सगळ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाने अभूतपूर्व विजय मिळवला; तर सलग १५ वर्षें सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या राजकीय घडामोडीनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या नेत्यांना खडेबोल सुनावले. तृणमूल काँग्रेसच्या पराभवावर आनंद व्यक्त करणाऱ्या पक्षातील नेत्यांची त्यांनी चांगलीच कानउघाडणी केली, त्याविषयी…

दोन दिवसांत राहुल यांनी दुसऱ्यांदा ममता यांच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी पश्चिम बंगालमधील मतमोजणीदरम्यान “भाजपाने १०० हून अधिक जागा हडप केल्या” या ममतांच्या आरोपाला राहुल गांधी यांनी सहमती दर्शवली होती. विशेष म्हणजे, काही आठवड्यांपूर्वी त्यांनी ममता बॅनर्जी भ्रष्ट असल्याचा आरोप केला होता. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला संधी मिळण्यास खुद्द तृणमूल काँग्रेसच जबाबदार असल्याचे ते म्हणाले होते. यादरम्यान राहुल गांधी यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांना दिलेल्या या तंबीमुळे ‘इंडिया’ आघाडीतील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. केवळ बंगालमध्येच नव्हे, तर तमिळनाडूमधील द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाबरोबरचे काँग्रेसचे संबंधही ताणले गेल्याचे दिसून येते.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष का केला?

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा भाजपाकडून पराभव होत असल्याचे स्पष्ट होताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. पक्षाशी संबंधित काही सोशल मीडिया खात्यांवरून या निकालासंदर्भात पोस्ट शेअर करण्यात आल्या. राज्यातील एका प्रादेशिक पक्षाच्या पराभवाकडे काँग्रेसच्या काही घटकांनी इंडिया आघाडीत स्वतःचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याची संधी म्हणून पाहिले. तसेच, ज्या राज्यांमध्ये काँग्रेस पूर्वी मजबूत होती; पण नंतर प्रादेशिक पक्षांमुळे कमकुवत झाली. त्या ठिकाणी पक्षाला पुन्हा उभारी घेण्याची शक्यता म्हणूनही या निकालाकडे पाहिले गेले. मात्र, राहुल गांधी यांनी अशा जल्लोषाला सध्याच्या राजकीय परिस्थितीत अयोग्य ठरवत विरोधकांनी अंतर्गत मतभेद बाजूला ठेवण्याची गरज अधोरेखित केली.

राहुल गांधी नेमके काय म्हणाले?

दिवसेंदिवस प्रबळ होत असलेल्या भाजपाला जर रोखायचे असेल, तर विरोधकांनी परस्परांतील स्पर्धा टाळावी, असा राहुल गांधी यांनी संदेश दिला. “काँग्रेसमधील काही जण आणि इतरही तृणमूल काँग्रेसच्या पराभवावर आनंद व्यक्त करताना दिसून येत आहेत. मात्र, त्यांनी हे स्पष्टपणे समजून घ्यायला हवे की, आसाम आणि पश्चिम बंगालमधील जनादेश ‘लुटणे’ हे भारतीय लोकशाही नष्ट करण्याच्या भाजपाच्या मोहिमेतील एक ‘मोठे पाऊल’ आहे. क्षुद्र राजकारण बाजूला ठेवा… हा एका किंवा दुसऱ्या पक्षाचा नसून, तो भारताचा प्रश्न आहे”, असे राहुल यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले.

काँग्रेस–तृणमूल काँग्रेसमधील तणावाचा इतिहास

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील संबंधांचा इतिहास हा मैत्रीपेक्षा संघर्षाचाच जास्त राहिला आहे. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राहुल गांधी यांनी घेतलेली मवाळ भूमिका चर्चेत असली तरी दोन्ही पक्षांमधील तणावाचे मूळ खूप जुने आहे. १९९८ मध्ये ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसपासून विभक्त होऊन तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. सुरुवातीला डाव्या आघाडीविरोधात उभ्या राहिलेल्या या पक्षाने २०११ मध्ये ३४ वर्षांच्या डाव्या आघाडीच्या सत्तेला सुरुंग लावत राज्यात पहिल्यांदा सरकार स्थापन केले. बंगालमधील आपले स्थान मजबूत करण्यासाठी काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवणे, तृणमूल काँग्रेसबरोबर आघाडी करणे किंवा डाव्या पक्षांसोबत जाणे, अशा तीन पर्यायांचा विचार केला. मात्र, १९७७ नंतर या कोणत्याही पर्यायातून राज्यात काँग्रेसला विशेष यश मिळाले नाही.

