Why Rohit Pawar and Parth Pawar are Spotlight : भाजपाच्या नेत्यांनी केलेल्या उलटसुलट विधानांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच शरद पवार यांच्या गटातील आमदारांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून खळबळ उडवून दिली आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांचे विलीनीकरण होणार की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यादरम्यान पवार कुटुंबातील दोन तरुण चेहरे – आमदार रोहित पवार व पार्थ पवार पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्याविषयीचा हा आढावा…
रोहित पवार यांची मागणी काय?
२८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. अजित पवार यांच्या विमान अपघातावर त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करून चौकशीची मागणी लावून धरली. २०१९ मध्ये कर्जत जामखेड मतदारसंघातून विजय मिळवत रोहित पवार यांनी पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश केला होता. त्यांनी भाजपाचे तत्कालीन आमदार राम शिंदे यांचा पराभव करून ही जागा राष्ट्रवादीच्या गोटात खेचून आणली होती. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना या मतदारसंघातून निसटता विजय मिळाला. त्यावेळी त्यांचे काका अजित पवार यांनी ‘हा केवळ नशिबाने वाचला हे लक्षात ठेवा’, अशी खोचक प्रतिक्रिया दिली होती.
रोहित पवार यांना कशाचा संशय?
आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातामागील सत्य बाहेर आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांनी आपला लढा महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता दिल्लीपर्यंत नेण्याचे संकेत दिले आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघातात घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे अप्रत्यक्ष संकेतही त्यांनी दिले आहेत. यादरम्यान आमदार रोहित पवार हे विमान अपघाताबाबत संशयाची बीजे पेरून शरद पवार गटासाठी स्वतंत्र वाट तयार करीत असावेत, असे भाजपातील एका गटाचे म्हणणे आहे. अजित पवार यांच्या समर्थकांच्या मनातील शंका ते उपस्थित करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आणखी वाचा : पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात राहुल गांधी आणखीनच आक्रमक; खासदारकी रद्द करण्याबाबत काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रतिक्रिया दिली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे सत्य बाहेर यावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे. त्याबाबतची चौकशी सुरू असून तपासाचा अहवाल समोर येईपर्यंत कोणीही कोणताही निष्कर्ष काढू नये. अजित पवार यांच्या मृत्यूवर राजकारण होता कामा नये, असे फडणवीसांनी स्पष्ट केले. आमदार रोहित पवार यांनी विमान अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना अनेक कथित त्रुटींवर बोट ठेवले. अजित पवार यांच्या प्रवासाचा प्लॅन अचानक का बदलण्यात आला, अपघातग्रस्त विमानाचे वैमानिक अचानक का बदलले गेले, अपघाताच्या सुमारे एक मिनिट आधी विमानाचा ट्रान्सपोंडर का बंद झाला, कमी दृश्यमानता असतानाही विमान बारामती येथेच का उतरवण्यात आले, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. त्याशिवाय अपघाताच्या काही सेकंद आधी सहवैमानिकाने ‘ओह शिट’ असे उद्गार काढल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला.
सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्याची चर्चा
अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून राजकारण तापलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा जोरात झाली. यादरम्यान सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंगळवारी मंत्रालयातील कार्यभार स्वीकारला. त्यानंतर बुधवारी दिल्लीवारी करीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या राजकीय घडामोडींमुळे अजित पवारांचे ज्येष्ठ सुपुत्र पार्थ पवार पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. २०१९ च्या मावळ लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पार्थ यांनी राजकारणातून काहीसा काढता पाय घेतला होता. मात्र, अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ पवार पुन्हा सक्रिय झाले असून ते पक्षात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले.
पार्थ पवार यांची भूमिका काय?
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील नेते व कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यासाठी पार्थ पवार यांनीच त्यांची मनधरणी केली असल्याची माहिती राष्ट्रवादीतील सूत्रांनी दिली. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीच्या दिवशी पार्थ यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांची भेट घेतली होती. आईच्या शपथविधीला उपस्थित राहण्याऐवजी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते, कारण सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार असल्याबाबत शरद पवार यांनी आधी अनभिज्ञता दर्शवली होती. सुनेत्रा पवार यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पार्थ पवार त्यांच्या शेजारी उभे होते. त्यांचे भावनिक क्षण पक्षाकडून मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आले. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले की, दोन्ही पक्षांचे लवकरच विलीनीकरण होईल. मात्र, खरी अडचण सत्तासंघर्षाची आहे; कारण दोन्ही बाजूंनी पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी अनेकजण शर्यतीत आहेत.
हेही वाचा : भाजपामुळे शिंदे गटाला मोठा फटका? पराभवानंतर ठाकरेंच्या शिलेदाराचा तडकाफडकी राजीनामा; वाचा ५ घडामोडी…
भाजपाची पुढील रणनीती काय?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजपाने २०२९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्वबळाचे लक्ष्य ठेवले आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण झाल्यास भविष्यात भाजपापुढे मोठे आव्हान निर्माण होऊ शकते, असे पक्षातील एका गटाचे म्हणणे आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यात भाजपाने पहिल्यांदाच खोलवर आपली पाळेमुळे रोवली आहेत. अशा परिस्थितीत पवारांच्या पक्षाला अधिक मजबूत का करावे? असा प्रश्न भाजपातील एका गटाला पडला आहे. यादरम्यान संसदेच्या अधिवेशनात काँग्रेसने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपाने सावध पवित्रा घेतला आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे पंतप्रधान मोदींना सातत्याने लक्ष्य करीत असल्याने भाजपाच्या गोटात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण करून शरद पवार यांच्या पक्षातील आठ खासदारांचा पाठिंबा मिळवण्याची भाजपाची शक्यता नाकारता येत नाही, असेही सूत्रांनी सांगितले आहे.

