BJP Shiv Sena rivalry महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकांसाठी राबविल्या जाणाऱ्या प्रचार मोहिमेने सत्ताधारी महायुतीचे भागीदार भाजपा आणि शिवसेना यांच्यातील तीव्र राजकीय वैर चव्हाट्यावर आणले आहे. १४ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये या दोन्ही पक्षांमध्ये युती असूनही, भाजपा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. भाजपा अन् शिंदे सेनेतील वाद विकोपाला का गेला? नक्की काय काय घडलं? जाणून घेऊयात…

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नक्की काय घडतंय?

नुकत्याच २० डिसेंबर रोजी पार पडलेल्या अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीत, स्थानिक भाजपा युनिटने शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी चक्क काँग्रेसशी हातमिळवणी केली. अंबरनाथ ठाणे जिल्ह्यात येत असून, हा उपमुख्यमंत्री शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपाने सुरुवातीला ‘अंबरनाथ विकास आघाडी’ (एव्हीए) अंतर्गत काँग्रेसशी हातमिळवणी केली होती. त्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांचाही समावेश होता. ६० सदस्यीय सभागृहात ३२ नगरसेवकांसह बहुमत मिळविणे हा यामागचा उद्देश होता. मात्र, कट्टर विरोधकाशी हातमिळवणी केल्याबद्दल टीकेची झोड उठल्यानंतर भाजपाने काँग्रेसबरोबरची ही युती तोडली.

काँग्रेसने या युतीमुळे आपल्या १२ नगरसेवकांना निलंबित केले. मात्र, अवघ्या एका दिवसात भाजपाने या नगरसेवकांसाठी आपली दारे उघडली, जेणेकरून अंबरनाथ नगर परिषदेवर आपली पकड कायम ठेवता येईल. भाजपासाठी नामुष्कीची बाब म्हणजे २७ नगरसेवक असलेल्या शिवसेनेने शुक्रवारी राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवून बहुमताच्या आकड्यापर्यंत मजल मारली. ३१ हा बहुमताचा आकडा आहे. त्यामुळे अंबरनाथ विकास आघाडीचे संख्याबळ २८ वर घसरले. भाजपाच्या या खेळीमुळे दुखावलेले शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, “हा युतीधर्माचा विश्वासघात आहे.” आपल्या महायुतीतील भागीदाराला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपाने विरोधकांशी संधान साधणे हे अत्यंत अनैतिक असल्याचे त्यांनी म्हटले.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या काँग्रेसबरोबरच्या युतीवर टीका केली. “अंबरनाथमध्ये काँग्रेसबरोबर झालेली युती अमान्य होती. पक्षाचं स्थानिक युनिट ही युती तोडेल याची आम्ही खात्री केली,” असे ते म्हणाले. मात्र, निलंबित काँग्रेस नगरसेवकांच्या भाजपा प्रवेशावर फडणवीस यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. भाजपा नेते व राज्यमंत्री आशीष शेलार यांनी निलंबित काँग्रेस नगरसेवकांना पक्षात घेण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. ते म्हणाले, “सुरुवातीला भाजपा-काँग्रेस युती चुकीची होती. त्याचे कोणीही समर्थन करीत नाही. पण जेव्हा निलंबित नगरसेवकांनी भाजपाला पसंती दिली, तेव्हा त्यावर प्रश्न कसा काय उपस्थित केला जाऊ शकतो?”

भाजपा नेत्याचे शिंदे सेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचारादरम्यान मित्रपक्षांमधील संघर्षाचे आणखी एक कारण म्हणजे भाजपा नेते व राज्यमंत्री गणेश नाईक यांनी शिंदे आणि त्यांच्या पक्षावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप. नवी मुंबईचे भाजपा प्रभारी असलेल्या नाईक यांनी दोन्ही मित्रपक्षांमध्ये कोणतीही युती होणार नाही, हे स्पष्ट केले. “कंत्राटदारांना पैसे मिळवून देण्यासाठी त्यांनी (शिंदे शिवसेना) एफएसआयचा जो गैरवापर केला आहे, त्यामुळे नवी मुंबईतील नागरिकांचे जगणे कठीण होईल. २०२९ मध्ये त्यांची जागा तुरुंगात असेल. कारण- जनता त्यांची ही लूट माफ करणार नाही,” असा आरोप नाईक यांनी केला.

