मध्यप्रदेशातील भाजपाचा पारंपारिक गड मानल्या जाणाऱ्या दतिया विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. राज्यात भाजपाची एकहाती सत्ता असताना काँग्रेसला मिळालेल्या या विजयाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. भाजपाचे प्रभावशाली नेते व माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यासह वर्षानुवर्षे पक्षाची संघटना भक्कमपणे सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. या पोटनिवडणुकीत भाजपाने नरोत्तम मिश्रा यांना डावलून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले आशुतोष तिवारी यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्याविरोधात काँग्रेसने ७२ वर्षीय ज्येष्ठ नेते घनश्याम सिंह यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.
भाजपाला नेमका कशाचा फटका बसला?
२०२३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नरोत्तम मिश्रा यांचे राजकीय वर्चस्व भाजपाला विजय मिळवून देण्यासाठी अपुरे पडत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. त्यामुळेच पक्षाने त्यांचे तिकीट कापून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले आशुतोष तिवारी यांच्यावर विश्वास दाखवला होता. मात्र, मिश्रा यांना उमेदवारी न देणे आणि त्यांच्या प्रभावाशिवाय ही निवडणूक लढवणे भाजपासाठी अत्यंत कठीण ठरल्याचे दिसून आले. पक्षाच्या या पराभवामागे हेच एक मुख्य आणि महत्त्वाचे कारण ठरल्याचे भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्याआधीच दतिया मतदारसंघात भाजपातील अंतर्गत वाद उफाळून आला होता. आशुतोष तिवारी यांच्या उमेदवारीची घोषणा होताच नरोत्तम मिश्रा यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आंदोलन केले होते. त्याचवेळी काही पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी आपल्या पदांचे राजीनामेही दिले. त्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद उघडकीस आला आणि प्रचार सुरू होण्यापूर्वीच भाजपा अडचणीत सापडला. भाजपासमोरील खरी अडचण सुरुवातीलाच स्पष्ट दिसू लागली होती. ज्या उमेदवाराचा प्रचार करायचा होता, त्याची उमेदवारीच मिश्रा यांच्या समर्थकांच्या उघड नाराजीच्या सावटाखाली झाकोळली गेली होती.
भाजपाचा पोटनिवडणुकीतील पराभव कशामुळे?
सोमवारी झालेल्या मतमोजणीत काँग्रेसचे घनश्याम सिंह यांनी तब्बल सहा हजार १६ मतांनी भाजपाचे उमेदवार आशुतोष तिवारी यांचा पराभव केला. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष हेमंत खंडेलवाल यांनी निकालाचे विश्लेषण करण्यात येणार असल्याचे सांगितले. “निकालाचा सखोल अभ्यास केला जाईल. त्यानुसार पक्ष पुढील रणनीती ठरवेल. तसेच पक्षशिस्त न पाळणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला. यादरम्यान उमेदवारी नाकारल्यानंतरही नरोत्तम मिश्रा यांनी अखेरीस पक्षासाठी प्रचार केला. त्यांनी आशुतोष तिवारी यांच्या समर्थनार्थ घराघरांत जाऊन मतदारांशी संपर्क साधला आणि मतमोजणी सुरू होताच भाजपाच्या विजयाचा विश्वासही व्यक्त केला. मात्र, पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक यंत्रणेवर पूर्णपणे मिश्रा यांच्या प्रभावावर अवलंबून राहण्याची किंमत भाजपाला चुकवावी लागल्याचे पक्षातील नेत्यांचे मत आहे. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, दोन दशकांपासून नरोत्तम मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे जाळे वापरणे आशुतोष तिवारी यांच्यासाठी अपरिहार्य होते. त्यामुळे ते पक्षाने बाजूला केलेल्या नेत्यापासून स्वतंत्र अशी प्रतिमा निर्माण करू शकले नाहीत. त्यांच्या मते, ज्या मतदारांना भाजपाने मिश्रा युगाच्या पुढे जावे असे वाटत होते, त्यांनी मतदानापासून दूर राहणे पसंत केले.
काँग्रेसच्या अभूतपूर्व विजयाचे श्रेय कोणाला?
मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी या पोटनिवडणकीतील विजयाचे श्रेय पक्षाचे सतना येथील आमदार आणि इतर मागासवर्गीय समाजातील उदयोन्मुख नेते सिद्धार्थ कुशवाह यांना दिले. पक्षातील अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार, संपूर्ण निवडणूक प्रचाराचे समन्वयन कुशवाह यांनी केले. त्यांनी अनेक आठवडे दतिया मतदारसंघात तळ ठोकून बूथनिहाय नियोजन केले. विशेषतः कुशवाह समाजातील मतदारांचे मतदान एकवटण्यासाठी त्यांनी प्रभावी रणनीती आखली आणि याच भागांमध्ये काँग्रेसला निर्णायक आघाडी मिळाली. या विजयामुळे सिद्धार्थ कुशवाह हे काँग्रेसमधील उदयोन्मुख नेते म्हणून पुढे आले असून, भविष्यात राज्यातील इतर भागांमध्ये ओबीसी मतदारांना एकत्र आणण्याची जबाबदारी पक्ष त्यांच्यावर सोपवू शकतो, अशी चर्चा आहे.
