उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा थांबल्याचे दिसून येत आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया आता थांबेल, असा अंदाज व्यक्त केला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला काहीही न कळवता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने काही निर्णय घेतल्याचे शरद पवार यांच्या बोलण्यातून समोर आले. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरण किंवा एकत्र येण्याच्या प्रक्रियेबाबत शंका निर्माण झाली आहे.

सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ नेतेपदी नियुक्ती झाली हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने घेतलेला निर्णय आहे, असे शरद पवार म्हणाले. तसेच या निर्णयाबाबत त्यांच्या पक्षाशी कोणतीही चर्चा झाली नाही, असे शरद पवार म्हणाले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचा विलीनीकरणास विरोध असल्याचे शरद पवार यांच्या विधानावरून दिसून येते. सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीतील नेत्यांना विलीनीकरण झाल्यास पक्ष शरद पवारांच्या हातात जाण्याची भीती होती, अशी चर्चा आहे. तसेच त्यांना पक्षातील, सत्तेतील त्यांचे स्थान, मंत्रीपद व अधिकार यावर गदा येण्याची भीती होती. म्हणून त्यांनी पुढील पाऊलं झटपट उचलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दोन्ही राष्ट्रवादीतील संवादच संपला

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासाठी अजित पवार यांनी पुढाकार घेतला होता, अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांतील नेत्यांनी दिली. अजित पवार यांनी विलीनीकरणासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील जयंत पाटील, शशिकांत शिंदे या नेत्यांशी चर्चा सुरू केली होती. तसेच शरद पवारांशीदेखील त्यांनी चर्चा केली होती. शरद पवार यांनी या गोष्टीला दुजोरा देताना म्हटले, “चार महिन्यांपासून अजित पवार आणि जयंत पाटील हे दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा करत होते. मात्र मध्येच ही दुर्दैवी घटना घडली. आता ही चर्चेची प्रक्रिया थांबेल असे दिसते.” शरद पवार म्हणाले, “अजित पवार, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे विलीनीकरणाच्या चर्चेत सहभागी होते.”

अजित पवार यांच्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना एकत्र आणण्याची क्षमता होती. त्यांच्या अकाली निधनाने आता दोन्ही पक्षांतील संवादात पोकळी निर्माण झाली आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना कोणती भीती ?

२०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर अजित पवारांना साथ देणारे नेते आता मंत्री पदांवर आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांना महत्वाची पदे मिळालेली आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास सर्वात मोठा फटका याच नेत्यांना बसण्याची शक्यता होती. दोन्ही पक्ष एकत्र आले असते तर सत्तेतील मंत्रीपद तसेच पक्षातील महत्वाच्या पदांमध्ये फेरबदल होण्याची शक्यता होती. राष्ट्रवादी काँग्रेस मधील ज्येष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना पद व त्यांचे पक्षातील महत्व कमी होण्याची भीती होती, त्यामुळेच त्यांनी घाई केली, अशी शक्यता व्यक्त केली आहे.

दोन्ही पक्ष एकत्र आले असते तर जयंत पाटील व अनिल देशमुख यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचे पक्षातील महत्व वाढले असते. त्यामुळे अजित पवार यांच्या गटातील नेत्यांवर एक प्रकारे दबाव आला असता. त्यांचे पक्षातील महत्व कमी झाले असते. अजित पवार होते तेव्हा त्यांच्या गटातील नेत्यांची भूमिका ते स्वत: परखडपणे मांडायचे. अजित पवार नसताना या नेत्यांची अडचण झाली असती, त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाचे सूत्र सोपवण्याची घाई केली, अशी चर्चा आहे.

शरद पवारांचे महत्व वाढले असते

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष एकत्र आले तर शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या हातात पक्षाचे नेतृत्व जाईल. पक्षाचे महत्वाचे निर्णय शरद पवार व सुप्रिया सुळे घेतील. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांचा याला विरोध आहे. तसेच अजित पवारांमुळे पक्षात महत्वाचे स्थान मिळालेल्या नेत्यांना त्यांचे पक्षातील महत्व कमी होईल अशी भीती आहे.

शरद पवार हे पक्षातील नेत्यांच्या भूमिकेपेक्षा स्वत:च्या विचारधारेवर पक्ष चालवू इच्छितात, अशी तक्रार राष्ट्रवादीतील काही नेत्यांची होती. राष्ट्रवादीत फूट पडण्याचे हेदेखील एक कारण होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजपा-शिवसेनेची सत्ता येण्याआधी राज्याच्या सत्तेत होता. त्यामुळे राष्ट्रवादीतील नेत्यांना भाजपाबरोबर सत्तेत जाण्याची महत्वाकांक्षा होती. परंतु, त्यास शरद पवार यांचा विरोध होता. त्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडली. आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना शरद पवार यांच्यापेक्षा अजित पवार याचे कुटुंबिय राजकीय निर्णय घेण्यास सक्षम तसेच लवचिक असल्याचे वाटत असावे, अशी शक्यता आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या हातात पक्षाची सुत्रे गेल्यास त्यांची महायुतीत भाजपाबरोबर जाण्याबाबत काय भूमिका असेल, याबाबतही साशंकता होती.

भाजपा आणि शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास त्याचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे जाईल. भाजपाला शरद पवार यांच्याबरोबर वाटाघाटी करणे तसेच सत्तेत जुळवून घेणे अवघड गेले असते, असे राजकीय विश्लेषक म्हणतात. त्यापेक्षा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीतील नेत्यांबरोबर वाटाघाटी करणे भाजपाला सहज साध्य होणारे आहे.

जुळवाजुळवीच्या राजकारणात शरद पवार हे मुत्सद्दी आहेत. सत्तेतील वाटाघाटीत भाजपाला त्यांनी जास्तीत जास्त जागा, महत्वाची पदे मागितली असती. त्या तुलनेत अजित पवार यांच्या गटातील नेते हे भाजपावर जास्त अवलंबून आहेत. त्यामुळे भाजपाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जुळवून घेणे अधिक सोईचे आहे.