सातारा : साताऱ्यातील फलटण विधानसभा मतदारसंघात विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील संघर्ष वाढला आहे. त्यामुळे येथे महायुती मधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. आपले राजकीय प्राबल्य पुन्ह: प्रस्थापित करण्यासाठी रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत तुतारी फुंकण्याचा इशारा दिला आहे. या वादात अजित पवारांनी लक्ष घातल्याने रामराजेंची नाराजी दूर होते का, याची उत्सुकता आहे. भाजपाने माढा लोकसभा मतदारसंघात रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या ऐवजी कोणीही उमेदवार द्यावा . त्याला निवडून आणण्याची जबाबदारी माझी, असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपाला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले होते. मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवार न बदलण्याची भूमिका भाजपाने घेतल्याने रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना विरोध केला . विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मदतीने त्यांचे धैर्यशील मोहिते पाटील यांना स्वतः प्रचारापासून अलिप्त राहून सर्व मार्गांनी मदत केली. धैर्यशील मोहिते पाटील खासदार झाले. मात्र यामुळे भाजपा आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर दुखावले गेले. मात्र या निवडणुकीत फलटण मतदार संघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पेक्षा अठरा हजार मते जास्त मते मिळाली. त्यामध्ये फलटण मतदारसंघातील स्थानिक उमेदवार म्हणून त्यांना जास्त मते मिळाली. हीच जमेची बाब गृहीत धरून रणजीतसिंह नाईक निंबाळकर कामाला लागले. त्यांनी रामराजेंचा गट फोडण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांना वेगवेगळी आमिषे दाखवली, प्रसंगी त्यांच्यावरील वेगवेगळ्या जुन्या प्रकरणातील गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली असे रामराजेंचे म्हणणे आहे. हे ही वाचा. अजित पवार गटामुळे भाजपला गळती? रामराजे यांचे राजकीय महत्त्व कमी करण्यासाठी काही महत्वाचे कार्यकर्ते शिवरूपराजे खर्डेकर आणि जिल्हा परिषदेचे माजी सुभाष अध्यक्ष सोनवलकर यांना आपल्याकडे वळविले. त्यामुळे दुखावलेल्या रामराजेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यापूर्वी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. आपण महायुतीमध्ये आहोत, आपला राग भाजपावर नाही. मात्र रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी जी दहशत,दडपशाही निर्माण केली आहे. त्याला माझा विरोध आहे. त्याला भाजपाने साथ देऊ नये अशी भूमिका त्यांनी मांडली. आपण अजित पवार आणि फडणवीस यांना सांगून बघू, त्यांनी ऐकले तर ठीक अन्यथा आपल्याला तुतारी हातात घ्यायला किती वेळ लागेल असा इशारा त्यांनी दिला. हे ही वाचा. पुनिया, फोगट यांची राहुल गांधींशी चर्चा; हरियाणा विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता अजित पवारांच्या समोर रामराजे यांनी रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्या पक्ष फोडाफोडीच्या कृत्याच्या पुनरुचार केला. कार्यकर्त्यांची तक्रार सांगितली महायुतीमध्ये असतानाही आमचा पक्ष फोडून ते भाजपामध्ये काही कार्यकर्त्यांना घेऊन जात आहेत. जे त्यांच्यासोबत जात नाही त्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत गुन्हे दाखल करत आहेत असा आरोप रामराजेंनी केला आहे. त्यांना पोलीस अधिकारी आणि प्रशासन साथ देत आहे. हे असेच सुरू राहिले तर घड्याळ कसे निवडून येणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हे ही वाचा. लाडकी बहीण योजनेतील ‘मुख्यमंत्री’ शब्द गायब; राष्ट्रवादी काँग्रेसवर शिंदे गटाची नाराजी यावेळी अजित पवार यांनी आपण महायुतीमध्ये असलो तरी समन्वय राखून काम करण्याचे ठरले आहे. एकमेकांच्या कार्यकर्त्यांचा आदर राखला जावा, एकमेकाचे पक्ष फोडायचे नाहीत असे ठरल्याचे अजित पवारांनी सांगितले. कार्यकर्त्यांच्या तक्रारीबाबत भाजपच्या वरिष्ठ राज्य राष्ट्रीय पातळीवर नेत्यांशी बोलू असे सांगितले. हे ही वाचा. काश्मीरला राज्याचा दर्जा ही सामूहिक जबाबदारी! प्रचारसभेत राहुल गांधी यांचे प्रतिपादन नुकतेच फलटणच्या चंद्रकांत पाटील आणि कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या दौऱ्यात रामराजेंना डावलले गेले. मी महायुतीमध्ये असतानाही मला डावलले जात असेल तर नक्की विचार करावा लागेल असे त्यांनी सांगितले. लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही फलटण दौऱ्यावर येणार आहेत. तपूर्वी आपले ऐकले नाही तर शरद पवार यांच्या तुतारी सोबत जाण्याचा इशारा रामराजे यांनी दिलेला आहे. रामराजे हे साताऱ्यातील राजकारणाचे एक महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी फलटण खंडाळा या तालुक्यांना पाणी आणण्यासाठी फार कष्ट घेतले आहेत. त्यांचे स्वतःचे मतदारसंघात वलय आणि मोठा जनसंपर्क, जनाधार आहे. सध्या तरी ते मतदार संघात व साताऱ्यात प्रभावी नेते आहेत. हे ही वाचा. मुख्यमंत्रीपद संख्याबळानुसार; ठाकरे गटाच्या मागणीवर शरद पवार यांचे स्पष्टीकरण मुळातच फलटण हा मतदारसंघ राखीव आहे. आमदार दीपक चव्हाण हे त्यांना त्यांच्या मतानेच चालणारे आहेत. त्यांना साताऱ्यातील प्रत्येक तालुक्यातील राजकारणाचे आडाखे माहित आहेत. त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यास आजूबाजूच्या तीन-चार मतदारसंघावर त्याचा परिणाम होईल आणि त्याचा फटका महायुतीला बसेल हे ओळखूनच रामराजेंनी महायुतीला इशारा दिला आहे. महायुतीतील अंतर्गत वादातून रामराजे शरद पवार यांच्या पक्षात गेल्यास फलटण, माळशिरस माण खटाव आणि वाई या मतदारसंघावर ते नक्की प्रभाव पाडू शकतात.