महाराष्ट्रातील आजच्या राजकीय बातम्या : शिवसेना शिंदे गटातील प्रभावशाली नेता ठाकरेसेनेत परतणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याने एकच खळबळ उडाली… विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मोठा धक्का बसला असून माजी आमदाराने पक्षातील सर्व पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला… ज्ञानेश कुमार यांना पायउतार करून निवडणुका घेतल्यास भाजपा-शिंदे गट औषधालाही उरणार नाही, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला… पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील सत्ताधारी महायुतीतील बंडखोरी शमल्याने अधिकृत उमेदवारांनी अखेर सुटकेचा श्वास सोडला… मुंबई आणि महाराष्ट्राची भीती दिल्लीच्या राजवाटीच्या मनात बसली असल्याचे म्हणत आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेचा भडिमार केला… आज दिवसभरातील या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ..

शिंदे गटातील बडा नेता ठाकरेंकडे परतणार?

राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज बांधणे कठीण असते. २०२२ मध्ये एकसंध शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर अनेकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची कास धरली. सुरुवातीला आमदार-खासदार आणि त्यानंतर पक्षातील अनेक पदाधिकारीही ठाकरेंना सोडून शिंदेसेनेत गेले. तत्कालीन खासदार गजानन कीर्तीकर यांनीही शिंदेसेनेची कास धरली होती; पण त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर हे ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले. सध्या माजी खासदार असलेले गजानन कीर्तीकर हे शिंदेसेनेत नाराज असल्याची समजते. इतकेच नाही तर ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चाही सुरू झाली. अचानक समोर आलेल्या या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. त्यावर प्रतिक्रिया देताना कीर्तीकर यांनीही आपण शिंदेसेनेत नाराज असल्याची जाहीरपणे कबुली दिली; पण त्यांनी पक्षांतरांच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांच्याशी माझा संपर्क आणि भेट होत नसली तरीही आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे कीर्तीकर यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपाच्या नेत्याने तडकाफडकी सोडला पक्ष

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी येत्या २३ ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. सध्या या निवडणुकीची धामधूम सुरू असताना नागपुरात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे माजी आमदार गिरीश व्यास यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. तसेच भाजपाचे बंडखोर उमेदवार आणि माजी आमदार प्रा. अनिल सोले यांना त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. भाजपाने या मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षातील नाराजी उघड झाली आहे. याच पार्श्वभूमीवर गिरीश व्यास यांनी अनिल सोले यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली आहे. पक्षाकडून कारवाई होण्यापूर्वी आपण स्वतः राजीनामा दिल्याचे व्यास यांनी सांगितले आहे. गिरीश व्यास हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांनी २०१६ ते २०२२ या कालावधीत विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या राजीनाम्यावर आता भाजपा काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

“…तर भाजपा-शिंदे गट औषधालाही उरणार नाही”

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पायउतार करून आताच निवडणुका घेतल्यास भाजपा आणि शिंदे गट औषधालाही उरणार नाही, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. खरी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच असून बाकी सर्व डुप्लिकेट आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त संपर्कप्रमुख किरण तावडे यांच्या पदभार स्वीकारण्याच्या निमित्ताने संजय राऊत जुन्नरमध्ये आले होते. यावेळी घेतलेल्या जाहीर पत्रकार परिषदेतून त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर विविध मुद्द्यावरून टीका केली. महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एक दिवसाआड दिल्लीचे दौरे काढत आहेत. जनतेच्या प्रश्नांवर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे किंवा सुनेत्रा पवार कोणीही बोलायला तयार नाही, असे राऊत म्हणाले. निवडणूक यंत्रणेतील हेराफेरी थांबवून निष्पक्ष निवडणुका घेतल्या, तर शिंदे गट आणि भाजपा औषधालाही उरणार नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

पुण्यातील महायुतीतील बंड अखेर झाले थंड

पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील महायुतीतील बंडखोरी अखेर थंड झाल्याचे समोर आले. पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले भैय्या माने आणि शिक्षक मतदारसंघातून शिंदेसेनेचे मंगेश चिवटे यांनी अखेर माघार घेतली आहे. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी येत्या २३ ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. त्याआधी उमेदवारी अर्ज दाखल करण्यावरून महायुतीत मतभेद निर्माण झाले होते. पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा आपल्याला मिळावी अशी आग्रही मागणी शिंदे गटाची होती. मात्र, भाजपाने ही जागा सोडण्यास नकार दिला. त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाचा अधिकृत उमेदवार देऊन थेट भाजपालाच आव्हान दिले होते. शिंदे गटाच्या वतीने मंगेश चिवटे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले भैय्या माने यांनीही निवडणुकीतून माघार घेतली आहे. सत्ताधारी महायुतीतील बंडखोरी शमल्याने अधिकृत उमेदवारांनी अखेर सुटकेचा श्वास सोडला आहे.

“महाराष्ट्राची भीती दिल्लीतील राजवाटीच्या मनात बसलीय”

मुंबई आणि महाराष्ट्राची भीती दिल्लीच्या राजवाटीच्या मनात बसली आहे. या सरकारला तरुणांची भीती वाटू लागली आहे. जे आपल्या हक्कासाठी, मतदानाच्या अधिकारासाठी दिल्लीत जात आहेत, त्यांच्यावर सरकारकडून गुन्हे दाखल केले जात आहे. देशभरात सध्या आणीबाणी लागू झाली आहे पण त्याविषयी बोलायची हिंमत भाजपामध्ये नाही, अशा शब्दात युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपा सरकारवर टीका केली. शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी देशभरात ज्ञानेश कुमारांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांवरून सत्ताधाऱ्यांवर टीकेचा भडिमार केला. जग पाहतंय आपल्या देशात काय वातावरण आहे. आपल्या देशात लोकशाही राहिलेली नाही आणि भाजप सत्तेला चिकटून बसलीय हे जगाला आता दिसायला लागलं आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या टीकेला आता भाजपाकडून काय उत्तर दिले जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.