मोहनीराज लहाडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगरः छत्रपती संभाजीनगर, धाराशिव यांच्या नामांतरासाठी तेथे दीर्घकाळ लढा उभारला गेला. अजूनही हा प्रश्न न्यायालयीन वादात अडकलेला आहे. नगर जिल्ह्याचे विभाजन, धनगर समाजाचे आरक्षण अशा दीर्घकाळाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत शिंदे-फडणवीस सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यादेवी नगर करण्याचे जाहीर केले. भाजपचा हा निर्णय जातीय मतांच्या समीकरणावर आधारलेला असला तरी राज्यातील इतर जिल्ह्यांच्या नामांतराप्रमाणेच नगरचे नामांतरही वादात अडकण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकारने निर्णय जाहीर केला असला तरी त्यासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक बाबींची पूर्तता अद्याप झालेली नाही.

नगर जिल्ह्यात धनगर समाजाची मोठी लोकसंख्या आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. संगमनेर, पारनेर, राहुरी, नगर तालुका, कर्जत-जामखेड या विधानसभा मतदारसंघात समाजाची मते निकालावर परिणाम करणारी ठरतात. राज्यातही नगरसह पुणे, सोलापूर, बीड जिल्ह्यात समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर धनगर समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य मिळू लागले आहे. त्याचे चित्र राज्याच्या गेल्या अर्थसंकल्पात पहावयास मिळाले. शेळी-मेंढी महामंडळासाठी १० हजार कोटी रुपये, दरवर्षी २५ हजार घरे बांधणे, हळगाव (ता. जामखेड) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने कृषी महाविद्यालय सुरू करणे, बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांचे नाव देणे, असे काही निर्णय लागोपाठ घेण्यात आले. समाजाला आपल्याकडे आकृष्ट करण्याचे भाजपचे प्रयत्न या माध्यमातून अधोरेखित होतात.

हेही वाचा… बुलढाण्याच्या जागेवरून आघाडी तसेच युतीतही चढाओढ

अहमदनगरचे नामांतर करा ही मागणी तशी अलीकडेच पुढे आणली गेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी नगरमध्ये असल्याने जिल्ह्याला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी झाली. त्या तुलनेत धनगर समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी जुनी आहे. त्यासाठीचा समाजाचा संघर्ष अद्यापि सुरु आहे. त्याला मात्र सरकारने अजूनही प्रतिसाद दिलेला नाही. आरक्षणाच्या मागणीसाठी नागपूर येथे चार-पाच वर्षांपूर्वी समाजाचे अधिवेशन बोलावले गेले होते. त्यावेळी आरक्षणाच्या मागणीला नगरच्या नामांतराची मागणीची जोड देण्यात आली. मात्र नंतर फारसा पाठपुरावा झाला नाही. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अचानकपणे गेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार गोपीचंद पडळकर व समाजातील काही पदाधिकाऱ्यांनी सरकारकडे ही मागणी केली. या पत्राला प्रतिसाद देत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नगरची महापालिका, टपाल खाते, रेल्वे यांना पत्र पाठवून तसा निर्णय घेण्याबाबत कळवले.

हेही वाचा… कर्नाटकचे सूत्र काँग्रेस राज्यातही राबविणार

या मागणीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव खासदार डॉ. सुजय विखे यांनी जिल्ह्यातील इतर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते सोडवले जाणे महत्त्वाचे आहे, बाहेरील लोकांनी नगरच्या नामांतराच्या विषयात लक्ष घालू नये, अशी भूमिका घेतली. त्या विरोधात धनगर समाजातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. इतरही नेत्यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. जिल्ह्यात मागणीच्या समर्थनार्थ रथयात्राही काढण्यात आली. त्यानंतर विखे पितापुत्रांनी आपली भूमिका बदलत मागणीला समर्थन दिले.

हेही वाचा… भाजपच्या दोन देशमुखांमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर येणार ?

नामांतराची मागणी पुढे आल्याचे लक्षात घेऊन इतरही समाजाच्या संघटना, संस्था यांनी वेगवेगळे नावे सुचवण्यास सुरुवात केली. राष्ट्रसंत आनंदऋषी महाराज यांचे समाधीस्थळ असल्याने आनंदनगर नाव द्यावे, शिवाजी महाराजांच्या घराण्याशी संबंधित सुफी संत शहाशरिफ यांच्या वास्तव्याने पुनीत झाल्याने शहाशरीफ नगर नाव द्यावे, सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण येथील शाळेत झाल्याने त्यांचे किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव द्यावे अशा मागण्या पुढे आल्या होत्या. त्यापूर्वी राज्यात युतीचे सरकार असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नगर शहरातील सभेत ‘अंबिकानगर’ नाव देण्याची सूचना केली होती. मात्र शिवसेनेने त्याच्या पाठपुराव्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या मागणीचा रेटा निर्माण झालाच नाही. केवळ वेळोवेळीच्या निवडणुकातून तोंडी लावण्यापुरता हा विषय उपस्थित केला जाई. आता महापालिकेत ठाकरे गट व राष्ट्रवादी यांची सत्ता आहे. ठाकरे गटाचा महापौर आहे. अंबिकानगर मागणीच्या पार्श्वभूमीवर ठराव घेण्याबाबत ठाकरे गटाकडून उत्साह दाखवण्याची शक्यता तशी कमीच आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live: “आता भाजपाच्याच सहकाऱ्यांना कुठं बसवायचं हा…”, जयंत पाटलांचा खोचक टोला!

स्थापना दिवस असलेले अपवादात्मक शहरे देशात आहेत. त्यामध्ये नगरचा समावेश आहे. अहमद निजामशहाने ५३३ वर्षांपूर्वी शहराची स्थापना केली. नुकताच २८ मे रोजी स्थापना दिवस साजरा करण्यात आला. ब्रिटिशांनी सन १८२२ मध्ये जिल्ह्याची निर्मिती केली व अहमदनगर नाव देण्यात आले. आता दोन दिवसापूर्वी अहल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती चौंडी येथे साजरी करण्यात आली. उत्सवात आमदार राम शिंदे, आमदार राम पडळकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे नामांतराचा आग्रह धरला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नामांतराची घोषणा केली. याच सभेसाठी उपस्थित असलेला जनसमुदाय नामांतरासह आरक्षणाची मागणी करत होता. मात्र नामांतरासारखा आरक्षणाच्या मागणीला सरकारकडून प्रतिसाद दिला गेला नाही.

जिल्हा नियोजन समितीसह जिल्हा परिषदेने जिल्हा विभाजनाचा ठराव पूर्वीच केला आहे. जिल्हा विभाजनासाठी वेळोवेळी जनमताचा रेटाही निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र कोणत्याही राज्य सरकारच्या काळात विभाजनच्या मागणीला प्रतिसाद दिला गेला नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will political and social equation of the ahmednagar district change with the renaming print politics news asj
Show comments