गणेशोत्सव अगदी तोंडावर येऊन ठेपला असतानाच डीजेबंदीच्या मागणीवरून राज्यात मोठा राजकीय वादंग निर्माण झाला. गणेशोत्वात डीजेचा दणदणाट आणि स्पीकरच्या कर्णकर्कश आवाज लावणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी जोरकसपणे लावून धरली. त्यातच या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुतीतील शिंदेसेना आणि भाजपातही मतभेद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या संवेदनशील विषयावर अद्याप कोणतीही कठोर भूमिका घेणे टाळले आहे. पुण्यात गणेशोत्सव मंडळांतील हजारो कार्यकर्ते भाजपाचे समर्थक मानले जातात. त्यामुळे त्यांची नाराजी ओढवून घेण्यापेक्षा फडणवीस सरकार अधिकच संयमाची भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळते. पुण्यात १० हजारांहून अधिक नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत गणेश मंडळे असून त्यांच्याशी प्रामुख्याने लाखो तरुण कार्यकर्ते जोडलेले असल्याचे सांगितले जाते.

गणेशोत्वात डीजेच्या दणदणाटाला विरोध होण्यास सुरुवात झाल्यापासून मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोनदा या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली; पण दोन्हीवेळा त्यांनी याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार पुणेकरांवरच सोपवला. “सर्व निर्णय जनतेला विश्वासात घेऊनच झाले पाहिजेत… सणांमधील परंपरा किंवा रूढी या केवळ कायद्याचा बडगा दाखवून अचानक थांबवता येत नाहीत. अशा प्रथा थांबवायच्या असतील, तर कायद्याची भीती दाखवण्यापेक्षा लोकांना विश्वासात घेऊन मध्यममार्ग काढण्याची गरज असते, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवर विरोधी पक्षांनी मात्र तीव्र आक्षेप घेतला. ध्वनिप्रदूषणावर कारवाई करण्याची जनतेकडून वाढती मागणी असतानाही फडणवीस अप्रत्यक्षपणे अनिर्णायक भूमिका घेत असल्याचा थेट आरोप विरोधकांनी केला.

डीजेला विरोध करणारे बापट कोण?

गणेशोत्सवात डीजे आणि डॉल्बीच्या वापरावरून सुरू झालेला वाद पुण्यातील नारायण पेठेतील नागरिक विद्यानंद बापट यांच्या भूमिकेनंतर पेटला. २४ ऑगस्ट रोजी पुणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या पूर्वतयारी बैठकीत बापट यांनी गणेशोत्सवादरम्यान डीजेवर पूर्ण बंदी घालण्याची थेट मागणी केली. त्या बैठकीत उपस्थित गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी बापट यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तरीही डगमगून न जाता बापट यांनी आपली मागणी आणखीनच प्रभावीपणे मांडली. यादरम्यान ३ सप्टेंबर रोजी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना एका कार्यकर्त्याने बापट यांच्यावर हल्ला चढवला. या घटनेनंतर डीजेबंदीच्या मुद्द्यावरून पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले.

हल्ल्यानंतरही बापट यांची ठाम भूमिका

हल्ल्यानंतरही विद्यानंद बापट यांनी कोणतीही माघार न घेण्यास नकार दिला. केवळ डीजेच नाही तर स्पीकरच्या कर्णकर्कश आवाजावरही त्यांनी बंदी घालण्याची मागणी केली. कोणालाही साऊंड सिस्टीमचा वापर करायचा असल्यास त्यांनी तो बंदिस्त जागेत करावा मोकळ्या मैदानात किंवा सार्वजनिक ठिकाणी नाही, अशी परखड भूमिका बापट यांनी मांडली. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून पुण्यात नागरिकांचे दोन गट पडले. सुजाण नागरिकांचा एक मोठा वर्ग बापट यांच्या समर्थनार्थ पुढे आला, तर विरोधकांच्या महाविकास आघाडीनेही त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला. पुण्यातील या वादाचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. अनेक जिल्हा प्रशासनांनी हाय-डेसिबल साऊंड सिस्टीमवर कारवाई करण्यास सुरुवात केली. नागपूर, सोलापूर, लातूर आणि नांदेड प्रशासनाने आगामी सणांच्या काळात डीजे आणि आवाज वाढवणाऱ्या उपकरणांवर बंदी घातली. मुंबईमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गेल्या वर्षी घालण्यात आलेली बंदी यंदाही कायम राहील, असे महानगरपालिकेने स्पष्ट केले.

