scorecardresearch

तेलंगणातील दुसरा पक्ष राज्यात जम बसविणार का ?

सुमारे दशकभरापूर्वी केवळ तेव्हाच्या एकत्रित आंध्र प्रदेशातील व विशेषत: हैदराबादमध्ये अस्तित्व असलेल्या असउद्दिन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एमआयएम (ऑल इंडिया मजलिस ई इतिहुद्दील मुस्लीमन) पक्षाने नांदेडमार्गेच राज्यात प्रवेश केला

MIM led by Asuddin Owaisi
असउद्दिन ओवेसी

संतोष प्रधान

सुमारे दशकभरापूर्वी केवळ तेव्हाच्या एकत्रित आंध्र प्रदेशातील व विशेषत: हैदराबादमध्ये अस्तित्व असलेल्या असउद्दिन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एमआयएम (ऑल इंडिया मजलिस ई इतिहुद्दील मुस्लीमन) पक्षाने नांदेडमार्गेच राज्यात प्रवेश केला आणि राज्याच्या राजकारणात अल्पसंख्यांक वर्गात स्थान निर्माण केले. आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली भारत राष्ट्र समितीने राज्यातील प्रवेशाकरिता नांदेडचीच निवड केली. यामुळेच तेलंगणामधील दुसरा पक्ष राज्यात जम बसविणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा >>>चंद्रशेखर राव यांचा राज्यात ‘किसान सरकार’चा नारा

तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती करण्यात आल्यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी देशभर पक्ष विस्ताराकरिता त्यांनी प्रथम महाराष्ट्राची निवड केली. तेलंगणाच्या सीमेपासून जवळ असलेल्या नांदेडमध्ये चंद्रशेखर राव यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी शेतकऱ्यांना साद घातली. तेलंगणातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची ‘रयतू बंधू’ योजना यशस्वी ठरली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना त्यांनी योजनेचे स्वप्न दाखविले. शेतकऱ्यांचे सरकार आणण्याचा निर्धार केला.

हेही वाचा >>>Tripura Election: सत्ता टिकवण्यासाठी भाजपाचा मेगा प्लॅन; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांना प्रचारात उतरविणार

चंद्रशेखर राव यांना राज्यात कितपत प्रतिसाद मिळेल याबाबत प्रश्न उपस्थित केला जातो. राज्यात भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, वंचित बहुजन आघाडी, रिपाईचे विविध गट असे प्रस्थापित पक्ष आहेत. चंद्रशेखर राव यांचे नेतृत्व सध्या तरी केवळ तेलंगणापुरते सीमित आहे. राज्यात शेतकऱ्यांना त्यांनी विविध आश्वासने दिली असली तरी राज्यात विविध शेतकरी संघटनांची चांगली ताकद आहे. अशा वेळी या पक्षाला स्थान प्रस्थापित करणे सोपे नाही. सध्या तरी तेलंगणाच्या सीमेवर चंद्रशेखर राव आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. दीड वर्षांपूर्वी चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. पण दोन्ही नेत्यांनी चंद्रशेखर राव यांना थंडा प्रतिसाद दिला होता. नवीन मित्र भारत राष्ट्र समितीला आपलेसे करावे लागतील.

हेही वाचा >>>आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी सिद्धरमैया यांचा मोठा निर्णय; म्हणाले, “ही निवडणूक…”

एमआयएम पक्षाने नांदेडमध्येच महाराष्ट्रातील पाय रोवले होते. नांदेड महापालिका निवडणुकीत त्यांनी ताकद दाखवून दिली. एमआयएम हा मुळातच अल्पसंख्याकांचा पक्ष आहे. यामुळेच राज्यातील अल्पसंख्याक समाजाला या पक्षाबद्दल आकर्षण वाटले. त्यातून पक्षाची ताकद राज्यात वाढत गेली. दोन विधानसभा निवडणुकांमध्ये एमआयएमचे प्रत्येकी दोन आमदार निवडून आले. गेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधून इम्तियाज जलिल खासदार म्हणून निवडून आले. अल्पसंख्याकबहुल भागात या पक्षाने जम बसविला.तेलंगणातून राज्यात पाय टाकलेल्या एमआयएमला मुस्लीम समाजाच्या पाठिंब्यामुळे जम बसविता आला. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला पाया विस्तारणे तेवढे सोपे नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 12:50 IST

संबंधित बातम्या