Why Congress is wary of Raj Thackeray in Maharashtra : राज्यात आगामी काळात मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेला महाविकास आघाडीत सामावून घेण्यासाठी ठाकरे गट प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसने मात्र त्याबाबत सावध भूमिका घेतली असून, मनसेबरोबर हातमिळवणी करण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे. विशेष बाब म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मनसेला आघाडीत घेण्यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे. यादरम्यान राज ठाकरे यांच्याशी दुरावा ठेवण्याच्या काँग्रेसच्या कथित प्रयत्नाला बिहारच्या निवडणुकीशी जोडले जात आहे.
दोन महिन्यांपूर्वी राज्यात मराठी विरुद्ध हिंदी असा भाषिक वाद उफाळून आला होता. त्यावेळी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने मुंबईतील काही उत्तर भारतीयांना लक्ष्य केले होते. त्यामुळे मनसेबरोबर हातमिळवणी केल्यास बिहारमधील पक्षाच्या मताधिक्यावर परिमाण होण्याची भीती काँग्रेसला सतावत आहे. दरम्यान, मनसेला महाविकास आघाडीत सामील करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे का, असा प्रश्न माध्यमांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांना विचारला. त्यावर उत्तर देताना अशा कोणत्याही प्रस्तावावर किंवा विषयावर चर्चा झाली नसल्याचे चेन्निथला यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दी इंडियन एक्स् प्रेसला सांगितले की, मनसेला महाविकास आघाडीत सामावून घेण्याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून घेतला जाईल. राज ठाकरे आणि त्यांचे चुलत बंधू उद्धव ठाकरे या दोघांनाही काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी त्या संदर्भात चर्चा करावी लागेल. सध्या आम्ही काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांना आघाडीबाबतचा निर्णय घेण्यास सांगितले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाने कुणाबरोबर युती करावी किंवा नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडेच सोपवण्यात आला आहे.

जवळपास दोन दशकांच्या राजकीय दुराव्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचे दिसून येत आहे. मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेतील युती जवळपास निश्चित मानली जात आहे. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचा मुंबईतील २२७ पैकी ७० प्रभागांमध्ये प्रभाव असल्याचे ठाकरे बंधूंना महापालिका निवडणुकीत मोठे यश मिळू शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी बांधला आहे. गेल्या आठवड्यात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी असा दावा केला होता की, काँग्रेसने निवडणूकपूर्व आघाडीत असाव अशी राज ठाकरे यांची इच्छा आहे. मात्र, राऊत यांच्या या वक्तव्यापासून मनसेच्या नेत्यांनी स्वतःला दूर ठेवले होते.

या वर्षाच्या सुरुवातीला मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई आणि लगतच्या परिसरातील अमराठी भाषकांवर कथित हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. मराठीत बोलण्यास जो विरोध करील, त्याच्या कानफटात बसेल, असे विधान राज ठाकरे यांनी केले होते. त्याआधी महायुती सरकारने राज्यात लागू केलेल्या त्रिभाषा सूत्राला राज आणि उद्धव यांनी संयुक्तपणे विरोध केला होता. राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये हिंदीला तिसरी अनिवार्य भाषा म्हणून लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात दोघेही एकत्रित आले होते. या संयुक्त मोहिमेनंतर सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागला होता.

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेकदा परप्रांतीयांसह मुस्लिमांविरोधात उघडपणे भूमिका घेतलेली आहे. पुढील महिन्यात बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्याने मनसेबरोबर युती केल्यास हे दोन्ही मतदार पक्षापासून दुरावले जाऊ शकतात, अशी भीती काँग्रेसला वाटत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याच्या प्रस्तावावर विचार करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. गेल्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. कोणत्याही परिस्थितीत सदोष मतदार याद्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, अशी एकमुखी मागणी त्यांनी केली होती.

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हेदेखील निवडणूक आयुक्तांच्या भेटीला गेले होते. मनसेच्या महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल त्यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता, “हा विषय फक्त मतदार याद्यांपुरता मर्यादित आहे. स्थानिक निवडणुकांसाठी मनसेला आघाडीत घेण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही”, असे थोरात यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात मनसेच्या महाविकास आघाडीतील समावेशाबाबत भाष्य केले. राज ठाकरे यांचा पक्ष आघाडीत सामील होत असेल, तर त्यात चुकीचे काय आहे, असा प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला. या विषयावर अंतिम निर्णय महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते परस्पर चर्चा करून घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