मुंबईतील स्थिती काय?

मुंबईमध्ये दोन्ही पक्षांची युती झाली असली तरी अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राजकीय वर्चस्वाची चढाओढ पाहायला मिळत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) प्रभाग क्रमांक १७३ मध्ये शिवसेनेने उमेदवार देणे अपेक्षित होते; परंतु भाजपानेही येथे आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी ‘५० खोके, एकदम ओके’ अशा घोषणा दिल्या. ही घोषणा मुळात विरोधकांनी २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाणाऱ्या ४० आमदारांवर ५० कोटींच्या लाचेचा आरोप करण्यासाठी तयार केली होती.

ज्या १४ महापालिकांमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि राज ठाकरेंची मनसे यांसारख्या विरोधी पक्षांचे वर्चस्व आहे, तिथे भाजपा आणि शिवसेनेने युती केली आहे. परंतु, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे व पिंपरी-चिंचवड यांसारख्या १५ महानगरपालिकांमध्ये विरोधक तुलनेने कमकुवत मानले जातात, तिथे भाजपा आणि शिवसेनेने आपला राजकीय विस्तार करण्यासाठी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे.

या घडामोडींवर बोलताना फडणवीस म्हणाले, “मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि इतर अनेक संस्थांमध्ये आमची शिवसेनेबरोबर युती आहे. त्यावरून आम्ही आमच्या मित्रपक्षाचा आदर करतो हे सिद्ध होते.” भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक घटकांवर अवलंबून असतात. तरीही जिथे आम्ही स्वतंत्रपणे लढत आहोत, तिथे संघर्ष होणार नाही याची आम्ही काळजी घेतो.”

भाजपाची रणनीती काय?

काही भाजपा नेत्यांच्या मते, “आमच्या केंद्र आणि राज्यातील नेतृत्वाने मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या जागावाटपाच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे जर भाजपाने अंबरनाथमध्ये वरचष्मा मिळवण्याचा प्रयत्न केला, तर मित्रपक्षाने नाराज होऊ नये.” स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास निधी आणि विकासकामांवरील नियंत्रण हादेखील भाजपाच्या रणनीतीचा एक भाग आहे, ज्याचा प्रत्यय अंबरनाथमध्ये येत आहे. भाजपामधील एका सूत्राने सांगितले, “प्राचीन शिव मंदिरासह अंबरनाथच्या विकासासाठी शेकडो कोटींच्या निधीचे आश्वासन देण्यात आले आहे.”

भाजपाचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रभारी व राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले, “स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास झाल्यास महाराष्ट्राचा कायापालट होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बदल घडवून आणायचा आहे.” बावनकुळे पुढे म्हणाले, भाजपा मित्रपक्षांना डावलत नाही आणि आम्ही महायुती म्हणून एकत्र काम करत राहू.

विरोधकांचे खडेबोल

भाजप आणि शिवसेना यांच्यातील या वादावर विरोधकांनीही सडकून टीका केली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी हे तिन्ही सत्ताधारी पक्ष राज्यात एकत्र सत्तेत आहेत आणि निवडणुकांमध्ये एकमेकांविरुद्ध लढत आहेत. असे गलिच्छ राजकारण महाराष्ट्राने कधीही पाहिले नव्हते.” शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनीही असेच मत व्यक्त केले. “भाजपाचा खरा चेहरा काय आहे, हे शिंदेंना लवकरच समजेल,” अशी टीका त्यांनी केली.