Will K. Annamalai Resign From BJP : तमिळनाडूमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या जोसेफ विजय यांच्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून राज्यात सरकार स्थापन केले. विजय यांच्या या अभूतपूर्व यशामुळे केवळ द्रमुक आणि अण्णाद्रमुकच नव्हे तर भाजपाच्या अंतर्गत समीकरणांनाही मोठा हादरा बसला. या बदलत्या राजकीय वातावरणात राज्यातील भाजपाचे प्रभावशाली नेते के. अन्नामलाई हे पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. सोमवारी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर आपण भाजपापासून वेगळे होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले.

तमिळनाडूचे ‘सिंगम’ म्हणून ओळख

राजकारणात येण्यापूर्वी अन्नामलाई हे कर्नाटक कॅडरचे २०११ बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांच्या धाडसी आणि कठोर पोलीस कारवाईच्या शैलीमुळे त्यांना कर्नाटकचा सिंघम म्हणून ओळख मिळाली होती. उडुपीचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना अन्नामलाई यांची बदल करण्यात आली होती. त्यावेळी स्थानिकांनी त्यांच्या बदलीविरोधात आंदोलनही केले होते. पुढे मे २०१९ मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आपल्या राजीनाम्यामागील कारणे स्पष्ट करताना अण्णामलाई यांनी २०१८ मध्ये केलेल्या कैलास-मानसरोवर यात्रेचा उल्लेख केला. या यात्रेमुळे आयुष्यातील प्राधान्यक्रम नव्याने समजून घेण्यास मदत झाल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच, डिसेंबर २०१८ मध्ये स्वाईन फ्लूमुळे निधन झालेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी मधुकर शेट्टी यांच्या मृत्यूचाही आपल्या निर्णयावर मोठा प्रभाव पडल्याचे त्यांनी सांगितले. बेकायदा खाणकाम प्रकरण उघडकीस आणण्यात शेट्टी यांची महत्त्वाची भूमिका होती.

सामाजिक कामातून राजकारणात प्रवेश

तमिळनाडूच्या पश्चिमेकडील करूर येथील ‘गौंडर’ समाजातून येणाऱ्या अन्नामलाई यांनी नोकरी सोडल्यानंतर काही काळ प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत केले. या काळात त्यांनी ‘वी द लीडर फाउंडेशन’या आपल्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांत सामाजिक कार्य केले. अखेर मे २०२० मध्ये एका फेसबुक लाइव्ह दरम्यान त्यांनी आपल्या पुढील वाटचालीची घोषणा केली. “मी तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश करण्याचा विचार करत असून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे… राजकारणात येऊन मला या व्यवस्थेत बदल घडवून आणायचा आहे,” असे ते म्हणाले होते. सुरुवातीला अन्नामलाई नेमके कोणत्या पक्षात जाणार, याबाबत अनिश्चितता होती. एका टप्प्यावर त्यांनी, “मी अभिनेते रजनीकांत यांच्या राजकीय घोषणेची वाट पाहत असून त्यांनी नवा पक्ष काढल्यास मी त्यात सामील होण्याबाबत विचार करेन,” असेही म्हटले होते. मात्र, रजनीकांत यांनी आपला राजकीय निर्णय मागे घेतल्यामुळे, तीन महिन्यांनंतर अन्नामलाई यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपामधील प्रवेश आणि राजकीय महत्त्वाकांक्षा

भाजपा प्रवेशावेळी दी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अन्नामलाई म्हणाले होते की, देशाला सामाजिक बदलासोबतच राजकीय बदलाचीही तितकीच गरज असल्याचे मला वाटते. माझी तत्त्वे भाजपाच्या विचारसरणीशी जुळतात. तसेच, हा पक्ष गुणवत्तेच्या आधारावर नेतृत्वाला संधी देतो. देशासाठी व्यापक दृष्टीकोन असलेला हा राष्ट्रवादी पक्ष असल्याने मी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. द्रविडीयन पक्षावर टीका करताना अन्नामलाई म्हणाले होते की, द्रमुक आणि अण्णाद्रमुक पक्षाने आपल्या स्थापनेमागील मूळ उद्दिष्टांना बगल दिली आहे. हे दोन्ही पक्ष केवळ एका कुटुंबाचीच विचारधारा पुढे नेत आहेत. अशा पक्षात जाऊन सर्वोच्च नेत्याच्या आशीर्वादासाठी रांगेत उभे राहण्याची मी कल्पनाही करू शकत नाही. विशेष म्हणजे, द्रविड पक्षांविरोधातील हीच भूमिका पुढे त्यांच्या राजकीय अडचणींचे एक प्रमुख कारण ठरल्याचे मानले जाते.

अन्नामलाईंचे भाजपातील वजन कसे वाढले?

