गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला मोठे यश मिळाले. राज्यातील १५ महानगरपालिकांसह बहुतांश जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांवर भाजपाने एकहाती वर्चस्व राखले. या विजयाची सर्वत्र चर्चा होत असतानाच वलसाड जिल्ह्यात मात्र एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. काँग्रेसच्या फोडाफोडीच्या धास्तीने भाजपाने येथील आपल्या विजयी उमेदवारांना थेट गांधीनगर येथील हॉटेलात ठेवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातमध्येच भाजपाने फोडाफोडीची धास्ती घेतल्याने ही घडामोड सध्या चर्चेच्या विषय ठरत आहे, त्याविषयी…

१५ महानगरपालिकांवर फुलले कमळ

गुजरातमध्ये गेल्या महिन्याच्या अखेरीस १५ महानगरपालिका, ८४ नगरपालिका, ३४ जिल्हा परिषदा आणि २६० पंचायत समित्यांसाठी मतदान घेण्यात आले. राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार असल्याने या निवडणुकांना विशेष महत्व प्राप्त झाले होते. त्यामुळे २६ एप्रिल रोजी जाहीर होणाऱ्या या निवडणुकांच्या निकालांकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागून राहिले होते. यादरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने ७० टक्के जागा जिंकत, राज्यातील आपले स्थान आणखीनच भक्कम केले. महत्त्वाची बाब म्हणजे सर्वच्या सर्व महापालिकांवर भाजपाने एकहाती वर्चस्व मिळवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपाला पराभूत करणे विरोधकांना एकजूट दाखविल्याशिवाय कठीण आहे, असाच संदेश या निवडणुकांनी दिला आहे.

कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या?

अहमदाबाद महानगरपालिकेतील १९२ पैकी तब्बल १५८ जागा जिंकून भाजपाने या मोठ्या शहरात आपले वर्चस्व आणखीनच मजबूत केले. तर, सुरत महानगरपालिकेतही भाजपाने १२७ पैकी ११५ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला. दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला (आप) केवळ चार जागा जिंकता आल्या; तर काँग्रेसने एक जागा जिंकून पाच वर्षांनंतर आपले खाते उघडले. जवळपास १,०९० जागा असलेल्या ३४ जिल्हा परिषदांमध्ये भाजपाने ५६८ जागा जिंकल्या; तर काँग्रेसला ७७ आणि इतरांना ३० जागांवरच समाधान मानावे लागले. त्याशिवाय ५,२३४ जागा असलेल्या २६० पंचायत समित्यांमध्ये भाजपाने २,३९७, काँग्रेसने ५९१ आणि इतरांनी ३२९ जागा जिंकल्या. यादरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपाने वर्चस्व राखले असले तरी वलसाड जिल्ह्यात मात्र एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. धरमपूर पंचायत समितीत घोडेबाजार होण्याच्या भीतीने भाजपाने आपल्या विजयी सदस्यांना थेट गांधीनगर येथील हॉटेलात ठेवले आहे.

काँग्रेसच्या फोडाफोडीची भाजपाला धास्ती

धरमपूर पंचायत समितीत एकूण २४ जागा असून, त्यापैकी भाजपाने १३ आणि काँग्रेसने १० जागांवर विजय मिळवला आहे; तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. प्राप्त माहितीनुसार, निवडून आलेल्या एकमेव अपक्ष उमेदवाराने काँग्रेसला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ ११ इतके झाले आहे. यादरम्यान काँग्रेसकडून फोडाफोडीचे राजकारण होऊ नये म्हणून भाजपाने आपल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांना गांधीनगर येथील एका हॉटेलात ठेवले आहे. धरमपूरचे भाजपाचे आमदार अरविंद पटेल यांनी त्याबाबत विशेष खबरदारी घेतली आहे. एकीकडे भाजपाने गुजरातमध्ये १५ पैकी १५ महानगरपालिका जिंकून मोठा विजय मिळवला असताना, धरमपूरमधील ही सावधगिरी राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांकडे लक्ष वेधून घेत आहे.

भाजपाचे आमदार नेमके काय म्हणाले?

आमदार पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही भाजपाच्या सर्व १३ सदस्यांना गांधीनगर येथील हॉटेलात ठेवले आहे. त्यामध्ये सहा महिला सदस्य असून, त्यांच्या पतीसह त्या हॉटेलात थांबून आहेत. या सदस्यांच्या कुटुंबीयांना आम्ही ते सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे. केवळ अत्यंत निकडीच्या कामासाठीच त्यांना बाहेर जाण्याची परवानगी दिली जात आहे. सभापतींचे नाव जाहीर होईपर्यंत हे सर्व सदस्य गांधीनगरमध्येच राहतील. त्यानंतरच त्यांना पुन्हा धरमपूरला नेले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यादरम्यान धरमपूर पंचायत समितीच्या सभापती पदासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसच्या वतीनेही सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जात असून, भाजपाचे काही सदस्य आपल्या संपर्कात असल्याचा दावा पक्षातील नेत्यांनी केला आहे. सभापती पदासाठी काँग्रेसकडून सध्या तीन नावे चर्चेत आहेत. विशेष म्हणजे, सुरुवातीची अडीच वर्षे हे पद महिला उमेदवारासाठी राखीव असल्याने चुरस अधिक वाढली आहे. त्यामुळे या पंचायत समितीवर भाजपा सत्ता स्थापन करणार की काँग्रेस फोडाफोडी करून आपल्या पक्षाचा सभापती बसवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक

राज्यात डिसेंबर २०२७ मध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार आहे. २०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने १८२ पैकी १५६ जागा जिंकत मोठा विक्रम केला होता. यापूर्वी काँग्रेसचे माधवसिंह सोलंकी यांनी १९८५ मध्ये १४९ जागा जिंकल्या होत्या. क्षत्रिय, दलित, आदिवासी व मुस्लीम (खाम) हे समीकरण जुळवीत त्यांनी हे यश मिळवले होते. मात्र, जसा हिंदुत्वाचा प्रभाव वाढला तशी गुजरातमध्ये काँग्रेसची ताकद कमी झाली. गेल्या विधानसभेला तर त्यांना केवळ १७ जागा जिंकता आल्या होत्या. निकालानंतही काँग्रेसमधील काही आमदारांनी राजीनामे देऊन भाजपाची कास धरली. आता गुजरात विधानसभेत काँग्रेसकडे केवळ १२ आमदार आहेत. विरोधकांसाठी मुळात गुजरातची निवडणूक हा अवघड पेपर आहे. त्यातच मतांची विभागणी झाली, तर भाजपाचे काम आणखी सोपे होईल. आम आदमी पक्षाने काही वर्षांपासून या राज्यावर लक्ष्य केंद्रित केले आहे. मात्र, शहरी-निमशहरी भागात त्यांना यावेळी अपेक्षित यश मिळाले नाही. आता विधानसभेला त्यांनी काँग्रेसशी जुळवून घेतले, तर राज्यात काही प्रमाणात लढत होऊ शकते. तरीही स्थानिक निवडणुकांचा निकाल पाहता, विरोधकांना भाजपाचा हा गड भेदणे कठीण दिसत आहे.