मुंबई : विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकातील यशानंतर शिवसेना शिंदे गटाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पक्षाचे नेते हवेत होते. परंतु महानगरपालिका निवडणुकीत ठाणे, मुंबई महानगर क्षेत्र वगळता राज्यात अन्यत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चांगलीच पिछेहाट झाली आहे. यातून शिंदे यांचे राजकीय महत्त्वही आपोआप कमी झाले आहे. यामुळेच निकालानंतर शिंदे गटात उत्साह जाणवला नाही.
आपलीच शिवसेना खरी, असा दावा एकनाथ शिंदे नेहमी करतात. मुंबई महानगरपालिकेत शिंदे गटापेक्षा उद्धव ठाकरे गटाचे दुप्पट अधिक नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबईकरांनी ठाकरेंना कौल दिला. उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आल्याने त्याचा फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसेल ही व्यक्त करण्यात आलेली अटकळ वास्तवात आली आहे . या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्याचा फटका शिंदे यांना बसला. अर्थात, भाजपला पूर्ण बहुमत मिळालेले नसल्याने शिंदे गटाची मदत भाजपसाठी महत्त्वाची आहे. यातूनच शिंदे हे स्थायी समितीचे अध्यक्ष किंवा अन्य महत्त्वाचे पद पदरात पाडून घेतील, अशी शक्यता आहे.
शिंदे यांच्या ठाणे या बालेकिल्ल्यात ७५ जागा मिळाल्या. शिंदे गटाचे हे सर्वाधिक यश आहे. कल्याण-डोंबिवलील ५४, नवी मुंबई ४२, उल्हासनगर ३६, नाशिक २६, जळगाव २२ हे अपवाद वगळता अन्य महानगरपालिकांमध्ये शिंदे गटाला फार काही चांगले यश मिळालेले नाही. लातूर आणि परभणीमध्ये शिंदे गटाला भोपळाही फोडता आलेला नाही. शिवसेना शिंदे गटाला राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये एकूण ३९४ जागा मिळाल्या आहेत. विधानसभेत शिंदे गटाचे ५७ आमदार निवडून आले आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही शिंदे गटाचे ३७ नगराध्यक्ष निवडून आले होते. या तुलनेत महानगरपालिकेत शिंदे गटाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.
शिंदे यांचे वाढते महत्त्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी तापदायक ठरत होते. शिंदे यांच्या शब्दाला दिल्लीतील भाजपच्या वर्तुळात महत्त्व असल्यानेच त्यांच्या मनासारखे निर्णय घेण्यात आले होते. शिंदे यांच्या मागणीवरूनच रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस स्थगिती देण्यात आली. शिंदे गटाने मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घातल्यावर लगेचच दुसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिंदे यांना भेटीसाठी वेळ दिली होती. महानगरपालिका निवडणुकीत शिंदे यांच्याशी युती करण्याच्या सूचना दिल्लीतून देण्यात आल्या होत्या.
शिंदे यांची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. अशा वेळी शिंदे यांचे निवडणुकीत महत्त्व कमी होणे हे राज्यातील भाजप नेत्यांना दिलासादायकच ठरणार आहे. शिंदे यांनी निवडणुकीत सारी प्रतिष्ठा पणाला लावली होती. पण मतदारांनी तेवढी त्यांना साथ दिली नाही. शिंदे यांचा पक्ष दुसऱया क्रमांकाच पक्ष ठरला असला तरी पक्षाचा आलेख काहीसा घसरला आहे.
