BJP picked Manjusha Nagpure as Mayor पुणे महापालिकेच्या महापौरपदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर हा सस्पेन्स संपला आहे आणि सलग तीनदा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या मंजुषा नागपुरे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीने महापौरपदासाठी वर्षा तपकीर, मानसी देशपांडे व मंजुषा नागपुरे यांच्या नावांची शिफारस केली होती; मात्र मंजुषा नागपुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. कोण आहेत मंजुषा नागपुरे? भाजपाने पुण्याच्या महापौरपदी त्यांचीच निवड का केली? जाणून घेऊयात…

पुण्याच्या नव्या महापौर मंजुषा नागपुरे

पुण्याच्या पुढील महापौरपदासाठी भारतीय जनता पार्टीने ४६ वर्षीय मंजुषा नागपुरे यांची निवड केली आहे. बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या मंजुषा नागपुरे या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील आहेत. या पदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या आणि चार वेळा नगरसेविका राहिलेल्या वर्षा तापकीर आणि तीन वेळा नगरसेविका राहिलेल्या मानसी देशपांडे यांच्याऐवजी नागपुरे यांच्या नावाला पसंती देण्यात आली.

तिसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या मंजुषा नागपुरे यांची नुकत्याच झालेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवड झाली आहे. १५ जानेवारी रोजी झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत सिंहगड रोडवरील सनसिटी-माणिकबाग प्रभाग क्रमांक ३ मधून त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

मुख्य म्हणजे नागपुरे ज्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात, तो भाग बारामती लोकसभा मतदारसंघात येतो आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे करतात. भाजपा हा मतदारसंघ जिंकण्यासाठी दीर्घकाळापासून प्रयत्नशील आहे. नागपुरे २०१२ मध्ये सिंहगड रोडवरील आनंदनगर भागातून पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्या सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत.

कोण आहेत मंजुषा नागपुरे?

मंजुषा नागपुरे यांचा जन्म १९७९ मध्ये झाला. नागपुरे या पुणे महानगरपालिकेतील सर्वांत उच्चशिक्षित नगरसेविकांपैकी एक आहेत. त्यांचे पती दीपक नागपुरे हे कट्टर उजव्या विचारसरणीचे नेते व भाजपाचे पदाधिकारी आहेत. त्यांच्या माध्यमातूनच महिला राखीव जागेवरून त्यांनी निवडणूक राजकारणात प्रवेश केला. या दाम्पत्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. व्यावसायिक मालमत्ता भाड्याने देऊन, त्यांना यातून मोठे उत्पन्न मिळते. नागपुरे यांनी ३.२२ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.

त्यांनी १९९९ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (एसपीपीयू) पदवी प्राप्त केली आणि २०२१ मध्ये आयसीएफएआय (आयसीएफएआय) विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. त्या एका आयटी कंपनीत कार्यरत होत्या; मात्र कुटुंबाच्या आग्रहाखातर त्यांनी नोकरी सोडून महापालिका निवडणूक लढवली. त्यांना एक १७ व एक ५ वर्षांची, अशी दोन मुले आहेत.

निवडणुकीतील आश्वासने

महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नागपुरे यांनी मतदारांना आश्वासन दिले होते की, त्या शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतील. त्या सिग्नल यंत्रणेत सुधारणा, रस्ते रुंदीकरण व पीएमपीएमएल बस सेवा अधिक सक्षम करण्यावर भर देतील. सिंहगड रस्त्यावरील पूरप्रवण क्षेत्राचे त्या प्रतिनिधित्व करत आहेत. मुठा नदीकाठी संरक्षक भिंत बांधणे आणि रहिवाशांना पूर्वसूचना देण्यासाठी ‘फ्लड अलर्ट सिस्टीम’ (पूर इशारा प्रणाली) स्थापित करण्याची त्यांची योजना आहे.

महापालिकेने हाती घेतलेल्या नदीसुधार आणि सुशोभीकरण प्रकल्पाला गती देण्याचा त्यांचा मानस आहे. सार्वजनिक आरोग्यासाठी शहरात उघड्यावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी त्या ‘स्वच्छ प्रभाग, सुंदर प्रभाग’ ही संकल्पना राबवू इच्छितात. तसेच महापालिकेच्या रुग्णालयांचा दर्जा उंचावणे आणि महापालिका शाळांमध्ये डिजिटल शिक्षण सुरू करण्यासाठी त्या काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पुण्यातील महापौरपदाची चर्चा

महापालिकेत भाजपाचे ११९ नगरसेवक विजयी झाले आहेत. भाजपाची दुसऱ्यांदा महापालिकेत सत्ता आली आहे आणि यंदाचे महापौरपद खुला महिला यासाठी राखीव झाले आहे. भाजपाकडून महापौर पदासाठी नागपुरे यांच्यासह वर्षा तापकीर, मानसी देशपांडे यांच्या नावांचीही चर्चा होती. भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने मंगळवारी नागपुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर नागपुरे यांनी महापौर पदासाठीचा अर्ज नगर सचिव योगिता भोसले यांच्याकडे दाखल केला.

९ फेब्रुवारीला महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे. या दिवशी मतदान प्रक्रिया सुरू करतानाच पीठासीन अधिकारी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी देतात. या कालावधीत अर्ज मागे न घेतल्यास निवडणूक प्रक्रिया राबवून सभागृहात मतदान होते. महापालिकेवर भाजपाचे ११९ नगसेवक निवडून आले असल्याने भाजपाकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे मंजुषा नागपुरे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.