Congress Muslim leaders unrest बिहार विधानसभा निवडणुकीतील असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील एमआयएमची (एआयएमआयएम) चांगली कामगिरी आणि या महिन्यात महाराष्ट्रात झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषतः पक्षातील काही मुस्लीम नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांवर समुदायाशी संबंधित मुद्द्यांवर मौन बाळगल्याचा आरोप केला आहे. गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या एका माजी आणि दोन ज्येष्ठ नेत्यांनी हा मुद्दा उपस्थित केला, ज्यावर काँग्रेसचे लोकसभेतील प्रतोद माणिकम टागोर यांनी त्यांना ‘जयचंद (गद्दार)’ असे संबोधले. बिहार विधानसभा आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीनंतर ओवैसींच्या एमआयएमचा वाढता प्रभाव पाहून काँग्रेसमधील अस्वस्थता अधिक वाढली आहे. काँग्रेसमधील मुस्लीम नेत्यांच्या नाराजीचे कारण काय? त्यामुळे पक्षाच्या अडचणी वाढतील का? समजून घेऊयात…

मुस्लीम नेते अस्वस्थ का?

काँग्रेसने जर मुस्लीम समुदायाचे प्रश्न मांडले नाहीत, तर एमआयएमला याचा फायदा होईल अशी भीती काँग्रेसच्या मुस्लीम नेत्यांनी व्यक्त केली आहे. २०२५ मध्ये पक्ष सोडलेले माजी केंद्रीय मंत्री शकील अहमद (तीन वेळा आमदार व दोन वेळा खासदार) यांनी गेल्या आठवड्यात एक नवा वाद ओढवून घेतला. त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी असुरक्षित व घाबरलेले असल्याचे म्हटले आणि काँग्रेस आपल्या मुस्लीम नेत्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे.

बिहारचे रहिवासी असलेल्या अहमद यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, जरी ते ओवैसींच्या राजकारणाशी सहमत नसले तरी अल्पसंख्याक समुदायाच्या मुद्द्यांवर भूमिका घेण्यास आपला पक्ष कचरत असल्याचे त्यांना मान्य असल्याचे त्यांनी म्हटले. ते म्हणाले, “मला वाटते समुदायामध्ये ओवैसींच्या राजकारणाला पसंती देणारे लोक आहेत. मी नेहमीच असे मानतो की, काँग्रेसने धर्मनिरपेक्ष भूमिका घेतली पाहिजे आणि मुस्लीम प्रश्नांवर बोलण्यास घाबरू नये. नेत्यांचा एक गट असा आहे की, ज्याने काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांना पटवून दिले आहे की, मुस्लीम प्रश्नांवर बोलल्याने हिंदू समुदायाची मते मिळवण्यात अडथळे येतील.”

बिहारमधील निकालांनी चिंतेत वाढ

गेल्या वर्षी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत, मुस्लीमबहुल सीमांचल भागात एनडीएने २४ पैकी १४ जागा जिंकल्या. त्यात भाजपाला सात, नितीश कुमार यांच्या जेडीयूला पाच आणि चिराग पासवान यांच्या एलजेपीला (रामविलास) दोन जागा मिळाल्या. विरोधी महाआघाडीला केवळ पाच जागा मिळाल्या, त्यात काँग्रेसला चार आणि आरजेडीला एक जागा मिळाली. दुसरीकडे, एमआयएमने सीमांचलमध्ये पाच जागा जिंकून २०२० मधील आपली कामगिरी कायम ठेवली.

या निकालानंतर, बिहार काँग्रेसच्या नेतृत्वाने आपापसात चर्चा केली आणि पक्षश्रेष्ठींना कळवले की, पक्षाचे वरिष्ठ नेते मुस्लीम समुदायाच्या प्रश्नांपासून लांब राहत आहेत. निवडणुकीच्या काळात सीपीआय (एमएल) लिबरेशनचे सरचिटणीस दीपांकर भट्टाचार्य यांनी एका बैठकीत सुचवले होते की, महाआघाडीने शरजील इमाम, उमर खालिद आणि इतरांना जामीन नाकारल्याच्या मुद्द्यावर बोलावे; परंतु काँग्रेसने तसे केले नाही.

एआयसीसीच्या एका मुस्लीम नेत्याने सांगितले, “जर तुम्ही राहुल गांधींची भाषणे ऐकली, तर तुमच्या लक्षात येईल की, ते त्यांच्या भाषणात कधीही ‘मुस्लीम’ हा शब्द वापरत नाहीत. दुसरीकडे ते अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) समुदायांबद्दल सातत्याने बोलत असतात.” गेल्या मंगळवारी महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी एमआयएमला भाजपाची ‘बी टीम’ संबोधले. काँग्रेस मुस्लीम समाजाच्या पाठीशी ठामपणे उभी न राहिल्याने स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना यश मिळाले, असेही ते म्हणाले.

