पुणे : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख -जाधव यांच्या विजयाने महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दोन्ही पक्षांना पदवीधरांनी चांगलाच धडा शिकवला. अतिआत्मविश्वास असलेल्या भाजपने या निवडणुकीतही धक्कातंत्राचा अवलंब केला; पण त्यांनाच ‘धक्का’ बसल्याने चिंतनाची वेळ आली आहे. ‘प्रचंड आशावादी’ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने हक्काच्या जागेला तिलांजली दिली. मात्र, ही जागा दुसऱ्या ‘राष्ट्रवादी’ला मिळाल्याने त्यांच्यावर पश्चातापाची वेळ आली. महायुतीकडे सर्व यंत्रणा असतानाही पराभव पत्करावा लागला. मात्र, पश्चिम महाराष्ट्रात अजूनही ज्येष्ठ नेते शरद पवार या नावाची जादू असल्याचे या निकालाने सिद्ध केले आहे.
या मतदार संघात हर्षदा देशमुख-जाधव आणि भाजपच्या डॉ. स्मिता जाधव यांच्यात सरळ लढतीचा अंदाज वर्तविण्यात येत होता. त्याप्रमाणे लढत झाली. महायुतीकडे संघटनात्मक पातळीवर नियोजन असतानाही त्यांना पराभूत व्हावे लागले. ही जागा तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसची होती. गेल्या निवडणुकीत अरुण लाड हे विजयी झाले होते. यावेळी दोन्ही ‘राष्ट्रवादी’ समोरासमोर असताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने जागा वाटपाच्या तहातच भाजपला ही जागा देवून टाकली. त्यामुळे दोन्ही ‘राष्ट्रवादी’तील लढतीऐवजी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यात झाली. मात्र, पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये अद्यापही ज्येष्ठ नेते शरद पवार या नावाची जादू असल्याने या निकालाने स्पष्ट झाले आहे.
भाजपचे धक्कातंत्र निष्प्रभ?
प्रत्येक निवडणुकीत धक्कातंत्र वापरून निवडणूक जिंकणाऱ्या भाजपचे धक्कातंत्र पुणे पदवीधर मतदार संघात निष्प्रभ ठरले. ‘राष्ट्रवादी’कडील ही जागा भाजपने स्वत:कडे घेतली. उमेदवार निवडीपासून ते प्रचाराच्या काळात भाजपमध्ये अतिआत्मविश्वास असल्याचे दिसून आले. भाजपकडून माजी आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड हे इच्छुक होते. अरुण लाड हे ‘राष्ट्रवादी’त असतानाही शरद लाड हे भाजपमध्ये गेले. त्यांची अनेक दिवसांपासून तयारी सुरू होती. मात्र, भाजपने शरद लाड यांना डावलून ऐनवेळी डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली. लाड यांचे राजकीय पुनर्वसनही केले. त्यांना भाजपने प्रदेश सचिव पद दिले. मात्र, लाड यांना उमेदवारी डावलल्याची नाराजी मतदारांनी दाखवून दिली. पाच जिल्ह्यांपैकी सर्वांत कमी मतदान हे लाड यांच्या सांगली जिल्ह्यात झाले. त्यामुळे डॉ. स्मिता जाधव यांना विजयासाठी अपेक्षित कोटा साध्य करण्यात अडथळा आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून निवडणुकीची तयारी करण्यात येत असताना स्थानिक पातळीवरील नेते, पदाधिकारी हे निर्धास्त राहिले. त्यामुळे पुण्यातील १०० नगरसेवकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावाव्या लागल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकाराची दखल घ्यावी लागली. त्यांनी भविष्यात पदे देताना ‘रिपोर्ट कार्ड’ पाहिले जाईल, असा इशाराही दिला. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान झाले. मात्र, निर्णयक आघाडीसाठी हे मतदान कमी पडल्याचे निकालावरून दिसुन आले आहे.
‘राष्ट्रवादी’ तटस्थ, शिवसेना विरोधात, भाजप एकाकी?
हक्काची जागा भाजपकडे गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष हा संपूर्ण निवडणुकीच्या काळात तटस्थ भूमिकेत असल्यासारखा होता. भाजपकडून प्रचाराची राळ उठविण्यात आली. मात्र, ‘राष्ट्रवादी’ फक्त सोबत होती. महायुतीतील शिवसेना (शिंदे) पक्षाविरूद्ध पुणे शिक्षक मतदार संघात मैत्रीपूर्ण लढत असल्याने शिवसेनेची भाजपला साथ मिळाली नाही. त्यामुळे भाजप एकाकी पडल्यासारखे चित्र निर्माण झाले. त्यामुळे या लढतीत पहिल्यापासून हर्षदा देशमुख-जाधव यांनी आघाडी घेतली. विजयासाठी आवश्यक असलेला कोटा पूर्ण होईपर्यंत ही आघाडी कायम राहिली. त्यामुळे पाचही जिल्ह्यांमध्ये काँग्रेसच्या साथीने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा करिष्मा राहिल्याचे या निकालाने स्पष्ट झाले.