“मिश्रा यांच्या दादागिरीमुळे भाजपाचा पराभव”
भाजपाच्या पराभवामागे नरोत्तम मिश्रा यांच्या कार्यपद्धतीबाबतचा जनतेतील रोष हे प्रमुख कारण असल्याचा काँग्रेसचे सिद्धार्थ कुशवाह यांनी केला. दी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना ते म्हणाले की, भाजपाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे नरोत्तम मिश्रा यांची दादागिरी होती. भाजपा सरकारने प्रशासनाचा वापर करून लोकांना दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आणि जनता त्याला कंटाळली होती. कुशवाह यांनी मतदारसंघातून रोजगारासाठी इतर राज्यांत होणारे स्थलांतर आणि दतियाची धार्मिक नगरी म्हणून असलेली ओळख यांसारख्या स्थानिक प्रश्नांचाही उल्लेख केला. त्यांच्या मते, ही निवडणूक प्रामुख्याने स्थानिक समस्या आणि जनतेच्या नाराजीवर लढली गेली. दुसरीकडे- काँग्रेसचा प्रचारही अंतर्गत वादांपासून पूर्णपणे मुक्त नव्हता. पोटनिवडणुकीस कारणीभूत ठरलेले माजी आमदार राजेंद्र भारती यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा आरोप करत काँग्रेसने मतमोजणीच्या अवघ्या एक दिवस आधी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. प्रचारादरम्यान घनश्याम सिंह यांनीही राजेंद्र भारती यांच्या गटाकडून आपल्या विरोधात काम सुरू असल्याचा आरोप केला होता. मात्र, अशा प्रयत्नांचा मतदानावर मर्यादित परिणाम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
घनश्याम सिंह यांच्या विजयाची तीन प्रमुख कारणे
दतिया पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार घनश्याम सिंह यांचा विजय हा कोणत्याही मोठ्या जनलाटेचा परिणाम नव्हता. उलट, तीन महत्त्वाच्या घटकांमुळे ते भाजपासाठी अत्यंत कठीण प्रतिस्पर्धी ठरले. ७२ वर्षीय घनश्याम हे दतिया परिसरातील अत्यंत परिचित राजकीय व्यक्तिमत्त्व आहेत. यापूर्वी त्यांनी १९९३ आणि २००३ मध्ये दतिया मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढणारे आशुतोष तिवारी यांच्या तुलनेत घनश्याम सिंह यांना कोणत्याही परिचयाची गरज नव्हती. त्यांच्या अनेक दशकांपासूनच्या वैयक्तिक संपर्कामुळे त्यांना काँग्रेसच्या संघटनात्मक मर्यादेपलीकडेही पाठिंबा मिळाला. काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असतानाही घनश्याम सिंह यांना केवळ पक्षाच्या यंत्रणेवर अवलंबून राहावे लागले नाही. त्यांच्या वैयक्तिक लोकप्रियतेमुळे आणि दतियातील दीर्घकालीन सामाजिक संबंधांमुळे त्यांना मतदारांचा व्यापक पाठिंबा मिळाला. घनश्याम सिंह यांनी संपूर्ण प्रचार स्थानिक प्रश्नांभोवती केंद्रित ठेवला. राज्य सरकारविरोधी जनमत तयार करण्याऐवजी काँग्रेसने बेरोजगारी, रोजगारासाठी होणारे स्थलांतर, खतांची टंचाई, अनियमित पाऊस आणि स्थानिक पातळीवरील राजकीय वर्चस्वाविरोधातील नाराजी हे मुद्दे आक्रमकपणे मांडले. या प्रचाराचा विशेषतः ग्रामीण भागात मोठा प्रभाव दिसून आला. ग्रामीण भागात सुमारे ७८ टक्के मतदान झाले, तर दतिया शहरात हा आकडा सुमारे ६२ टक्के इतकाच राहिला. यादरम्यान भाजपाच्या पराभवावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री मोहन यादव यांनी पक्षाचा जनाधार कमी झाल्याचा दावा फेटाळून लावला. मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपाला यावेळी अधिक मते मिळाली असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. तसेच, आगामी निवडणुका आम्ही अधिक मेहनतीने लढू आणि विजय मिळवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
