भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे नांदेड किंवा छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढविण्याची चाचपणी करीत असल्याच्या माहितीला त्यांच्या पक्षातून दुजोरा मिळाल्यानंतर १९६७ पासून नांदेड लोकसभा मतदारसंघात बाहेरचा उमेदवार निवडणूक जिंकू शकलेला नाही, हे वास्तवही समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेलंगणा राज्यात सध्या राज्य स्थापनादिनाच्या तीन आठवड्यांच्या भरगच्च कार्यक्रमांची लगबग चाललेली आहे. २ जून ते २१ जून दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यातच के. चंद्रशेखर राव हे नांदेड किंवा छत्रपती संभाजीनगरातून लोकसभा निवडणूक लढवू शकतात, या शक्यतेला भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते माणिक कदम यांनी दुजोरा दिला. या पार्श्वभूमीवर नांदेड लोकसभा मतदारसंघातील मागील निवडणुकांतला तपशील तपासला असता, १९६७ च्या निवडणुकीपासून नांदेड जिल्ह्याचा भूमिपुत्रच निवडणुकीत यशस्वी ठरल्याचे दिसते. त्याआधीच्या तीन निवडणुकांत मात्र देवराव कांबळे पाथ्रीकर आणि तुळशीदास जाधव हे बाहेरचे उमेदवार नांदेड मतदारसंघातून लोकसभेवर गेले. कांबळे हे १९५२ आणि १९५७ च्या निवडणुकीत जिंकले, तर १९६२ साली जाधव यांना संधी मिळाली, ते सोलापूरचे होते.

हेही वाचा – भाजपच्या वर्तणुकीमुळे शिंदे गटातील अस्वस्थतेला धुमारे

जिल्ह्याचे भूमिपुत्र शंकरराव टेळकीकर हे जिल्ह्याचे पहिले खासदार. १९५७ साली राखीव जागेवर विजयी झालेले हरिहर सोनुले हे हदगावचे रहिवासी होते. याच निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरच्या विजयेंद्र काबरा यांचा पराभव झाला होता. त्यानंतर १९६७ साली नांदेडचे माजी नगराध्यक्ष व्यंकटराव देशमुख तरोडेकर हे खासदार झाले. या निवडणुकीपासून बाहेरचे अनेक नेते नांदेडमधून उभे राहिले, पण त्यांच्या वाट्याला पराभव आला. अशांमध्ये यशवंतराव आंबेडकर (१९७१), अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (१९८७), शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी (१९९६), धनगर समाजाचे नेते हरिभाऊ शेळके (१९९६), महादेव जानकर (१९९८), प्रीती शिंदे (२००९) या व इतर उमेदवारांची नावे येतात.

हेही वाचा – संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावर २० विरोधी पक्षांचा बहिष्कार; तीन महत्त्वाचे पक्ष मात्र कार्यक्रमाला उपस्थित राहणार!

वरील नामावलीतील प्रकाश आंबेडकर तसेच शरद जोशी यांच्या उमेदवारीची चर्चा महाराष्ट्रासह राज्याच्या बाहेरही झाली होती, पण त्यांचा अतिशय दारुण पराभव झाला. नांदेडच्या मतदारांनी गेल्या ५० वर्षांत बाहेरच्या उमेदवारांना नाकारत त्यांना त्यांच्या गावचा रस्ता दाखविला. गेल्या निवडणुकीत आंबेडकर यांनी ‘वंचित’च्या माध्यमातून काँग्रेस आघाडीचा राज्यात विचका केला होता. पुढील निवडणुकीत ते काय करणार, हे अद्याप स्पष्ट नाही. के.चंद्रशेखर राव नांदेडमधून उभे राहिले तर निवडणुकीला मोठे महत्त्व नि वलय प्राप्त होईल. पण त्यांच्या उमेदवारीचा लाभ भाजपला होणार नाही, यासाठी काँग्रेस पक्षाला अधिक सतर्क राहावे लागणार आहे. के. चंद्रशेखर राव यांच्या उमेदवारीसंदर्भात अत्यंत प्राथमिक माहिती बाहेर आली आहे. पण त्यावर काँग्रेस किंवा भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त झालेली नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will k chandrasekhar rao contest lok sabha from nanded print politics news ssb
First published on: 28-05-2023 at 13:27 IST