डीजेबंदीवरून भाजपा-शिंदेसेनेत दोन गट

डीजेबंदीच्या मागणीवरून सत्ताधारी भाजपातील उघड मतभेद समोर आले. पुण्यातील भाजपाचे शहराध्यक्ष धीरट धाटे यांनी गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे व ढोल-ताशांच्या वापराचे जोरदार समर्थन केले, तर भाजपाच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी डीजेच्या वापरावर कडाडून विरोध केला. भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांना डीजे आणि लेझर किरणांचा अतिरेकी वापर टाळत आनंदाने उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. दुसरीकडे शिंदेसेनेच्या मंत्र्यांमध्येही या विषयावर एकमत नसल्याचे दिसून आले. मंत्री संजय शिरसाट यांनी लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना डीजेच्या आवाजाचा होणारा त्रास लक्षात घेऊन डीजेबंदीचे समर्थन केले. याउलट शिंदेसेनेचे दुसरे मंत्री योगेश गदम यांनी हिंदू सणांमध्ये डीजे किंवा पारंपारिक बँड बद केले जाणार नसल्याची भूमिका घेतली. भाजपा नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनीही डीजेचे समर्थन केले. हिंदू सणांमध्ये डीजेचा त्रास होत असलेल्या लोकांनी थेट पाकिस्तानात जावे असे विधान त्यांनी केले. तसेच, आधी मशिदींवरील भोंग्यांवर निर्बंध घालावेत अशी मागणी करताना राणा यांनी या आगीत आणखीनच तेल ओतण्याचे काम केले.

डीजेविरोधात महाविकास आघाडीची एकजूट

एकीकडे डीजेबंदीवरून महायुतीत मदभेद निर्माण झाले असतानाच दुसरीकडे विरोधकांच्या महाविकास आघाडीने मात्र या मुद्यावर एकजूट दाखवली. पुण्यातील नागरिक विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आणि भाजपा नेत्यांनी त्यांच्याविरोधात वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेचा सर्वप्रथम काँग्रेसने जाहीर निषेध केला. काँग्रेस कानठळ्या बसवणाऱ्या डीजेच्या पूर्णपणे विरोधात असल्याचे पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. पारंपरिक वाद्ये आवाजाच्या कायदेशीर मर्यादेत वाजवली जात असतील, तर त्याला आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा सरकारचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी डीजेच्या आवाजाची तुलना थेट भूकंपाच्या धक्क्यांशी केली.

डीजेवरून राज ठाकरेंचा सरकारला सवाल

शरद पवार यांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही सार्वजनिक उत्सवादरम्यान आवाजाच्या विहित मर्यादा आणि डेसिबल पातळीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची आठवण करून दिली, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई आणि नागपूरमध्ये जर डीजेवर निर्बंध घातले जाऊ शकतात, तर मग पुण्यात अशी कारवाई का केली जात नाही? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. या सर्व वादावर भाजपाने अद्याप आपली सावध आणि संदिग्ध भूमिका कायम ठेवली आहे. आम्ही जनभावनेचा आदर करू. डीजेबाबत जनतेची जी काही भावना असेल, त्यानुसारच आम्ही निर्णय घेऊ असे भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी स्पष्ट केले. यादरम्यान भाजपाने विरोधकांवर केवळ हिंदू सणांनाच लक्ष्य केल्याचा आरोप केला. त्यामुळे पुण्यातील डीजेबंदीच्या मुद्द्यावर अखेरीस काय तोडगा निघणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.