Why Ram Mandir Donation Scam Major Concern for RSS : अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील देणगीत मोठा अपहार झाल्याची बाब उघडकीस येताच संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. या प्रकरणात सहभागी असलेल्या आठही आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक केली. सध्या या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपविण्यात आला असून सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याच मुद्द्याला हाताशी धरून विरोधकांच्या इंडिया आघाडीने भाजपासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) लक्ष्य केले आहे. दरम्यान, या अपहाराचा मुद्दा संघाच्या आगामी तीन दिवसीय अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीतही गाजण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कर्नाटकातील बेळगाव येथे १० जुलैपासून या बैठकीला सुरुवात होणार असल्याचे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
दी इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कर्नाटक येथील बैठकीत सुरुवातीला देशातील विविध विषयांसह जनगणना प्रक्रियेवर चर्चा होणार होती. आता मात्र श्रीराम मंदिरातील देणग्यांमधील अपहार आणि त्यावरून संघाच्या सार्वजनिक प्रतिमेवर होत असलेला परिणामाबाबत या बैठकीत सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय श्रीराम मंदिराच्या व्यवस्थापनाशी संबंधित संघाच्या काही पदाधिकाऱ्यांच्या भविष्यातील भूमिकेवरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, बैठकीत जनगणनेसह देशातील इतर महत्त्वाच्या घडामोडींवर चर्चा होणार असली तरी राम मंदिराचा मुद्दा सध्या सर्वांच्याच मनात आहे आणि त्यावर सविस्तर चर्चा केली जाईल. या वादामुळे संघ परिवारातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज असून जनमानसात संघाची नकारात्मक प्रतिमा तयार होत असल्याने ती रोखण्यासाठी योग्य उपाययोजनांवर विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.
उत्तर प्रदेशातील संघाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने या वादाची तीव्रता अधिक स्पष्ट करताना सांगितले की, काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात संघावर करण्यात आलेल्या कथित हिंदुत्ववादी दहशतवादाच्या आरोपांपेक्षाही सध्याचा वाद अधिक नुकसान करणारा आहे. याआधी युपीए सरकारने संघावर हिंदुत्ववादी दहशतवादाचे आरोप केले होते; परंतु त्यावर जनतेने फारसा विश्वास ठेवला नाही. तो सरकारचा राजकीय प्रचार असल्याचे अनेकांनी मानले होते. मात्र, सध्याचा हा वाद लोकांच्या मानसिकतेवर आणि संघाच्या प्रतिमेवर थेट आघात करत आहे. लोक राम मंदिर आणि संघ यांना एकाच नजरेत पाहतात. या आर्थिक गैरव्यवहारात संघाचा कोणताही कार्यकर्ता थेट सामील नसला, तरी या वादाचा कलंक पुसून टाकणे संघासाठी अत्यंत कठीण जाणार आहे.
बेळगाव येथे १० ते १२ जुलैदरम्यान होणारी वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अत्यंत महत्वाच्या संघटनात्मक बैठकांपैकी एक मानली जाते. या बैठकीला संघाच्या सर्व ११ संघटनात्मक क्षेत्रांमधील आणि ४६ प्रांतांमधील प्रांत प्रचारक, सह-प्रांत प्रचारक, क्षेत्र प्रचारक आणि सह-क्षेत्र प्रचारक उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, संघाच्या विचारसरणीतून प्रेरित असलेल्या ३२ विविध संघटनांचे अखिल भारतीय संघटन सचिवही यात सहभागी होणार आहेत. सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, सर्व सह-सरकार्यवाह आणि संघटनेच्या सर्वोच्च कार्यकारिणीचे सदस्यही बैठकीला उपस्थित राहतील. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सुरू असलेल्या संघटन विस्ताराचा आढावा, प्रशिक्षण कार्यक्रम, आगामी योजना तसेच जनगणनेसह देशातील सध्याच्या राष्ट्रीय घडामोडींवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
श्रीराम मंदिरातील देणग्यांमधील अपहार झाल्याचे समोर आल्यानंतर जवळपास आठवडाभराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शुक्रवारी प्रथमच त्यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली. या घटनेमुळे संपूर्ण हिंदू समाज आणि रामभक्तांच्या भावना तसेच श्रद्धेला मोठा धक्का बसला आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाच्या विनंतीनुसार उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्या व्यक्तींना कठोरात कठोर शिक्षा होईल, असे संघाचे सहकार्यवाहक दत्तात्रेय होसबळे यांनी एका निवेदनात नमूद केले आहे. तसेच, या घटनेकडे न्यासाने अत्यंत गंभीर बाब म्हणून पाहावे, मंदिराच्या व्यवस्थापनातील त्रुटी तातडीने दूर कराव्यात आणि भाविकांचा विश्वास कायम राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही या निवेदनातून करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे संघ परिवारातील अंतर्गत वादही उफाळून आल्याचे दिसून येत आहे. विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते आणि राम मंदिर न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांच्या भूमिकेवर संघातील एका गटाकडून टीका होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाने सार्वजनिकरित्या निष्पक्ष चौकशीला पाठिंबा दर्शवित मंदिराच्या प्रशासनात आवश्यक संस्थात्मक सुधारणा करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या अनेक दशकांपासून राम मंदिर हे संघ परिवाराच्या वैचारिक चळवळीचे सर्वात मोठे केंद्र राहिले आहे. त्यामुळे या वादाचे परिणाम केवळ एका फौजदारी तपासापुरते मर्यादित राहिलेले नसून, संपूर्ण संघ परिवाराच्या विश्वासार्हतेशी असल्याची कबुली संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. यादरम्यान कर्नाटकातील बेळगाव येथे होणाऱ्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीत या वादामुळे संघाच्या प्रतिमेला बसलेला धक्का कसा कमी करता येईल, यावरही सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.
