रवींद्र जुनारकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. सध्या काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष्य केंद्रित केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजप ‘भैय्या’ म्हणजेच माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना उतरवते की ‘भाऊ’ म्हणजेच राज्याचे विद्यमान वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यपालन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना संधी देते, याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.

राज्यातील १६ पराभूत लोकसभा मतदार संघावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. त्या दृष्टीने भाजपने तयारी सुरू केली आहे. चंद्रपूर लोकसभा जिंकायचीच, असा निर्धार करीत केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याकडे हा मतदारसंघ सोपवण्यात आला आहे. येत्या २२ ते २४ सप्टेंबर या काळात केंद्रीय मंत्री पुरी या लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहे. तसेच आगामी अठरा महिन्यात सहा वेळा ते या मतदारसंघात येऊन आढावा घेणार आहेत. भाजपचे १५० पदाधिकारी आतापासूनच या मतदारसंघात कामाला लागले आहे. लोकसभा क्षेत्रात मोडणाऱ्या एकूण सहापैकी चार विधानसभा मतदारसंघात भाजपला स्वपक्षीय आमदार असतानाही कमी मताधिक्य मिळाले होते. त्यामुळेच अहीर यांचा पराभव झाला होता. भाजपने या विधानसभा मतदारसंघावरही लक्ष केंद्रित केले आहे. बुथ पातळीवर अतिशय नियोजनबद्ध पध्दतीने कामाला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा… पुण्यातील ‘पवार’ सरकारबद्दल हर्षवर्धन पाटील यांची नाराजी; राज्यात सरकार बदलले पुण्यात कधी बदलणार?

माजी मंत्री अहीर पायाला भिंगरी लागल्यासारखे या लोकसभा क्षेत्रात प्रचंड दौरे करीत आहेत. आर्णीपासून तर कोरपना, जिवती तालुक्यापर्यंत त्यांनी पुन्हा एकदा जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. दुसरीकडे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर व चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात अडकून न पडता राजुरा, वरोरा या विधानसभा क्षेत्रासोबतच सर्वत्र दौरे करीत सत्कार समारंभाला हजेरी लावत आहेत. भाजपच्या संघटनात्मक बैठकीत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी वनमंत्री मुनगंटीवार यांच्या एकूणच कामाच्या पद्धतीचे कौतुक करीत स्तुतिसुमने उधळली. भाजपच्या अनेक कार्यक्रमांमध्ये मुनगंटीवार यांना पुढे केले जात आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत या लोकसभा मतदार संघाची उमेदवारी ‘भाऊ’ की ‘भैय्या’ यापैकी कोणाला मिळेल, याबाबत भाजप कार्यकर्त्यांसह जनमानसात तर्कवितर्क लावले जात आहे.

हेही वाचा… लातूर जिल्ह्यात पालिका निवडणुकीची धामधूम

भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवरून निर्देश आल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागते, असे दोन्ही नेत्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, काँग्रेसचे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांना पराभूत करायचे असेल तर उमेदवार सर्व दृष्टीने सक्षम हवा. त्याच दृष्टीने सध्या भाजपचे नियोजन सुरू आहे. राजुरा येथे नुकतीच वनमंत्री मुनगंटीवार यांची लाडूतुला झाली. या कार्यक्रमाला हंसराज अहीरदेखील उपस्थित होते. त्या कार्यक्रमाकडेही लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणूनच बघितले जात आहे. २०२४ मध्ये अहीर आणि मुनगंटीवार यांच्यापैकी कोणाला संधी दिली जाईल, याचे उत्तर भाजपचे चंद्रपूर प्रभारी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या आगामी दौऱ्यानंतरच स्पष्ट होईल. तूर्त, या लोकसभा क्षेत्रात ‘भाऊ’ व ‘भैय्या’ ही दोन्ही नावे चर्चेत आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who will lead in chandrapur lok sabha constituency bahu aur bhaiya print politics news asj
First published on: 07-09-2022 at 13:09 IST