गडचिरोली : राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या झालेल्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गटात कुरबुरी सुरु झाल्याचे चित्र आहे. यातूनच पक्षातील ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटातील काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्या वक्तव्याचा आणि आत्राम यांच्या राजीनाम्याचा काही संबंध तर नाही ना, अशीही चर्चा आता सुरु झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये जागावाटपावरून बरेच दावे प्रतिदावे करण्यात आले होते. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (अजित पवार गट) केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यापैकी केवळ सुनील तटकरेच विजयी झाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारही पराभूत झाल्या. तर महायुतीलाही मोठा फटका बसला. निकालानंतर महाविकासआघाडीतील घटक पक्षात उत्साह संचारला असून महायुतीत मात्र कुरबुरी सुरु झाल्या आहे. धर्मरावबाबा आत्राम यांनी गोंदियाच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.

आणखी वाचा-‘नीट’ परीक्षेतील गोंधळावरुन सरकारप्रति असंतोष; टीडीपी-जेडीयू या विषयावर गप्प का आहेत?

काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. यामुळे पालकमंत्रीपद सोडल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, प्रत्येक कामात प्रफुल पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांची लुडबुड सहन न झाल्याने आत्राम यांनी पालकमंत्री पद सोडले, अशी माहिती आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यात गडचिरोली-चिमूर जागेकारिता आत्राम आग्रही होते. परंतु ऐनवेळेवर भाजपाने ही जागा सोडली नाही. परिणामी येथील भाजपाचा उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झाला. आत्राम यांना संधी दिली असती तर चित्र वेगळे असते. असा दावा त्यांचे कार्यकर्ते करतात. त्यामुळे गडचिरोलीतील दोन विधानसभेवर त्यांनी दावा केला आहे. सोबतच विधानपरिषदेत आदिवासी समजाला प्रतिनिधित्व हवे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे दिवसेंदिवस नाराजांची संख्या वाढत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.

आणखी वाचा-अशोक चव्हाणांच्या समावेशानंतरही नांदेडमध्ये पराभव, भाजप विश्लेषण करणार, विखे-पाटील नांदेडमध्ये

नाराज आमदार कोण?

पावसाळी अधिवेशनानंतर सर्वच पक्ष विधानसभेच्या तयारीला लागणार आहेत. तत्पूर्वी लोकसभेतील पराभवामुळे अनेकांची झोप उडाली आहे. त्यामुळे काही आमदार ‘घरवापसी’च्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आणि यांना बसू शकतो. त्यात पक्षात नाराजी नाट्य रंगल्याने अजित पवारांना यावर तोडगा काढण्यासोबत इतरांचीही नाराजी दूर करावी लागणार आहे. दुसरीकडे अजित पवार गटातील आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शरद पवार गटाकडून वारंवार करण्यात येत आहे. त्यामुळे ते आमदार आत्राम किंवा भुजबळ आहेत. की दुसरे कुणी याचीही चर्चा आहे.