून काम करत असल्यामुळे मजूमदार यांच्याकडे प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे, जो राज्याचे नेतृत्व करताना त्यांना उपयुक्त ठरू शकतो. याशिवाय प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यभर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम केले आहे, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे; त्यामुळे या चार नावांपैकी भाजपा एकाच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकणार की ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
