एकसंध शिवसेनेचा पारंपरिक गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत कोणाचा अध्यक्ष होणार हा मुद्दा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. संख्याबळात भाजपा व शिंदे गटाचे पारडे जड असले तरीही दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांकडे बोट दाखवल्याने अध्यक्षपदाची चुरस वाढण्याची शक्यता आहे. यादरम्यान भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी तयारी केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यातच ठाकरे गटाचे प्रभावशाली नेते अंबादास दानवे यांनी केलेल्या सूचक विधानानंतर या चर्चांना अधिकच हवा मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींचा हा सविस्तर आढावा…
अध्यक्षपदावरून महायुतीत मिठाचा खडा?
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणूक भाजपा व शिंदे गटाने एकत्रित लढवली असली तरीही काही ठिकाणी दोन्ही पक्षांत मैत्रीपूर्ण लढती झाल्या होत्या. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दमदार कामगिरी करून सर्वाधिक २३ जागा जिंकल्या; तर शिवसेना शिंदे गटाने २१ जागांवर दणदणीत विजय मिळवला. त्याशिवाय ठाकरे गट ९ जागा, अजित पवार गट ४ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व काँग्रेसने प्रत्येकी एक जागा आपल्या पदरात पाडून घेतली होती. उर्वरित चार जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला होता. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती सभापती पदाच्या निवडीवरून जिल्ह्यात भाजपा व शिंदे गटात मतभेद वाढल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपा-शिंदे गटाची नेमकी भूमिका काय?
६३ सदस्यांचे संख्याबळ असलेल्या जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा ३२ आहे. सध्या भाजपा व शिंदे गटाच्या युतीकडे तब्बल ४४ सदस्य असल्यामुळे जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता सहजपणे येऊ शकते. मात्र, पहिले अडीच वर्षे अध्यक्षपद आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजपाचे काही नेते आग्रही आहेत; तर शिंदे गटाने अद्याप आपले पत्ते उघड केले नसल्याने अध्यक्षपदासाठीची चुरस आणखीनच वाढली आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले आहे. दुसरीकडे- जिल्हा परिषदेत महायुतीचाच अध्यक्ष होणार असून, अद्याप या विषयावर चर्चा झालेली नाही. वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर ते जो आदेश देतील, त्याचे पालन केले जाईल, अशी भूमिका भाजपाचे मंत्री अतुल सावे यांनी मांडली आहे.
आणखी वाचा : ठाकरेंचा नगरसेवक अखेर शिंदे गटात; भाजपाला फटका देण्याची दोन्ही शिवसेनेची तयारी? वाचा ५ घडामोडी…
भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्याची तयारी?
भाजपाला जिल्हा परिषदेच्या सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी तयारी केल्याची चर्चा स्थानिक राजकारणात रंगली आहे. दोन्ही गटांच्या नेत्यांनी एकमेकांशी गुप्तपणे चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजपाच्या सत्तेच्या गणिताला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या शिंदे आणि ठाकरे सेनेचे नवनिर्वाचित सदस्य एकत्रित सहलीवर गेल्याची चर्चा आहे. फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी दोन्ही गटांकडून ही खबरदारी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेषतः अध्यक्षपदासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचाही विचार दोन्ही गटांकडून केला जात असल्याची माहिती आहे. या राजकीय घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
अंबादास दानवे नेमके काय म्हणाले?
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीला अवघे काही तास शिल्लक असताना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सूचक विधान करीत जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. राजकारणातील सगळी तत्त्वं आम्हीच पाळायची का? इतर राजकीय पक्ष कसेही वागतात? सत्तेसाठीच्या तडजोडी करतात, मग आपणही सत्तेसोबत गेले पाहिजे, अशी भावना जर आमच्या सदस्यांची असेल, तर त्यात काही गैर नाही. आमच्या निवडून आलेल्या सदस्यांची इच्छा ही सत्तेत जाण्याची आहे, असे विधान त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केले. आम्हाला भाजपा-शिंदेची शिवसेना दोघेही दूरचे नाहीत. राजकारणात काहीही शक्य आहे. भाजपा-शिवसेनेचे फाटले, तर आम्ही संधी साधू, असे सांगत त्यांनी महायुतीतील मतभेदाला आणखीनच हवा दिली आहे.
हेही वाचा : महाआघाडीचे चार आमदार बेपत्ता? भाजपाने राज्यसभेच्या अतिरिक्त जागा कशा जिंकल्या? निवडणुकीत काय घडले?
अध्यक्षपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला?
अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा पेच सोडविण्यासाठी भाजपाचे मंत्री अतुल सावे व शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती आहे. अध्यक्षपद दोन्ही पक्षांनी प्रत्येकी अडीच-अडीच वर्षं वाटून घ्यावे, असे निर्देश त्यांना पक्षश्रेष्ठींनी दिल्याचे सांगितले जात आहे. तरीदेखील पहिला अध्यक्ष आपलाच व्हावा, यासाठी दोन्ही पक्ष आग्रही आहेत. जर दोन्ही पक्षांत काही बिनसले, तर एकाला पाठिंबा देऊन काही पदे मिळवण्याची ठाकरे गटाची तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला सत्ता स्थापन करण्यात अपयश आले होते. तत्कालीन काँग्रेसमधील अब्दुल सत्तार यांनी शिवसेना-काँग्रेस युती घडवून आणत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले होते. त्यामुळे या वेळीही तशीच राजकीय परिस्थिती निर्माण होणार की भाजपा-शिंदे गट अध्यक्षपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