२०२१ मध्ये झालेल्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत एम. के स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुकची सत्ता आली होती. त्यावेळी भाजपाचे राज्यातील प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन यांची केंद्रात मंत्री म्हणून वर्णी लागली. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी अन्नामलाई यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. अरवाकुरुची मतदारसंघातून निवडणूक लढवताना त्यांचा पराभव झाला असला, तरी पश्चिम तमिळनाडूमध्ये भाजपाला दोन जागा मिळवून देण्यात अन्नामलाई यांनी मोलाची भूमिका बजावली. याच कामगिरीमुळे पक्षात त्यांचे वजन झपाट्याने वाढले. भाजपाचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बीएल संतोष यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या अण्णामलाई यांनी राज्यात भाजपाची ताकद वाढवण्याचे आणि द्रविड पक्षांचे वर्चस्व मोडून काढण्याचे अभियान सुरू केले. द्रविड पक्षांवर केलेल्या त्यांच्या आक्रमक टीकेमुळे अत्यंत कमी कालावधीतच ते लोकप्रिय झाले.

लोकसभा निवडणुकीनंतर समीकरणे बदलली

एकीकडे पक्षात स्थान बळकट होत असतानाच दुसऱ्या बाजूला अन्नामलाई यांना भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील प्रभावशाली नेत्यांच्या विरोधालाही सामोरे जावे लागले. त्यांच्या आक्रमक राजकीय शैलीमुळे भाजपाला प्रसिद्धी मिळाली, पण त्यामुळे पक्षातील काही नेते नाराज झाले होते. यादरम्यान भाजपा आणि त्यांचा प्रमुख मित्रपक्ष असलेल्या अण्णाद्रमुकमधील संबंधही ताणले गेले. अखेर २०२४ च्या निवडणुकीपूर्वी अण्णाद्रमुकने भाजपाशी फारकत घेतली आणि त्यासाठी काहींनी अन्नामलाई यांनाच जबाबदार धरले. लोकसभा निवडणुकीतील अपेक्षित यश न मिळाल्यानंतर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने तमिळनाडूमधील आपली राजकीय रणनीती नव्याने आखण्यास सुरुवात केली. पक्षाचा उदयोन्मुख चेहरा मानल्या जाणाऱ्या अन्नामलाई यांना यापूर्वी मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य देण्यात आले होते. मात्र निवडणुकीनंतर पक्षाने वेगळी भूमिका घेतली.

विधानसभा निवडणूक लढवण्यास नकार

२०२६ मधील तमिळनाडू विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन एप्रिल २०२५ मध्ये भाजपाने पुन्हा एकदा अण्णाद्रमुकशी युती केली. त्यानंतर अण्णामलाई यांना बाजूला करण्यात आले आणि त्यांच्या जागी तुलनेने मवाळ असलेले नेते नैनार नागेंद्रन यांची तमिळनाडू भाजपाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यानंतर अन्नामलाई पक्षाच्या मुख्य प्रवाहापासून दूरच राहिले. भाजपाने त्यांना विधानसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला होता, पण त्यांनी निवडणुकीपासून दुरावा ठेवला. त्यामुळे पक्षाबरोबरचे त्यांचे मतभेद आणखीनच वाढत गेले. भाजपाने तमिळनाडूत द्रविड पक्षांना पर्याय म्हणून स्वतःची स्वतंत्र ताकद उभी करावी, अशी अन्नामलाई यांची भूमिका होती. अण्णाद्रमुकवर अवलंबून राहण्याऐवजी पक्षाने स्वतःच्या बळावर लढावे, असा आग्रही त्यांनी धरला होता. मात्र, भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांचे काहीही न ऐकता अण्णाद्रमुकशी युती कायम ठेवली. अखेरीस भाजपाप्रणीत आघाडीला या निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला.

तमिळनाडूत भाजपासमोर अडचणींचा डोंगर?

राजकीय विश्लेषकांच्या मते, जर अन्नामलाई यांना तमिळनाडूमध्ये काम करण्याचे अधिक स्वातंत्र्य मिळाले असते, तर राजकीय बदलाची आस धरून बसलेल्या मतदारांसमोर केवळ जोसेफ विजय यांचा पक्ष हा एकमेव पर्याय उरला नसता. ही परिस्थिती भाजपासाठी अत्यंत फायद्याची ठरली असती. एकेकाळी अन्नामलाई हे राज्यातील भाजपाचे सर्वात प्रभावशाली नेते मानले जात होते. मात्र, आता त्यांनीच पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपासमोर मोठ्या अडचणींचा डोंगर उभा राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात स्वतंत्र राजकीय पर्याय उभा करण्याच्या अन्नामलाई यांच्या प्रयत्नांना अधिक पाठबळ मिळाले असते, तर कदाचित तमिळनाडूतील भाजपाचे चित्र वेगळे असू शकले असते, अशी कुजबूज सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.