माजी राज्यसभा खासदार असलेले दलवाई म्हणाले, “ही काँग्रेसची चूक आहे. पक्ष मुस्लिमांकडे दुर्लक्ष करत आहे आणि म्हणूनच मुस्लिमही काँग्रेसकडे दुर्लक्ष करत आहेत.” ते म्हणाले की, मुंबईत एमआयएमने जिंकलेल्या आठ जागा काँग्रेसला मिळू शकल्या असत्या; परंतु २२७ सदस्यांच्या बीएमसीमध्ये काँग्रेसला केवळ २४ जागांवर समाधान मानावे लागले.

काँग्रेसवर मुस्लीम समुदाय नाराज?

माजी राज्यसभा खासदार राशीद अल्वी यांनी अनेक मुस्लीम काँग्रेस नेत्यांच्या बाहेर पडण्यावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, जर असेच दुर्लक्ष होत राहिले, तर ओवैसींसारखे नेते अधिक प्रबळ होतील. अल्वी यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “मुस्लिम नेते सत्तेचे भुकेले नाहीत. तसेच, भाजपामध्ये त्यांच्यासाठी जागा नाही. त्यामुळे ते तिथे जाऊ शकत नाहीत. मग ते काँग्रेस का सोडत आहेत? याचे कारण म्हणजे पक्षात मुस्लीम नेत्यांसाठी असलेल्या जागा कमी होत आहेत. राहुल गांधींच्या बाबतीत सांगायचे तर, ते देशातील एकमेव असे नेते आहेत, ज्यांना जनमानसात मोठी पसंती आहे आणि ते भाजपाला थेट भिडत आहेत.”

अल्वी पुढे म्हणाले की, काँग्रेस मुस्लीम समुदायातून पहिल्या व दुसऱ्या फळीतील नेतृत्व तयार करण्यात अपयशी ठरली आहे. “एकेकाळी काँग्रेसमध्ये या समुदायातील अनेक दिग्गज नेते असायचे. गुलाम नबी आझाद व नसीमउद्दीन सिद्दिकी यांच्यासारख्या नेत्यांनी पक्ष का सोडला? मला वाटते काँग्रेस त्यांना हवी तशी जागा देण्यात अपयशी ठरली,” असा आरोप त्यांनी केला.

उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या एका मुस्लीम नेत्याने सांगितले की, समुदायाला लक्ष्य केले जात असतानाही पक्षाने आवाज उठवणे बंद केले आहे. “नुकत्याच घडलेल्या काही घटना पाहिल्या तर ते स्पष्ट होते. जर वाराणसीमध्ये मंदिरे पाडली गेली, तर संपूर्ण काँग्रेसची यंत्रणा एका सूरात बोलते. पण जर एखाद्याची मॉब लिंचिंग (जमावाकडून हत्या) झाली, किंवा खासगी जागेत नमाज पठण केल्याबद्दल एखाद्या गटाला अटक झाली किंवा दिल्लीत मशीद पाडली गेली, तर काँग्रेस गप्प बसते,” असा आरोप त्यांनी केला.

ते म्हणाले, “मुस्लिम समुदाय हे सर्व पाहतो आणि नंतर ओवैसींना घटनात्मक हक्कांबद्दल बोलताना पाहतो. मग समुदायाला असे वाटते की, काँग्रेस तर केंद्र आणि बहुतांश राज्यांत सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत नाही, मग त्यांना डोळे झाकून मतदान का करावे?” अल्वी, अहमद व दलवाई यांच्यासारखे नेते टीका करत असले तरी पक्षातील काहींना वाटते की, काँग्रेस मुस्लिमांसाठी पुरेसे काम करत आहे. टीका करणारे नेते स्वतःच्या स्वार्थासाठी बोलत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रातील एका एआयसीसीच्या मुस्लीम नेत्याने सांगितले, “पक्ष ‘मुस्लिम पक्ष’ म्हणून ओळखला जाणे परवडणारे नाही. कारण- हेच भाजपाला हवे आहे. पक्षाचे मौन हे धोरणात्मक आहे आणि त्याचा पुढे मुस्लीम समुदायालाच फायदा होईल. केवळ मुस्लीम समुदाय कोणत्याही पक्षाचा विजय सुनिश्चित करू शकत नाही. मग काँग्रेसने एकाच समुदायावर लक्ष केंद्रित करून हिंदू समुदायाला का दुखवावे?”