West Bengal Repolling BJP TMC Allegations : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सलग चौथ्यांदा सत्ता स्थापन करणार की, भाजपाच्या परिवर्तनाच्या हाकेला जनता प्रतिसाद देणार, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. पाच मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपा बहुमताचा आकडा पार करण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी दोन चाचण्यांनी मात्र सत्ताधारी तृणमूल काँग्रेसलाच पूर्ण बहुमत मिळण्याचे भाकीत केले आहे. यादरम्यान मतमोजणीसाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना निवडणूक आयोगाकडून राज्यातील दोन मतदारसंघातील एकूण १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान घेतले जात आहे. नेमकी काय आहेत यामागची कारणे? त्याविषयीचा हा आढावा…

फेरमतदानाचे निर्देश नेमके कशासाठी?

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानादरम्यान काही ठिकाणी मतदान प्रक्रियेत फेरफार झाल्याच्या तक्रारी केंद्रीय निवडणूक आयोगाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत आयोगाने दोन मतदारसंघांतील एकूण १५ मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश शुक्रवारी दिले. त्यामध्ये मग्रहाट पश्चिम आणि डायमंड हार्बर या दोन मतदारसंघांचा समावेश आहे. या फेरमतदानाची संबंधित मतदान केंद्रांच्या परिसरात जास्तीत जास्त प्रसिद्धी करण्यात यावी, जेणेकरून मतदारांना याची माहिती मिळेल, असे निर्देशही देण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व भौतिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच निवडणूक निरीक्षकांनी सादर केलेल्या अहवालांच्या आधारे हे फेरमतदान घेतले जात असल्याचे आयोगाने सांगितले आहे.

शनिवारी सकाळपासून फेरमतदानाला सुरुवात

मग्रहाट पश्चिम आणि डायमंड हार्बर या दोन मतदारसंघातील १५ मतदान केंद्रावर आज (शनिवारी) सकाळपासूनच मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. या फेरमतदानादरम्यान परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मग्रहाट पश्चिम विधानसभा मतदारसंघातील एकूण ११ केंद्रांवर फेरमतदान घेतले जात आहे, दुसरीकडे डायमंड हार्बर विधानसभा मतदारसंघातील एकूण चार केंद्रांवर शनिवारी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर सर्वात मोठा वाद फाल्टा विधानसभा मतदारसंघात निर्माण झाला होता. येथील एका केंद्रावर ईव्हीएमवरील कमळाच्या चिन्हाचे (भाजपा) आणि सीपीएम उमेदवाराच्या नावासमोरील बटणावर टेप लावून ते लपवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला. त्या संदर्भातील व्हिडीओ समाजमाध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. फाल्टा येथील आणखी ३० केंद्रांवरही फेरमतदान घेण्याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाकडे सध्या प्रलंबित आहे.

ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याच्या ७७ घटना

पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज अग्रवाल यांनी बुधवारी माहिती दिली की, दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या ७७ घटना समोर आल्या आहेत. ज्या केंद्रांवर अशा प्रकारच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध होईल, तिथे फेरमतदान घेतले जाईल, असा इशारा त्यांनी आधीच दिला होता. यादरम्यान भाजपाचे नेते अमित मालवीय यांनी आरोप केला की, मतदारांना आपल्या उमेदवारांची नावे दिसू नयेत म्हणून ईव्हीएमवरील त्यांच्या नावाची बटणे जाणीवपूर्वक टेपने झाकण्यात आली होती. तृणमूल काँग्रेसने हीच रणनीती यापूर्वी डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघात ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांना निवडून आणण्यासाठी वापरली होती, त्याचीच पुनरावृत्ती आता केली जात असल्याचे मालवीय यांनी म्हटले. याबाबत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मतदानात फेरफार झाल्याच्या २३ तक्रारींमध्ये प्रथमदर्शनी तथ्य आढळले आहे, ज्यामध्ये फाल्टा येथील २० तक्रारींचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांबाबत आयोग ‘झिरो टॉलरन्स’ धोरण पाळत असून, दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानावेळी राज्यात ठिकठिकाणी हिंसाचार आणि ईव्हीएममधील तांत्रिक बिघाडाच्या घटनाही घडल्या होत्या. हुगळीमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या, तर बाली येथे दोन गटांतील संघर्षानंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.

पश्चिम बंगालमध्ये कोण मारणार बाजी?

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांत मतदान पार पडले. या दोन्ही टप्प्यांचे मिळून ९२.४७ टक्के विक्रमी मतदानाची नोंद झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. गेल्या सहा ते सात दशकांत यंदा प्रथमच कठोर उपाययोजनांमुळे पश्चिम बंगालमधील मतदारांनी निर्भीडपणे मतदानाचा हक्क बजावल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. निकालातून विकसित भारताचा पाया भक्कम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुसरीकडे, ममता बॅनर्जी यांनी भाजपावर टीकेची झोड उठवताना राज्यात पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसचीच सत्ता येणार असे ठामपणे सांगितले. राज्यात निवडणूक आयोगाने राबवलेली मतदारांची विशेष फेरतपासणी मोहीम निवडणुकीतील वादाचा सर्वात मोठा केंद्रबिंदू ठरली आहे. या मोहिमेअंतर्गत मतदार यादीतून तब्बल ९० लाख मतदारांची नावे वगळण्यात आली, ज्यामुळे एकूण मतदारांची संख्या ७.६६ कोटींवरून ६.७५ कोटी इतकी झाली. यादरम्यान निवडणूक आयोगाची ही मोहीम आपल्या समर्थकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे एक कारस्थान असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला. भाजपाने मात्र या मोहिमेचे समर्थन करून राज्यातील घुसखोरीचा मुद्दा उचलून धरला. सीमावर्ती जिल्ह्यांमधील बेकायदा स्थलांतरित आणि बोगस मतदारांना बाहेर काढण्यासाठी ही स्वच्छता मोहीम आवश्यक असल्याचे भाजपाने म्हटले. सलग १५ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर, तृणमूल काँग्रेसला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागत आहे. त्यावर उपाय म्हणून पक्षाने ७४ विद्यमान आमदारांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे, त्यामुळे राज्यात पुन्हा ममता यांचे सरकार येणार की भाजपा इतिहास घडवणार हे सोमवारी (४ मे) होणाऱ्या मतमोजणीतूच स्पष्ट होणार आहे.