Congress Defeat in Bihar Election 2025 : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जोरदार मुसंडी मारत बहुमताचा आकडा गाठला. दुसरीकडे- तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला पुन्हा एकदा पराभवाचा फटका बसला. बिहारमध्ये यंदाही सत्ताधारी एनडीएलाच स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा अंदाज बहुतेक एग्झिट पोलनी वर्तवला होता. शुक्रवारी मतमोजणीला सुरुवात होताच भाजपासह त्यांच्या मित्रपक्षांनी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले. निकालांचे सुरुवातीचे कल समोर येताच काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. या निकालांवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची छाप स्पष्टपणे दिसत असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी केली. त्यामुळे एकेकाळचा हा बलाढ्य राजकीय पक्ष नेमका कोणत्या दिशेने जातोय असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याविषयीचा हा आढावा…

काँग्रेसची कामगिरी खूपच खराब

पवन खेरा यांच्या या वक्तव्याने काँग्रेस पक्ष अद्यापही वास्तव स्वीकारण्याच्या भूमिकेत नसल्याचे दिसून येत आहे. खरेतर बिहारच्या निवडणुकीआधी काँग्रेसची कामगिरी खूपच खराब होती. राज्यात पक्षाकडे संघटनात्मक संरचनेसह जनाधाराचा स्पष्टपणे अभाव दिसून येत होता. त्यातच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वानेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सातत्याने निराशा केल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. या निकालांनी राज्यातील काँग्रेसच्या खराब कामगिरीवर आणखीच प्रकाश टाकला आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने महाआघाडीचा भाग म्हणून ७० जागांवर उमेदवार दिले होते. त्यापैकी पक्षाला केवळ १९ जागा जागांवरच विजय मिळवला होता. या निवडणुकीत काँग्रेसला केवळ ९.६ टक्के मते मिळाली होती. त्यावेळी पक्षाने केलेल्या खराब कामगिरीचा महाआघाडीला फटका बसल्याचा आरोप झाला.

६१ जागांवर दिले होते उमेदवार

यंदाच्या निवडणुकीत तर काँग्रेसची परिस्थिती आणखीच खराब झाल्याचे दिसून आले. यावेळी पक्षाने ६१ जागांवर उमेदवार दिले होते; पण त्यापैकी केवळ सहा ते सात जागांवरच त्यांना आघाडी मिळाली होती. कोणत्याही राजकीय पक्षात गतिमानता असण्यासाठी योग्य विचारधारा, प्रेरणादायी नेतृत्व, जनाधारआणि सशक्त संघटनात्मक रचना आवश्यक असते, असे अमेरिकन समाजशास्त्रज्ञ थेडा स्कॉक्सपॉल यांनी आपल्या अभ्यासात म्हटले आहे. बिहारमध्ये किंवा देशातील इतर भागांमध्येही काँग्रेसला यापैकी एकही वैशिष्ट्य दाखवता आलेले नाही.

आणखी वाचा : बिहारपाठोपाठ भाजपाचा जम्मू-काश्मीरमध्येही ऐतिहासिक विजय; पोटनिवडणुकीत काय घडलं?

प्रचारात सतत दोनच मुद्दे रेटले

काँग्रेसने आपल्या निवडणूक प्रचारात सातत्याने कथित मतचोरी आणि जातीय जनगणेचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. २०२० मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारने जात सर्वेक्षण पूर्ण केले होते. पुढे केंद्रातील मोदी सरकारनेही राष्ट्रीय जनगणनेसह देशव्यापी जात गणनेचा निर्णय घेतलेला होता. ही बाब लक्षात न घेता राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारात सतत हेच मुद्दे रेटले. बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने मतदारांची विशेष फेरतपासणी मोहीम सुरू केली होती. या मोहिमेवर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आणि मतदार अधिकार यात्राही काढली. मात्र, राहुल गांधी यांच्या या यात्रेचा बिहारमधील जनतेवर काहीच प्रभाव पडला नसल्याचे निकालांमधून दिसून आले.

कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण

खरेतर विधानसभा निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी राज्यभर फिरलेल्या पत्रकारांना मतचोरीच्या आरोपांवरून जनतेत कोणताही संताप दिसला नाही. बिहारमध्ये राहुल गांधी यांनी मच्छीमार समाज किंवा मल्लाह समुदायाबद्दल सहानुभूती दाखवण्यासाठी तलावात उडी करण्यापलीकडे काहीच केले नाही. सुरुवातीच्या आक्रमक प्रचारानंतर त्यांनी राज्यातून काढता पाय घेतला आणि पक्षाला वाऱ्यावर सोडले. त्याउटल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाचे अनेक दिग्गज नेते राज्यात तळ ठोकून होते. सिद्धांतांच्या बाबतीत काँग्रेस डाव्या विचारांकडे झुकू लागल्याने सामान्य कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात विविध विचारप्रवाहांना सामावून घेणारी व्यापक संघटना असलेल्या काँग्रेसने आज तो समतोल गमावल्याची खंत पक्षातील ज्येष्ठ नेते व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा : बिहारमधील मुस्लीम बहुल भागात एनडीएची सरशी; महाआघाडीला कशामुळे बसला फटका?

काँग्रेसला कोणती चूक नडली?

बिहारमधील सामाजिक समीकरणाचे वास्तव ओळखण्यातही काँग्रेसच्या उच्च नेतृत्वाला अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. पक्षाचे पारंपारिक मतदार पाठ फिरवत असूनही त्यांना परत आणण्यासाठी काँग्रेसचे नेतृत्व कोणताही ठोस प्रयत्न करीत नसल्याचा आरोप होत आहे. त्यातच ऐन तोंडावर विधानसभा निवडणुकीच्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलून काँग्रेसने आपल्या समस्यांमध्ये आणखीच वाढ करून घेतली आहे. याशिवाय काँग्रेसच्या नेतृत्वाने या निवडणुकीत अनेक अन्य चुका केल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या वर्षाच्या सुरुवातीला सादर केलेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात बिहारसाठी मोठी आर्थिक तरतूद केली होती. मात्र, काँग्रेसने या तरतुदींवर विचित्रपणे टीका केली.

महात्मा गांधी काय म्हणाले होते?

पक्षाचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये जॅकपॉटसारख्या घोषणा होत असल्याची उपरोधिक टीका केली. बिहारमधील राजकीय विश्लेषकांच्या मते, काँग्रेसच्या नेत्यांनी स्वत:लाच धक्का देत पक्षाची बिहारमधील प्रतिमा आणखीच खराब केली. १९४८ मध्ये महात्मा गांधी यांनी काँग्रेस पक्षातील नेत्यांची विचारधार विसर्जित करणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. विविध प्रांतांत सत्तेवर आलेल्या काँग्रेस नेत्यांच्या वर्तनामुळे ते निराश झाल्याचे पाहायला मिळाले होते. आज त्यांच्या त्या शेवटच्या इच्छेची आठवण करून देण्याची वेळ पुन्हा आली आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.