पिंपरी : पिंपरी-चिंचवडकरांनी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केलेला विकास, त्यांचा चेहरा (नेतृत्व) नाकारत भाजपला महापालिकेत सत्तेवर बसविले. आता भाजपसोबत राज्यातील सरकारमध्ये सहभागी असलेल्या पवार यांनी आगामी महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली (चेहऱ्यावर) लढविणार असल्याचे सांगितले. त्यामुळे भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पिंपरी महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता बळावली आहे. असे झाल्यास सत्तेतील दोन्ही पक्षात लढत होईल. शहरवासीय पुन्हा अजितदादांचे नेतृत्व (चेहरा) स्वीकारणार की भाजपलाच दुसऱ्यांदा महापालिकेतील सत्तेत बसविणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

औद्योगिक, उद्योग, कामगारनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरावर सुरुवातीच्या काळात काँग्रेसने राज्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाच वर्षे महापालिका चालविली. काँग्रेसचे नेते माजी खासदार रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर शहरात काँग्रेस कमकुवत, नेतृत्वहीन झाली. संघटनेची वीण उसवली. त्यामुळे अनेकांनी राष्ट्रवादीची वाट धरली. परिणामी, महापालिका सभागृहात काँग्रेस शून्यावर आली.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने महापालिकेवर १५ वर्षे एकहाती राज्य केले. त्यामुळे शहर राष्ट्रवादीचा पर्यायाने अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाऊ लागले. पण, महापालिकेत सत्ता असतानाही पवार यांना निर्मितीपासून सन २००९ पासून चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातून घड्याळ चिन्हावर एकदाही आमदार निवडून आणता आला नाही. एक अपवाद वगळता मतदारसंख्येने छोट्या असलेल्या पिंपरी विधानसभेतून अण्णा बनसोडे कायम ‘घड्याळ’ चिन्हावर निवडून आले.

पिंपरी, चिंचवडचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीला यश मिळविता आले नाही. अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. २०१४ मध्ये राजकीय वातावरण बदलताच दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पवार यांची साथ सोडली. २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत झाली. एकेकाळी शिष्य असलेल्या जगताप आणि लांडगे यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वावर मात केली. महापालिकेवर भाजपचे कमळ फुलविले. १२८ नगरसेवक संख्या असलेल्या महापालिकेत राष्ट्रवादीचे केवळ ३६ नगरसेवक निवडून आले. विकास कामे करूनही पिंपरी-चिंचवडकरांनी नाकारल्याची खंत पवार हे सातत्याने बोलावून दाखवत. पुढे त्यांनी शहरात येणे कमी केले.

महाविकास आघाडीचे सरकार येताच अजित पवार यांनी शहरात लक्ष घालण्यास सुरुवात केली. आता ते भाजपसोबत महायुती सरकारमध्ये सहभागी आहेत. शहरात अजित पवारांची ‘राष्ट्रवादी’ आणि भाजप या दोन पक्षाची ताकद आहे. पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत. तर, चार आमदार असलेल्या भाजपच्याही महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे हे प्रभागनिहाय दौरा करीत असून इच्छुकांशी संवाद साधत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ‘जीवापाड, मन लावून काम केले तर बदल होऊ शकतो. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी चेहरा लागतो. माझा चेहरा जरा बरा आहे. त्यामुळे माझाच चेहरा घेऊन पिंपरी -चिंचवड महापालिकेची निवडणूक लढवू.’ असे सांगून निवडणूक स्वबळावर लढविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे २०१७ च्या महापालिका निवडणुकीत ‘नको बारामती, नको भानामती’, ‘शहरातील निर्णय शहरातच’ हा भाजपने केलेला प्रचार आणि शहरवासीयांनी नाकारलेला अजित पवार यांचा चेहरा (नेतृत्व) आता पुन्हा पिंपरी-चिंचवडकर स्वीकारणार की भाजपला साथ देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.