बंगालमध्ये २०२४ मध्ये काय घडले होते?

‘इंडिया’ आघाडीचे संस्थापक सदस्य असूनही जागावाटपावरून झालेल्या मतभेदांमुळे तृणमूल काँग्रेसने २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. या निवडणुकीत त्यांनी २९ जागा जिंकल्या, तर काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. महत्त्वाची बाब म्हणजे लोकसभेतील काँग्रेसचे तत्कालीन नेते अधिर रंजन चौधरी यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात (बहरामपूर) पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर दोन्ही पक्षांमधील संबंधांमध्ये चढ-उतार दिसून आले. विविध राज्यांतील विधानसभा निकालांनंतर राहुल गांधी यांनी भाजपावर मतचोरीचे आरोप केल्यानंतर तृणमूलने त्यांच्या भूमिकेला ठोस पाठिंबा दिला नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील आरोपांबाबतही दोन्ही पक्षांत मतभेद दिसून आले.

काँग्रेसची आताची बदललेली रणनीती

अलीकडेच संसदेत काही मुद्द्यांवर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये सहकार्याची भावना दिसून आली. महिलांसाठी आरक्षण कायद्यात बदल करण्याच्या उद्देशाने आणलेल्या १३१ व्या घटनादुरुस्ती विधेयकाला दोन्ही पक्षांनी एकत्रित विरोध केला. त्याशिवाय पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील महाभियोग नोटीस प्रक्रियेतही तृणमूलने पुढाकार घेतला, ज्याला काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता. यादरम्यान विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर गंभीर आरोप केले होते. तृणमूल काँग्रेसने भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडले आहेत… बंगालची जनता भाजपाचा द्वेष आणि तृणमूलची जनविरोधी धोरणे यांच्यात अडकली आहे, असे राहुल एका सभेत म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमधील संबंध अद्याप तणावपूर्ण असून, इंडिया आघाडीतही त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत.

विजय की द्रमुक? काँग्रेससमोर आघाडीचा पेच

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजय यांच्या नेतृत्वाखालील ‘तमिळगा वेत्री कळगम’ (TVK) पक्षाने २३४ पैकी तब्बल १०८ जागा जिंकल्या. या विजयानंतर काँग्रेसने आता टीव्हीकेला सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंबा देण्याच्या हालचाली सुरू केल्याचे समजते, ज्यामुळे स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक आणि काँग्रेसमधील दोन दशकांच्या मैत्रीला मोठा तडा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०१४ मधील अपवाद वगळता गेल्या २० वर्षांत काँग्रेस आणि द्रमुक यांनी नेहमीच एकत्र निवडणुका लढवल्या आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी स्टॅलिन यांचा उल्लेख ‘मोठा भाऊ’ असा केला होता. इतकेच नाही, तर २०१९ मध्ये राहुल गांधी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी सुचवणारे स्टॅलिन पहिलेच नेते होते. २०२१ मध्ये जेव्हा तमिळनाडूत द्रमुकचे सरकार सत्तेत आले, तेव्हा काँग्रेसला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. तेव्हापासूनच काँग्रेसमधील एका गटात नाराजी होती. मात्र, पक्षाची राष्ट्रीय स्थिती पाहता, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यावेळी नरमाईची भूमिका घेतली होती. २०२६ च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी विजय यांच्या पक्षाबरोबर युती करण्याचा आग्रह धरला होता. मात्र, पक्षश्रेष्ठींकडून नकार मिळाल्यानंतर अखेर त्यांनी द्रमुकसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. या आघाडीत काँग्रेसने २८ जागा लढवल्या होत्या; मात्र त्यांना केवळ पाच जागांवर विजय मिळवता आला. दुसरीकडे पहिल्याच निवडणुकीत विजयच्या पक्षाने १०८ जागा जिंकून सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. यादरम्यान काँग्रेसने सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यास त्यांचे आणि द्रमुकचे राजकीय संबंध आणखीनच ताणले जाण्याची शक्यता आहे.